कळंबोलीमध्ये महामार्ग ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 12:39 AM2018-07-26T00:39:36+5:302018-07-26T00:40:01+5:30

मराठा आंदोलनामुळे नवी मुंबईसह पनवेलमधील सर्व व्यवहार दिवसभर ठप्प झाले होते.

Highway jam at Kalamboli | कळंबोलीमध्ये महामार्ग ठप्प

कळंबोलीमध्ये महामार्ग ठप्प

Next

नवी मुंबई/ पनवेल : मराठा आंदोलनामुळे नवी मुंबईसह पनवेलमधील सर्व व्यवहार दिवसभर ठप्प झाले होते. रस्ते व ट्रान्सहार्बर मार्गावरील वाहतूक बंद झाली होती. बाजार समितीसह सर्व प्रमुख बाजारपेठांमध्ये शुकशुकाट निर्माण झाला होता. कोपरखैरणे व कळंबोलीमध्ये जाळपोळीसह दगडफेक झाल्यामुळे शहरामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
राज्यातील आंदोलनाचे सर्वात तीव्र पडसाद नवी मुंबई व पनवेलमध्ये उमटले. मराठा समाजाच्या सर्व संघटना, लोकप्रतिनिधी व नागरिकांनी उत्स्फूर्तपणे आंदोलनामध्ये सहभाग घेतला होता. पनवेलमधील आंदोलकांनी सकाळीच कळंबोलीमध्ये महामार्ग रोखला. ‘एक मराठा, लाख मराठा’च्या घोषणा देत, आंदोलकांनी ठिय्या मांडला. खारघर, कळंबोली, कामोठेसह पूर्ण पनवेलमधील सर्व दुकाने बंद करण्यात आली होती. स्टील मार्केटसह सर्व व्यवहार ठप्प झाले होते. कळंबोलीमध्ये महामार्ग रोखल्यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवर शुकशुकाट निर्माण झाला होता. कळंबोलीमध्ये आंदोलक व पोलिसांमध्ये धुमश्चक्री झाली.
नवी मुंबईमध्येही कडकडीत बंद पाळण्यात आला. मुंबईच्या धान्याचे कोठार समजल्या जाणाºया मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजी मार्केटमध्ये मालाची आवक झाली; परंतु ग्राहकच नसल्यामुळे माल पडून होता. इतर चार मार्केटमधील व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले होते. सीबीडी, नेरुळ, सानपाडा, शिरवणे, वाशी, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोलीसह सर्व विभागामधील दुकाने पूर्णपणे बंद होती. स्कूलबस बंद असल्यामुळे मुलांना चालत शाळेत जावे लागले व चालतच घरी जावे लागले. रिक्षा, बस वाहतूकही जवळपास बंद होती. मेडिकल व रुग्णालय वगळता सर्व व्यवहार ठप्प झाले होते. बेस्ट व एनएमएमटीच्या बसेसही फोडण्यात आल्या होत्या. सर्व प्रमुख रस्ते आंदोलकांनी रोखून धरले होते. कोपरखैरणेमध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली होती.

महामार्गावर शुकशुकाट
दासगाव : संपूर्ण महाराष्ट्रात मराठा क्रांती मोर्चाचा संताप दिसून येत असतानाच महाडमध्ये मात्र शांततेत मोर्चा निघाला. मात्र, गेले दोन दिवस सुरू असलेल्या या मोर्चाला हिंसक वळण लागल्याने मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक मंदावली होती.
ठिकठिकाणी निघालेल्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर महामार्गावर शुकशुकाट दिसून येत होता. महामार्गावर असलेली हॉटेल आणि इतर दुकाने सुरू असली तरी महामार्गावर वाहनांची संख्या कमी असल्याने त्यांच्या व्यवसायावर देखील परिणाम झाला. महामार्ग पोलीस देखील या पार्श्वभूमीवर महामार्गावर लक्ष ठेवून असल्याचे दिसले.

महाड-बिरवाडीत मुख्यमंत्र्यांना विरोध
बिरवाडी : मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाचा अंत पाहू नये, असा गंभीर इशारा महाडचे आ. भरत गोगावले यांनी महाडमधील सकल मराठा मोर्चा प्रसंगी दिला आहे. महाडमध्ये शांततेत मोर्चा झाला असला, तरी मराठा आरक्षणाबाबत सरकारने योग्य दखल न घेतल्यास महाड पेटायला वेळ लागणार नाही, असा सतर्क तेचा इशारा आ. भरत गोगावले यांनी पोलीस प्रशासन व शासनाच्या अन्य वर्गाला दिला आहे.
महाड शहरातील शिवाजी चौक येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आ. भरत गोगावले यांच्या नेतृत्वाखाली २५ जुलै २०१८ रोजी सकाळी सकल मराठा मोर्चा बाजारपेठ मार्गे, ‘एक मराठा, लाख मराठा’ अशा घोषणा देत, महाड प्रांत कार्यालयात दाखल झाल्यानंतर, महाडचे प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांना मोर्चाच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले.
या निवेदनात मुख्यमंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. मराठा आरक्षणाचा निर्णय न झाल्यास पोलीस प्रशासनाने आमच्याकडून सहकार्याची अपेक्षा करू नये, असे स्पष्ट करताना समाजापेक्षा सत्ता आणि पद महत्त्वाचे नसून, पक्षीय जोडे बाजूला ठेवून मराठा समाजाच्या तरुणांच्या उज्ज्वल भवितव्याकरिता मराठा आरक्षण मोर्चात सहभागी झालेल्या महिला व समाज बांधवांना धन्यवाद देऊन व्यापारी वर्गाने केलेल्या सहकार्याबद्दल गोगावले यांनी आभार व्यक्त केले.
 

Web Title: Highway jam at Kalamboli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.