नेरळ : नुकत्याच झालेल्या परतीच्या पावसामुळे कर्जत तालुक्यातील भातशेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम तलाठ्यांचे आहे. परंतु कर्जत आणि तमनाथ सजाचे काम पाहणारे तलाठी हंगे यांनी कर्जतव्यतिरिक्त अतिरिक्त चार्ज सोपविलेल्या तमनाथ सजाचे काम नाकारल्याने येथील नुकसान झालेल्या शेतीचे अद्याप पंचनामे करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडले आहे.
तमनाथ सजाअंतर्गत तमनाथ, आडिवली, सांगवी, खांडपे, मूळगाव, तिवणे, माणगाव, सांडशी ही गावे आहेत. या गावांमधील बहुतांश शेतीचे पावसामुळे नुकसान झाले आहे. तयार झालेले भात कापणीच्या वेळीच पावसाचे पाणी शेतात साचल्याने उभी पिके आडवी होऊन ती कुजली. मुळातच महागाईमुळे पिचलेला सर्वसामान्य शेतकरी हातातील भाताचे पीकही गेल्याने अधिकच अडचणीत सापडला आहे. त्यामुळे या नुकसान झालेल्या भातशेतीची पाहणी करून तलाठ्यांनी पंचनामा करणे अपेक्षित होते, मात्र तमनाथ सजाला तलाठी नसल्याने पंचनामे रखडले.
यापूर्वी कर्जत तलाठ्याकडे कर्जत आणि तमनाथ अशा दोन्ही सजांचे काम होते. तालुक्यात अनेक ठिकाणी एकाच तलाठ्याला दोन दोन सजांचे काम करावे लागत असल्याने त्यांच्यावर अतिरिक्त ताण पडत होता. त्यामुळे तलाठी संघटनेने यापुढे फक्त एकच सजाचे काम केले जाईल, अतिरिक्त सोपविलेल्या सजाचे काम केले जाणार नाही, असा निर्णय घेतल्याचे समजते. कर्जत सजाचे तलाठी हंगे यांनीही त्यांच्याकडील तमनाथ सजाचा चार्ज परत करत संबंधित दप्तर तहसील कार्यालयाकडे सोपविले, तेव्हापासून तमनाथ सजाला तलाठी नाही.