बांधफुटीचा आरोग्यावरही परिणाम; उपाययोजनेची आरोग्य विभागाकडे मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 03:06 AM2018-02-16T03:06:12+5:302018-02-16T03:06:21+5:30

गेल्या काही महिन्यांत पेण व अलिबाग तालुक्यामध्ये धरमतर खाडी किनारच्या गावांतील समुद्र संरक्षक बंधारे पौर्णिमा व अमावस्येच्या मोठ्या सागरी उधाणाने फुटून समुद्राचे पाणी भातशेती क्षेत्रात घुसून तेथेच साचून राहत आहे. यामुळे या दोन्ही तालुक्यातील खाडी किनारच्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात डासांची उत्पत्ती होवून, डास चावल्याने मलेरियाची साथ येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

 Impact on damfood health; Demand for the Measures Health Department | बांधफुटीचा आरोग्यावरही परिणाम; उपाययोजनेची आरोग्य विभागाकडे मागणी

बांधफुटीचा आरोग्यावरही परिणाम; उपाययोजनेची आरोग्य विभागाकडे मागणी

Next

अलिबाग : गेल्या काही महिन्यांत पेण व अलिबाग तालुक्यामध्ये धरमतर खाडी किनारच्या गावांतील समुद्र संरक्षक बंधारे पौर्णिमा व अमावस्येच्या मोठ्या सागरी उधाणाने फुटून समुद्राचे पाणी भातशेती क्षेत्रात घुसून तेथेच साचून राहत आहे. यामुळे या दोन्ही तालुक्यातील खाडी किनारच्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात डासांची उत्पत्ती होवून, डास चावल्याने मलेरियाची साथ येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अलिबाग तालुक्यातील खारेपाटातील गावे व शेती उच्चतम भरती रेषेच्या दोन मीटर खाली आहे. मागील महिन्यात याच गावाच्या संरक्षक बंधाºयांना खांडी जाऊ न प्रथमत: एक हजार एकर भातशेतीमध्ये व नंतर घरांच्या अंगणामध्ये पाणी आले होते. हे पाणी तसेच साचून राहिल्याने येथे डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात झाली आहे. घरांमध्ये दिवसादेखील डासांमुळे जीवन असह्य झाले आहे. सध्या इ. १२ वीची परीक्षा चालू आहे व थोड्याच दिवसात इ. १० वीची परीक्षा सुरू होईल. विद्यार्थ्यांना अभ्यास करता येणे या डासांच्या प्रादुर्भावामुळे अशक्य झाले आहे. त्याचबरोबर दुभती जनावरे यांना देखील याचा त्रास होत असल्याचे श्रमिक मुक्ती दलाचे रायगड जिल्हा समन्वयक राजन भगत यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन देसाई यांना दिलेल्या तक्रार निवेदनात नमूद केले आहे.
मोठे शहापूर, धाकटे शहापूर व धेरंड या गावातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला असून जिल्हा आरोग्य यंत्रणेमार्फत वेळीच जर धूर फवारणी किंवा इतर काही मार्गाने डासांच्या उत्पत्तीला आळा घालता आला नाही तर बºयाच मोठ्या प्रमाणात जनतेला विविध आजारांना सामोरे जावे लागेल,अशी भीती या निवेदनात नमूद करण्यात आली आहे. आरोग्य विभागाची यंत्रणा या गावांमध्ये आल्यास त्यांनी अमरनाथ भगत, केसरीनाथ भोईर वा आत्माराम गोमा पाटील यांच्याशी संपर्क साधल्यास डासांच्या या प्रादुर्भावाची ठिकाणे व परिस्थिती ते दाखवू शकतील असेही नमूद करण्यात आले आहे. या निवेदनाच्या प्रती शहापूर ग्रामपंचायत आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक यांनाही देण्यात आल्या आहेत.

मलेरिया-डेंग्यूची भीती
१पेण तालुक्यातील धरमतर खाडी किनारच्या गडब ते कासू दरम्यानच्या दहा गावांचे समुद्र संरक्षक बंधारे उधाणाच्या भरतीने फुटून समुद्राचे घुसलेले पाणी एकूण २ हजार ७०० एकर भातशेती क्षेत्रात साचून राहिल्याने मोठ्या प्रमाणात काळे मोठे डास निर्माण झाले आहेत.
२घरात माणसांना बसता येत नाही. डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने या गावांमध्ये मलेरिया, डेंग्यूसारख्या रोगांचा धोका निर्माण झाला आहे. या समस्येला आळा घालण्याकरिता तत्काळ डास प्रतिबंधक फवारणी करावी, अशी मागणी कासू(पेण) विभागातील खार डोंगर मेहनत आघाडीचे अध्यक्ष पांडुरंग तुरे, सामाजिक कार्यकर्ते अरुण शिवकर, काराव ग्रामपंचायत उपसरपंच नितीन पाटील, ग्रामपंचायत सदस्या प्रीती कोठेकर आदिंनी पेण उप विभागीय महसूल अधिकारी प्रतिमा पुदलवाड यांच्याकडे केली आहे.

डासांच्या प्रादुर्भावाच्या या समस्येबाबत आम्ही जिल्हा आरोग्य अधिकाºयांच्या माध्यमातून उपाययोजना करण्याबाबत सूचित केले आहे.
- सागर पाठक, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी

समुद्राचे पाणी खारे असते. त्यामध्ये डासांची उत्पत्ती खरेतर होवू शकत नाही. तरी सुद्धा याबाबत चौकशी करून संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून संबंधित गावांमध्ये उपाययोजना करण्यात येईल. दरम्यान, डासांच्या नियंत्रणाकरिता स्वतंत्र विभाग असून त्यांनाही कळविण्यात येईल.
- डॉ. सचिन देसाई,
जिल्हा आरोग्य अधिकारी

Web Title:  Impact on damfood health; Demand for the Measures Health Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड