कोथुर्डे धरणातून विसर्ग होणाऱ्या पाण्यावरून वाद : दासगाव, वहूर, केंबुर्लीचा पाणीप्रश्न गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2019 02:27 AM2019-05-08T02:27:12+5:302019-05-08T02:27:39+5:30

- सिकंदर अनवारे दासगाव : महाड तालुक्यातील किल्ले रायगडच्या पायथ्याशी असलेल्या कोथुर्डे धरणातून २२ गावांसाठी पाणीपुरवठा करण्यात येतो. या ...

 Dasgaon, Praetor, Kamburlei water problem critical | कोथुर्डे धरणातून विसर्ग होणाऱ्या पाण्यावरून वाद : दासगाव, वहूर, केंबुर्लीचा पाणीप्रश्न गंभीर

कोथुर्डे धरणातून विसर्ग होणाऱ्या पाण्यावरून वाद : दासगाव, वहूर, केंबुर्लीचा पाणीप्रश्न गंभीर

Next

- सिकंदर अनवारे
दासगाव : महाड तालुक्यातील किल्ले रायगडच्या पायथ्याशी असलेल्या कोथुर्डे धरणातून २२ गावांसाठी पाणीपुरवठा करण्यात येतो. या धरणाच्या पाण्याची पातळी एप्रिल महिन्यातच कमी होऊन या २२ गावांपैकी दासगाव, वहूर आणि केंबुर्ली या तीन गावांना पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण होत असतो. धरणापासून २० किमी एवढ्या अंतरावर असलेल्या या तीन गावांच्या नळपाणी पुरवठा योजनांच्या जॅकवेल आणि या धरणातून सोडण्यात येणारे ७० टक्के वाया जाणारे पाणी हे मूळ कारण आहे. गेली अनेक वर्षे हीच परिस्थिती असल्याने धरण असून देखील पाणीप्रश्न सुटला नाही.
किल्ले रायगडच्या पायथ्याशी महाड शहरापासून २० किमी अंतरावर कोथुर्डे धरण आहे. हे धरण गांधारी नदीशेजारी असलेल्या एका नाल्यावर बांधण्यात आलेले आहे. या धरणावर महाड तालुक्यातील २२ गावांची नळपाणी पुरवठा योजना अवलंबून आहे. या गावांमध्ये दासगाव, वहूर आणि केंबुर्ली या तीन गावांचा समावेश आहे. लघुपाटबंधारे विभागाअंतर्गत असलेल्या या धरणाच्या पाण्याची क्षमता २.७२ दशलक्ष घनमीटर एवढी असून या धरणातून २२ गावांसाठी ०.६ दशलक्ष मीटर एवढीच पाण्याची मागणी आहे. जवळपास सहा वेळा या धरणातून मोठ्या प्रमाणात लघुपाटबंधारे विभागामार्फत पाणी सोडण्यात येते. दासगाव, वहूर आणि केंबुर्ली या तीन गावांच्या गांधारी नदीवर असलेल्या जॅकवेल या धरणापासून जवळपास २० किमी एवढ्या मोठ्या अंतरावर आहेत. धरणातून सुटणारे पाणी हे संपूर्ण नदी भरून येईपर्यंत त्या क्षमतेने ते पाणी जॅकवेलपर्यंत पोहोचत नाही. पाटबंधारे विभागाच्या म्हणण्याप्रमाणे जरी ०.६ दशलक्ष घनमीटर मागणी असली तरी त्यापेक्षा जास्त पाणी सोडण्यात येते व सोडण्यात येणारे पाणी किंवा धरणातील असलेल्या २.७२ दशलक्ष घनमीटर पाण्यामधून जवळपास ७० टक्के पाणी वाया जात आहे. यामुळे या तीन गावांचा पाणीप्रश्न सुटणे कठीण झाले आहे.
दरवर्षी या तीन गावांची एप्रिल आणि मे या दोन महिन्यात नळपाणी पुरवठा योजनेची मोठी बोंबाबोंब असते. या तीन गावांना ही योजना बंद पडल्याने पाणीटंचाईची मोठी झळ बसते. ही परिस्थिती या तीन गावांची कित्येक वर्षांपासून सुरू आहे.
या वर्षामध्ये शासनाने या तीन गावांसाठी कोणती तरी ठोस नवीन उपाय योजना पाण्यावर करणे गरजेचे होते. मात्र, शासन असो वा लोकप्रतिनिधी असो या गावांकडे सपशेल दुर्लक्ष करत आहेत. यंदा देखील दोन महिन्यांपासून येथील गावांची तीच परिस्थिती आहे. सहा वेळा कोथुर्डे धरणातून पाणी सोडण्यात आले असले तरी अद्यापही या तीन गावांच्या नळपाणी पुरवठा योजनांच्या जॅक वेलपर्यंत पाणी पोहोचलेच नाही. सध्या दासगाव, वहूर आणि केंबुर्ली या तीन गावांच्या जॅकवेल कोरड्या पडलेल्या आहेत.

