पेण विधानसभा मतदारसंघात उत्साह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 11:14 PM2019-03-12T23:14:44+5:302019-03-12T23:15:01+5:30

पेणमध्ये सर्वात जास्त मतदारसंख्या; मतदारांना वळवण्यासाठी युती, आघाडीला करावे लागणार परिश्रम

Enthusiasm in Pen Assembly constituency | पेण विधानसभा मतदारसंघात उत्साह

पेण विधानसभा मतदारसंघात उत्साह

Next

- दत्ता म्हात्रे

आधीच फाल्गुन मास, त्यात लोकसभा निवडणुकीचा उल्हास, या तत्त्वानुसार पेण, पाली-सुधागड, रोहा विधानसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुका जाहीर होताच उत्साही वातावरण दिसत आहे. रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये सर्वात जास्त मतदारसंख्या असलेला पेण विधानसभा मतदारसंघ आहे. येथील मतदारांचे मतदान विजयात नेहमीच निर्णायक ठरत असल्यामुळे युती विरुद्ध आघाडीच्या उमेदवारांना पेण विधानसभा मतदार संघातील मते आपल्याकडे वळवून घेण्यासाठी अथक प्रयत्न करावे लागतील. यामध्ये युतीचे अनंत गीते व आघाडीचे सुनील तटकरे या दोन आजी-माजी मंत्र्यांचा कस लागणार आहे, त्यात कोण बाजी मारतो हे येणाऱ्या सत्तर दिवसांच्या कालावधीत स्पष्ट होणार आहे.

रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये केंद्रीय मंत्री अनंत गीते विरुद्ध राज्याचे माजी मंत्री व राष्टÑवादीचे सुनील तटकरे यांची थेट लढत होणार हे जगजाहीर झाले आहे. त्या अनुषंगाने युती व आघाडीचे कार्यकर्ते, पदाधिकारी लोकसभा निवडणुकीच्या तयारीला ताकदीने उतरले आहेत. सद्यस्थितीत दोन्ही गटाकडून क्रीडा स्पर्धा, विकासकामांची उद्घाटने, पक्षप्रवेश व आपल्या पक्षासह, मित्रपक्ष व विरोधी पक्षातील कार्यकर्ते यांच्या भेटीगाठी घेण्याचा एककलमी कार्यक्रम जोशात सुरू आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत पेण मतदारसंघात मोदी लाटेच्या परिणामस्वरूप युवा जनरेशनचा कल शिवसेनेचे अनंत गीते यांना मिळाला. ६९ हजार मताधिक्य घेत त्यांनी सुनील तटकरेंवर नऊ हजारांची आघाडी मिळविली होती. तटकरे यांना ६१,९६८ मते मिळाली होती. त्या आघाडीच्या आधारावरच अनंत गीते यांचा अटीतटीच्या लढतीत विजय मिळाला होता. परंतु पेणकरांना अनंत गीते यांच्याकडून या विजयाचे असे कोणतेही अनोखे गिफ्ट मिळालेले नाही. याबाबत गीतेंवर मतदारांची नाराजी आहे.

पेण मतदारसंघात ३ लाख मतदारसंख्या असून १ जानेवारी २०१९ पर्यंत २ लाख ९८ हजार ६६ मतदार असल्याचे निवडणूक आयोगाच्या यादीमध्ये नोंद झालेली आहे. दरम्यान, अजूनही मतदार नोंदणी कार्यक्रम सुरू असल्याने ही संख्या ३ लाखांच्या आसपास जाणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. यामध्ये पुरुष १ लाख ५० हजार ५८५ तर स्त्रिया १ लाख ४७ हजार ४३१ मतदार मिळून २ लाख ९८ हजार ६६ एकूण मतदार संख्येचा समावेश आहे. पेण विधानसभा मतदार संघाचे चित्र पाहता येथील स्थानिक उमेदवार नसल्याने युती व आघाडीच्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांची जोरदार तयारी सुरू आहे.

युती, आघाड्यांचे पक्षीय बलाबल
शिवसेना-भाजपा युतीमध्ये उत्साहाचे वातावरण म्हणजे काँग्रेसचे माजी मंत्री रविशेठ पाटील यांचा भाजपाप्रवेश. २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीच्या वेळी सुनील तटक रेंचा प्रचार करण्यात रविशेठ पाटील यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांचे तटकरेंना मोठे समर्थन मिळाले. परिणामी ६४,००० मते त्यांनी तटकरेंना पेण मतदारसंघातून मिळवून दिली होती. तेच रविशेठ पाटील आता तटकरेंविरोधात दंड थोपटत भाजपामध्ये गेल्याने अनंत गीते यांना मोठी जमेची बाजू मिळाली आहे.
दुसरीकडे गतवेळच्या निवडणुकीत शेकापने तटकरेविरोधात उमेदवार उभा केल्याने पेणमध्ये ३५,००० मतांचा फटका तटकरेंना बसला. आता राजकीय पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले असून शेकाप-राष्टÑवादी आघाडीची गळाभेट तटकरेंसाठी मोठी जमेची बाजू आहे. शेकाप आ. धैर्यशील पाटील यांना विधानसभेच्या निवडणुकीत ६९ हजार मते मिळाली असून त्यांचा मोठा आधार ही तटकरेंसाठी मोठी भूमिका ठरणार आहे.
एकंदर राजकीय बेरजेत युती आघाडी समतोल असून येणाऱ्या काळात राजकीय प्रचारानुसार राजक ीय वातावरण निर्मितीनुसार मतदारांना आपल्याकडे वळवून घेण्यासाठी गीते व तटकरेंना बरेच परिश्रम घ्यावे लागतील. पेण क ाँग्रेस नेतृत्व भाजपात गेल्याने, काँग्रेसला समर्थ नेतृत्व देणारा नेता काँग्रेसकडे नाही. दुसºया फळीतील कार्यकर्ते काँग्रेस पक्षाची मते कशी तटकरेंना मिळवून देतात हा मोठा चर्चेचा विषय राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे काँगे्रसच्या कार्यकर्त्यांना आपल्याकडे वळवून घेण्यास तटकरेंना मोठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

Web Title: Enthusiasm in Pen Assembly constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.