मुरबाड, अलिबाग रेल्वे सुरू होणे गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 01:12 AM2019-03-14T01:12:23+5:302019-03-14T01:12:41+5:30

रेल्वेमंत्री पीयूष गोयल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कल्याण-मुरबाड रेल्वेमार्ग चार वर्षांत पूर्ण करण्याची आणि अलिबागला पॅसेंजर नेण्याची घोषणा झाली.

Murbad, Alibaug Railway should start | मुरबाड, अलिबाग रेल्वे सुरू होणे गरजेचे

मुरबाड, अलिबाग रेल्वे सुरू होणे गरजेचे

Next

रेल्वेमंत्री पीयूष गोयल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कल्याण-मुरबाडरेल्वेमार्ग चार वर्षांत पूर्ण करण्याची आणि अलिबागला पॅसेंजर नेण्याची घोषणा झाली. या रेल्वे मार्गासाठी अजून भूसंपादन, सर्व्हेही झालेला नाही; तरीही या दोन्ही प्रकल्पांची घोषणा झाली. त्यामुळे हे प्रकल्प खरेच पूर्ण होऊ न या मार्गावर गाड्या धावतील का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. पण ही घोषणा फक्त घोषणा न ठरता, प्रशासनाने त्या दृष्टीने काम करून हा प्रकल्प मुदतीत पूर्ण करणे गरजेचे आहे. कारण या रेल्वे मार्गामुळे या भागातील विकासाला चालना मिळेल, असे मत ‘लोकमत’च्या वाचकांनी व्यक्त केले. त्यातील काही निवडक प्रतिक्रियांचा घेतलेला धांडोळा.

चालना देऊन प्रकल्प मार्गी लावावेत
कल्याण-मुरबाड आणि अलिबाग पॅसेंजर हे रेल्वे प्रकल्प येत्या चार वर्षांत पूर्ण करणार अशी रेल्वेमंत्री पीयूष गोयल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत घोषणा झाली. खरे तर या रेल्वे मार्गासाठी भूसंपादन वा कोणताही सर्व्हे झाला नसताना अशा घोषणा करणे म्हणजे या भागातील मतदारांनी आपल्या पदरी मतदानांचे भरघोस माप घालावे, म्हणून निवडणुकीच्या निमित्ताने जी आश्वासने दिली जातात, त्यापैकीच आताच्या सरकारने आश्वासन दिले आहे. कदाचित हे प्रकल्प दिवास्वप्नही ठरू शकतात. मुळात मुंबई उपनगरी लोकल मार्गावरील यापूर्वी घोषित झालेले अनेक प्रकल्प निधीअभावी अपूर्ण आहेत. यास चालना देऊन मार्गी लावायला हवेत. याशिवाय कर्जत - कल्याण - पनवेल या मार्गाला गती देणे गरजेचे आहे. जेणेकरून या मार्गावरील नोकरदार, व्यावसायिकांना वाशी, पनवेलला जाण्यासाठी ठाण्यापर्यंत जाऊन लोकल बदलावी लागणार नाही. तसेच यात सकाळ-संध्याकाळी प्रवाशांची जी घुसमट होते त्यातून सुटका होईल व वेळेची बचतही होईल. ठाण्यापुढे थेट जाणाऱ्या प्रवाशांना गाडीत चढणे सुलभ होईल. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अवास्तव घोषणा करण्यापेक्षा सर्व प्रलंबित प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर अशा घोषणा झाल्या असत्या, तर ते रास्त ठरले असते. भविष्यात आणखी रेल्वे सुविधा वाढवायची झाल्यास कोकण रेल्वेवरील माणगाव किंवा गोरेगाव रेल्वे मार्गावरून श्रीवर्धनपर्यंत रेल्वेच्या विस्ताराची योजना हाती घेतली जावी. रायगड-रत्नागिरी जिल्ह्यांना जोडणाऱ्या व पर्यटनाच्यादृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणाºया बागमांडला-बाणकोट पुलाचे कामही रखडले आहे, त्याची माहिती घेऊन मुख्यमंत्र्यांनी या पुलाचे काम मार्गी लावण्यास प्राधान्य द्यावे.
- मुरलीधर धंबा, डोंबिवली (प.)