तीन गावांसाठी दोन योजना महत्त्वाच्या
महाड औद्योगिक क्षेत्रातील खैरे धरण हे महाड तालुक्यातील खाडीपट्टा विभागात खैरे या गावालगत आहे. या धरणाची पाण्याची क्षमता १.७९१ दशलक्ष घनमीटर एवढी आहे. हे धरण पाटबंधारे विभागांतर्गत असले तरी या धरणातून २६ गावांना नळपाणी पुरवठा योजनांद्वारे पाणीपुरवठा केला जातो. तो पुरवठा ग्रामीण पाणीपुरवठा खात्यामार्फत केला जातो. या धरणाला थोडी गळती देखील आहे. ती गळती काढण्यात आली तर पाटबंधारे विभागामार्फत देण्यात आलेल्या माहितीप्रमाणे अर्धे रिकामे झाले आहे.
या धरणाची लाइन दासगाव आणि वहूर गावापासून फक्त तीनच किमी गोठे या गावापर्यंत आलेली आहे. या योजनेतून या तीन गावांना पाणी देणे मोठी कसरत करावी लागणार नाही. अनेक वेळा दासगाव विभागातील नागरिकांनी यासाठी तोंडी मागणी देखील केलेली आहे. धरणात एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी असताना देखील या तीन गावांना जवळची योजना टाकून ३० किमी अंतरावरून पाणीपुरवठा करते. तरी जवळच्या या योजनेवर शासनाने लक्ष घालणे गरजेचे आहे.
याचबरोबर पोलादपूरमधील या परिसरातील बाजीरे धरण हे मोठे मानले जाते. महाड औद्योगिक क्षेत्राला याच धरणातून मोठ्या प्रमाणात पाणीपुरवठा केला जातो. औद्योगिक क्षेत्रामध्ये सावित्री नदीवर बंधारा घालत पाणी अडवून संपूर्ण औद्योगिक क्षेत्र आणि परिसरात पुरवतो. दासगाव परिसरातील मागणीनुसार या योजनेवरून देखील माजी जि. प. सदस्य इब्राहिम झमाने यांच्या पाठपुराव्यानंतर पाणी देण्यास औद्योगिक क्षेत्राने मंजुरी दिली होती.
जरी योजना २५ किमीची असली तरी या योजनेवरून पाणीटंचाई कायम दूर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मंजुरीनंतर काम कुठे थांबले अद्याप कळू शकले नाही. सध्याच्या परिस्थितीत या तीन गावांचा पाणीप्रश्न दूर करण्यास या दोन ठिकाणच्या योजना अतिमहत्त्वाच्या आहे. तरी शासन पाणीप्रश्नावर करोडो रुपये खर्च करत नवीन नवीन योजना आखते. मात्र, या तीन गावांकडे दुर्लक्ष करून बसले आहे. नागरिकांकडून खेद व्यक्त करण्यात येत आहे.

