महाड एमआयडीसीत बंद कारखान्यात आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 11:36 PM2019-07-11T23:36:08+5:302019-07-11T23:36:50+5:30

भंगार व्यावसायिकांमुळे सुरक्षा वाऱ्यावर : काही तासांत आगीवर नियंत्रण

Fire at closed factory in Mahad MIDC | महाड एमआयडीसीत बंद कारखान्यात आग

महाड एमआयडीसीत बंद कारखान्यात आग

Next

दासगाव : महाड औद्योगिक क्षेत्रातील सिल्वो लायकल या बंद कारखान्यात बुधवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. आग लागल्याचे निदर्शनास येताच तत्काळ अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. काही तासातच ही आग आटोक्यात आणली. मात्र, आगीचे कारण बेजबाबदारपणे होत असलेले भंगार तोडकाम असल्याचे बोलले जात आहे. परिस्थिती नियंत्रणात आली नसती तर मोठी हानी झाली असती.


महाड एमआयडीसीमधील सिल्वो लायकल ही कंपनी गेल्या २० वर्षांपासून बंद आहे. या बंद कंपनीतील भंगार काढण्याचे काम सध्या सुरू आहे. यामुळे जागोजागी वेल्डिंग आणि इतर कामे सुरू आहेत. या कंपनीत बुधवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. आगीचे कारण समजले नसले तरी त्या ठिकाणी सुरू असलेले भंगार तोडकाम यामुळे ही आग लागली असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ज्या ठिकाणी आग लागली त्या ठिकाणी या बंद कंपनीचे रसायनाने भरलेले ड्रम होते. मात्र, आग तत्काळ आटोक्यात आणल्याने मोठी हानी टळली आहे. महाड औद्योगिक महामंडळाच्या अग्निशमन विभागाने ही आग आटोक्यात आणली.


ही कंपनी बंद होऊन २० वर्षे झाली आहेत. या कारखान्यात रसायनाने भरलेले ड्रम आजही त्या ठिकाणी आहेत. मात्र, हे ड्रम त्याच कारखान्याचे आहेत की इतर कोणाचे आणि त्यात कोणते रसायन आहे हे अद्याप कळले नाही. मात्र, कंपनीत विविध ठिकाणी रसायनाने भरलेल्या गोणी, ड्रम तसेच पडून आहेत. महाड एमआयडीसीमध्ये अनेक बंद कारखान्यात अशीच अवस्था आहे. यामुळे ऐन पावसाळ्यात यातील रसायन पाण्यामुळे बाहेर पडत असते. तर कारखाना बंद असल्याने स्थानिक नागरिकांची जनावरे या ठिकाणी वावरत असतात. याचा त्रास जनावरे आणि नागरिकांना होऊ शकतो. याबाबत महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने लक्ष देणे गरजेचे आहे. या बंद कंपनीत भंगार व्यावसायिक भंगार तोडण्याचे असुरक्षित काम करत आहेत. या कामगारांकडे कोणतीच सुरक्षा साधने दिसून येत नसल्याने कामगार सुरक्षा विभागाने कारवाई करण्याची मागणी होत आहे.


महाड औद्योगिक क्षेत्रात भंगार व्यावसायिकांचा शिरकाव आहे. कारखानदार कारखाने सुरू असतानाही आपल्या कारखान्यात नेहमी भंगार तोडफोडीचे काम करत असतात. यापूर्वीही अनेक घटना भंगार तोडकाम करत असताना घडल्या आहेत. यामध्ये मजुरांचे जीव गेले आहेत. कारखान्याची सुरक्षा ही कामगार सुरक्षा विभागाकडे असून त्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. अशा होणाºया घटनांना कारखानदार आणि भंगार व्यावसायिक जबाबदार असल्याचे दिसून येत आहे, अशा बेजबाबदारपणामुळे कधीही आगडोंब होण्यास वेळ लागणार नाही. यावर संबंधित प्रशासनाने जातीने लक्ष घालावे, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
या कंपनीत होणारे स्फोट आणि प्रदूषणाबाबत अनेकदा स्थानिकांनी तक्रारीही केल्या आहेत; परंतु अद्याप याबाबत कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. औद्योगिक सुरक्षा विभाग आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी तातडीने याबाबत कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

खोपोलीतील इंडिया स्टील कंपनीत स्फोट
खोपोली शहरातील इंडिया स्टील वर्क्स लिमिटेड या कंपनीत बुधवारी मध्यरात्री १.३० वाजताच्या सुमारास झालेल्या तीन स्फोटांनी कंपनीत आग लागली. स्फोटांमुळे खोपोली शहराच्या अनेक भागात हादरे बसले. खोपोली नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. साधारणपणे दीड तासात आगीवर नियंत्रण मिळविण्यात यंत्रणांना यश आले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. कंपनीच्या आजूबाजूच्या परिसरातील काही इमारतींना व घरांना तडे गेल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. एप्रिल महिन्यातही दुपारी या कंपनीत मोठा स्फोट झाला होता. या कंपनीत वारंवार अशा घटना घडत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते संदेश धावारे यांनी सांगितले. विहारी, सिद्धार्थनगर, लक्ष्मीनगर येथील नागरिक भीतीच्या वातावरणात राहत आहेत.

Web Title: Fire at closed factory in Mahad MIDC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :fireआग