बाधितांना भूसंपादनात योग्य मोबदला द्यावा!
रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी कल्याण-मुरबाड रेल्वे मार्ग चार वर्षांत करणार आणि अलिबागला पॅसेंजर गाडी नेणार या दोन घोषणा केल्या. आचारसंहिता लागू होण्यापूर्वीची ही घाई आहे हे पक्के. अजून जागेचा सर्व्हे किंवा भूसंपादन झालेले नाही. औद्योगिकीकरण झपाट्याने होत असलेल्या ठाणे जिल्ह्यातील बºयाच ग्रामीण भागात शेती केली जाते. भूसंपादन करताना स्थानिकांना त्यांच्या शेतजमिनीचा योग्य मोबदला देऊन त्यांच्या भविष्यातील उत्पन्नाचे मार्ग सरकारने अग्रक्रमाने आखणे आवश्यक आहे. तेथून जाणारे रेल्वे मार्ग व स्थानक प्रवाशांना आणि मालवाहतूक अशी अनेक कामे यातून होणे अपेक्षित आहेत. यातूनच खºया अर्थाने हा मार्ग उपयोगी पडेल. कल्याण-मुरबाड यांना जोडण्यासाठी फक्त रस्ते वाहतूक सुरू आहे. रेल्वे सुरू झाल्यास दुसरा वाहतुकीचा पर्याय उपलब्ध होईल. मात्र, जाहीर केलेल्या घोषणा जेव्हा प्रत्यक्षात अमलात येतील, तेव्हाच शक्य आहे. पाच वर्षांतून एखाद्या दिवशी योजना जाहीर करून पुढील निवडणुकीच्या वेळी नवीन आश्वासने द्यायला परत येतील. विद्यमान मुख्यमंत्री आणि सरकार यांना राज्यात मिळालेली सत्ता टिकवायच्या निमित्ताने का होईना जाहीर केलेल्या योजना पूर्णत्वास नेतील, अशी आशा बाळगायला हरकत नाही.
- राजन पांजरी, जोगेश्वरी

मुरबाडपर्यंत रेल्वे धावणारच!
मुरबाड रेल्वे मार्ग हे दिवास्वप्न नसून मुरबाड रेल्वे होणारच आहे. मुरबाड भाग हा ग्रामीण भाग आहे. या भागाला शहरासोबत जोडण्यासाठी आणि सर्वांगीण विकासासाठी रेल्वे मार्ग उत्तम पर्याय आहे. त्याचबरोबर कसारा आणि कल्याण रेल्वे मार्गाव्यतिरिक्त आणखी एक उपनगरी रेल्वे मार्ग उपलब्ध होईल. मुरबाड रेल्वेचे प्रत्यक्ष काम सुरू झालेले नाही. मात्र, मुरबाड रेल्वेमार्गाच्या मंजुरीची घोषणा करण्यात आली आहे. मुरबाड रेल्वे मार्ग कल्याण-नगर रेल्वेचा पहिला टप्पा आहे. हा मार्ग कमी लांबीचा आणि कमी खर्चाचा आहे. मुंबई, ठाण्याच्या वाढत्या लोकसंख्येला या रेल्वेमुळे नवीन उपनगरी परिसर म्हणून उपलब्ध होईल. ठाणे जिल्ह्याच्या विकासासाठी मुरबाड रेल्वे होणे अत्यंत गरजेचे आहे. मुरबाड मार्ग पूर्णत्वास नेण्यास २०२३ ही मुदत दिली आहे. त्यामुळे मुरबाड रेल्वे मार्ग होणार, यात शंका नाही.
- मनोहर शेलार, संस्थापक,
उपनगरी रेल्वे प्रवासी महासंघ

निवडणुकीसाठी
दाखविलेले गाजर
कल्याण-मुरबाड रेल्वे मार्गाचा
विषय अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. मात्र, याला परवानगी मिळत नव्हती. सरकारने आचारसंहितेच्या आधीच हा निर्णय घेऊन कल्याण-मुरबाड येथील नागरिकांना खूश करण्याचा प्रयत्न केला आहे. घोषणा आणि आश्वासने देऊन निवडणूक जिंकण्यासाठी सर्व प्रयत्न सुरू आहे. सरकारने याआधीच निर्णय घेऊन प्रकल्प पूर्ण करणे अपेक्षित होते. मात्र, असे झाले नाही. त्यामुळे कल्याण-मुरबाड रेल्वे मार्ग निवडणुकीसाठी दाखविलेले गाजर आहे.
- दीपेश जाधव, कल्याण

