Karjat Market closed, Bhima Koregaon's incident took place | कर्जत बाजारपेठ बंद, भीमा कोरेगाव येथील घटनेचे उमटले पडसाद

कर्जत : पुणे-नगर महामार्गावरील भीमा कोरेगाव येथे घडलेल्या घटनेचा कर्जत तालुक्यातील आंबेडकर अनुयायी संघटनांनी जाहीर निषेध केला आहे. या वेळी तीन तास कर्जत बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती.
भीमा-कोरेगाव येथे घडलेल्या घटनेचा तालुक्यातील आरपीआय, भारिप, बहुजन समाज पार्टी, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष, भारतीय बौद्ध महासभा या आंबेडकर अनुयायी संघटनांनी जाहीर निषेध केला. या वेळी राहुल डाळींबकर, अरविंद मोरे, उत्तम जाधव, प्रभाकर गोतारणे, कैलास मोरे, रूपेश डोळस आदींसह आंबेडकर अनुयायी मोठ्या संख्येने जमा झाले होते. त्यांनी व्यापारी फेडरेशनला विनंती करून कर्जत बाजारपेठ दुपारी २ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत बंद ठेवण्याचे आवाहन केले. त्याप्रमाणे बाजारपेठ बंद करण्यात आली होती.
आंबेडकर अनुयायांच्या वतीने कर्जत प्रांत कार्यालयात निवेदन देण्यात आले. या निवेदनात भीमा-कोरेगाव येथील प्रकरणी संबंधितांवर अ‍ॅट्रॉसिटीअंतर्गत कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

बंदची हाक
पनवेल : रायगड रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (आठवले गट) यांनी बुधवारी पनवेल बंदची हाक दिली. नागरिकांनी सकाळी ७ ते दुपारी १२ वाजेपर्यंत बंद ठेवावा असे आवाहन रिपाइंचे जिल्हाध्यक्ष नगरसेवक जगदीश गायकवाड यांनी पनवेल येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये केले आहे.

माणगाव, गोरेगाव, लोणेरे बंद

माणगाव : भीमा कोरेगाव येथे विजयस्तंभ अभिवादन दिनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या दोन गटातील जुन्या वदावरून पुन्हा वाद उफाळला. या भ्याड हल्ल्यांच्या निषेधार्थ माणगाव तालुक्यात माणगाव, गोरेगाव व लोणेरे येथील बाजारपेठ ३ जानेवारी रोजी बंद राहणार आहे.
मनुवादी लोकांच्या विरोधात जाहीर निषेध व्यक्त करण्यासाठी माणगाव, गोरेगाव व लोणेरे येथील बाजारपेठ बंद ठेवून पंचशील बौद्धजन समिती गोरेगाव, रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया, बौद्धजन पंचायत समिती गोरेगाव आदींच्या वतीने निषेध करणार आहेत.

भीमा कोरेगाव येथील घटनेचा सुधागड बौद्धजन पंचायतीच्या वतीने निषेध

१पाली : भीमा कोरेगाव विजयस्तंभास १ जानेवारी रोजी २०० वर्षे पूर्ण होत असतानाच भीमा कोरेगाव येथे सोमवारी झालेल्या दंगलीमुळे गालबोट लागले. या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ सुधागड बौद्धजन पंचायतीच्या नेतृत्वाखाली भीमबांधवांनी परळी-पेडली-पाली अशी निषेध रॅली काढून घोषणाबाजी करत, पाली तहसीलदार व पाली पोलीस निरीक्षक यांनी हा भ्याड हल्ला करणाºयांवर कारवाई करावी, यासाठी निवेदन दिले.
२या भ्याड हल्ल्यात अनेक वाहनांची जाळपोळ व तोडफोड केली आहे, तसेच एका तरु णाचा या घटनेत मृत्यू झाला आहे. अशा प्रकारे जातीय भांडणे लावून देणाºया समाजकंटकांवर शासनाने तत्काळ गुन्हे दाखल करावे, असे निवेदन नमूद करुन पाली तहसीलदार बी. एन. निंबाळकर व पाली पोलीस निरीक्षक दशरथ पाटील यांना देण्यात आले. या वेळी सुधागड बौद्धजन पंचायतीचे अध्यक्ष दीपक पवार, आरपीआय तालुकाध्यक्ष राहुल सोनावळे आदींसह आरपीआय कार्यकर्ते, बहुजन विद्यार्थी संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.