Free seats of Mahad MIDC Drainage | महाड एमआयडीसीतील मोकळ्या जागांचे झाले गटार

सिकंदर अनवारे 
दासगाव : पावसाळा संपून दीड महिना झाला. आता ग्रामीण भागातून वाहणारे नाले आणि शेतजमिनी कोरड्या झाल्या आहेत. मात्र, महाड औद्योगिक वसाहतीमध्ये पाण्याची अशी कुपी सापडली आहे की, महाड औद्योगिक वसाहतीमधील मोकळ्या जागा, गटारनाले पाणी भरून वाहत आहेत. कारखान्यांच्या संरक्षण भिंतीबाहेर गटाराला एकही पाण्याचा थेंब येता कामा नाही, असा औद्योगिक वसाहतीचा नियम आहे. मात्र, या नियमांची पायमल्ली करत कारखानदार गटार आणि नाल्यामध्ये पाणी सोडण्याचे काम करत आहेत. कारखान्याच्या या गोरखधंद्याकडे महाराष्टÑ औद्योगिक विकास महामंडळ आणि प्रदूषण नियंत्रण महामंडळ यांचे दुर्लक्ष होत आहे.
प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी कारखान्यांच्या बाहेर गटार अगर नाल्यांना पाण्याचा एकही थेंब येता कामा नये, असा नियम महाराष्टÑ औद्योगिक विकास महामंडळाने कारखानदारांना घालून दिला आहे. कारखाने आणि रस्ते यांच्यामध्ये छोटे गटार अगर नाल्यातून केवळ पावसाळी पाणी वहावे हीच अपेक्षा आहे. मात्र, महाराष्टÑ औद्योगिक वसाहतीमधील कारखान्याबाहेरील गटार अगर नाले वर्षाच्या बाराही महिने पाण्याने भरून वाहत आहेत. हे नाले अगर गटार पुढे जाऊन मोकळ्या जागांना तलावाचे स्वरूप निर्माण झाले आहे. मोकळ्या जागांमध्ये साचलेल्या पाण्यामध्ये केमिकलचा अंश असल्याचे पाण्याचा रंग आणि त्यावर निर्माण झालेला तवंग दिसून येत आहे.
औद्योगिक वसाहतीमध्ये होणारी प्रत्येक गोष्ट ही प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महाराष्टÑ औद्योगिक वसाहती महामंडळाच्या अखत्यारित येते. यासाठी दोन्ही विभागाक डे तज्ज्ञ स्टाफ (मानस) आहेत. असे असले तरी देखील औद्योगिक वसाहतीतील हे नाले अगर गटार वाहताना दिसत आहेत. याकडे मात्र कोणाचे लक्ष नाही. अधिकारी कारवाई करत नाही हा एक भाग असला तरी कारखानदार देखील नियमांची पायमल्ली करत आहेत.

दुर्गंधी, मच्छरांचा त्रास
औद्योगिक वसाहतीतील मोकळ्या जागांमध्ये साचलेले पाणी सर्वच ठिकाणी प्रदूषित आहे. यामुळे येथील नागरिक आणि कामगारांना याचा त्रास सहन करावा लगात आहे. प्रदूषित पाणी उन्हात तापून रासायनिक दुर्गंधी निर्माण करीत आहे, तर प्रदूषित नसलेले पाणी मच्छर आणि जंगली कीटकांच्या पैदासीचे कारण ठरत आहे. यामुळे या मोकळ्या जागा भराव टाकून भरून घ्याव्यात आणि उन्हाळ्यामध्ये गटारांमधून वाहणारे पाणी बंद करावे, अशी मागणी जोर धरत आहे.