घोषणा सत्यात
उतरविणे आवश्यक
सद्य:स्थितीत उपनगरीय रेल्वे सेवेचा विस्तार करण्यासाठी मुरबाड आणि अलिबाग नवीन पॅसेंजर ट्रेन सुरू करण्याची योजना रेल्वेने आखली आहे. अलिबाग ते मुंबई हा प्रवास जलद व्हावा, यासाठी अलिबाग ते पेण असा रेल्वे मार्ग उभारण्यात येणार आहे. मात्र, पेण आणि पनवेलहून रस्ते मार्गाने अलिबाग गाठण्यासाठी वेळ लागतो. समुद्र किनारा लाभलेल्या आणि थंड हवेचे क्षेत्र असल्याने रेल्वेतून प्रवास करताना पर्यटकांना निसर्ग सौंदर्याची पर्वणी मिळेल. अलिबागमध्ये रेल्वे जाळे केल्यास मुंबईकरांसाठी अधिक लाभदायी ठरेल. कल्याण ते मुरबाड लोकल सेवा सुरू केल्यास प्रवाशांना फायदा आहे. मात्र, राजकीय नेत्यांकडून दिल्या गेलेल्या घोषणा सत्यात उतरविणे आवश्यक आहे.
- कमलाकर जाधव,
बोरीवली (पू)
वाहतुकीसाठी नवा
पर्याय उपलब्ध होणार
रेल्वेची परिस्थिती सुधारत आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी गाड्यांसह डब्यांची संख्या वाढविली जात आहे. मात्र, गर्दीचे प्रमाण कमी होत नाही. रेल्वे मार्गाचा विकास केला जात आहे. त्यामुळे कल्याण-मुरबाड रेल्वे मार्ग सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे या भागातील रहिवाशांना वाहतुकीसाठी नवा पर्याय उपलब्ध होईल. तसेच रेल्वे प्रशासन आणि सरकारने देशवासीयांचा विचार केला तर अनेक प्रकल्प सत्यात उतरतील. यासह वसई-विरारमधील प्रवाशांना ठाण्याला जाण्यासाठी खूप लांबचा प्रवास करून ठाणे गाठावे लागते. मात्र, वसई-विरार आणि ठाणे अशी लोकल सेवा सुरू केल्यास प्रवाशांचे हाल कमी होतील.
- शुभांगी गुरव, वसई-विरार

कल्याण स्थानकाचे विस्तारीकरण करणे गरजेचे
कल्याण-मुरबाड रेल्वे मार्ग हा व्हाया उल्हासनगर येथून नेण्यापेक्षा व्हाया टिटवाळा, गुरगाव नेणे आवश्यक होते. त्यामुळे येथील ग्रामीण भागाचा विकास झाला असता. मात्र, उल्हासनगर मार्गे रेल्वे नेल्यामुळे तेथील विकासकांचा फायदा होणार आहे. प्रशासनाने विकासकांचा विचार करून त्यांच्यासाठी व्हाया उल्हासनगर रेल्वे मार्ग नियोजित केला आहे. टिटवाळा मार्गे लोकलचे नियोजन केल्यास ग्रामीण भाग शहरी भागाला जोडला जाईल. ग्रामीण भागातील नागरिकांना रोजगार उपलब्ध होईल. येथील प्रत्येक गावाला याचा फायदा होईल. यासह टिटवाळा आणि खडावली ही पर्यटन स्थळे आहेत. याठिकाणी अनेक पर्यटक धरण, मंदिरात येतात. त्यामुळे येथील स्थानिकांना येथून मार्गिका नेल्यास लाभ होईल. कल्याण हे एक जंक्शन आहे. त्यामुळे येथे अजून एक मार्ग उभारल्यास कल्याण स्थानकावर गर्दीचा भार येईल. त्यामुळे कल्याण स्थानकाचे आधी विस्तारीकरण करणे गरजेचे आहे.
- नंदकुमार देशमुख, अध्यक्ष,
उपनगरी रेल्वे प्रवासी महासंघ
मुदतीचे पालन करून प्रकल्प पूर्ण करावा!
कल्याण आणि मुरबाड रेल्वे मार्ग सुरू झाल्यास येथील शेतकऱ्यांना खूप मोठा फायदा होईल. शेतकºयांना जोडधंदा करण्यास प्राधान्य मिळेल. रेल्वे मार्गात येणाºया गावांना याचा फायदा होणार आहे. येत्या २०२३ पर्यंत रेल्वे मार्ग पूर्ण करण्याची अंतिम मुदत आहे. या अंतिम मुदतीचे पालन करून प्रकल्प लवकर पूर्ण करणे अपेक्षित आहे. कल्याणहून कर्जत, कसारा आणि मुरबाड मार्ग झाल्यास कल्याणवर गर्दीचा ताण वाढेल. यासह येथील लोकसंख्येचा भार इतर वाहतुकीवर पडेल. त्यामुळे कल्याण स्थानकाची विस्तृत स्वरूपात उभारणी करून प्रवाशांसाठी सुसज्ज कल्याण स्थानक बनविणे आवश्यक आहे.
- दीपक मोरे, उल्हासनगर

Web Title: Murbad, Alibaug Railway should start

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.