सध्या दासगाव, वहूर आणि केंबुर्ली या तीन गावांच्या जॅकवेल कोरड्या पडलेल्या आहेत. यामुळे पुन्हा या तीन गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. आता यापुढे तर बंधाऱ्यांमुळे दरवर्षी या तीन गावांना या कोथुर्डे धरणाच्या पाण्याचा काहीही उपयोग होणार नसल्याने दिसून येत आहे. भविष्यात हीच परिस्थिती कायम राहणार असून नवीन योजनेशिवाय या तीन गावांना पाण्याचा मार्ग उरला नाही. लोकप्रतिनिधी शासनाने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.

कोतुर्डे धरणाचे पाणी मागणी कोटा पाहता महाड नगरपालिका आणि ग्रामपंचायतींना मिळून पुरून उरेल इतके आहे. परंतु ग्रामपंचायतीसाठी गांधारी नदीत पाणी सहा वेळा सोडावे लागते. त्यामुळे नदीतील सोडलेल्या पाण्यापैकी ७० टक्के पाणी वाया जाते. ३० टक्के फक्त वापरण्यात येते. तरी धरणातील जादा पाणी सोडावे लागल्याने पाण्याला तुटवडा येतो.
- प्रकाश पोळ,
शाखा अभियंता,
रायगड पाटबंधारे विभाग

मोग्रज ग्रामपंचायतीमध्ये टंचाई


- विजय मांडे
कर्जत : तालुक्यातील मोग्रज ग्रामपंचायतीमध्ये तीव्र पाणीटंचाईची स्थिती आहे. या ग्रामपंचायतीमधील सर्व गावे आणि आदिवासी वाड्या या शासनाच्या पाणीटंचाई आराखड्यात समाविष्ट आहेत. मात्र, शासनाकडून एकही टँकर पाणी तिकडे पोहचत नसल्याने ग्रामस्थांची गैरसोय टाळण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य आणि पदाधिकाºयांनी स्वखर्चाने टँकर सुरू केले आहेत.
कर्जत तालुक्यातील मोग्रज भागात असलेल्या मेचकरवाडी, जांभूळवाडी, मोग्रजवाडी, आनंदवाडी, मालेगाव, जाधववाडी, आनंदवाडी या आदिवासी वाड्यात आणि मोग्रज, धामणी, पिंगळस, खानंद या गावात पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष आहे. तेथील पिण्याच्या पाण्याची गैरसोय दूर करण्यासाठी शासनाने मार्च महिन्यापासून टँकरचे पाणी देण्याचे नियोजन होते. कर्जत तालुका पाणीटंचाई कृती आराखड्यात या ग्रामपंचायतीमधील सर्व गावांचा समावेश आहे. यातील अनेक गावे आणि वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा करावा यासाठी परवानगी देण्यात आली आहे. मात्र, सरकारी टँकर त्या भागात फिरत नसल्याने पिण्याचे पाणी कुठून आणायचे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
ग्रामपंचायतीच्या सरपंच रेखा देशमुख, उपसरपंच विलास भला आदी सर्व सदस्यांनी ग्रामस्थांची गैरसोय दूर करण्यासाठी आपण पाणीपुरवठा करावा असे ठरले. मात्र, ग्रामपंचायतीची आर्थिक स्थिती टँकर सुरू करण्याएवढी नसल्याने अखेर सर्व सदस्यांनी स्वत:च्या खिशाला चाट देण्याचा निर्णय घेतला आणि पैसे काढले. त्यातून ६ मेपासून मोग्रज ग्रामपंचायतीमधील आदिवासी भागात असलेल्या वाडीत आणि गावात टँकरचे पाणी पोहचत आहे. मेचकरवाडीच्या दोन वाड्या, धामणी, पिंगळस, खानंद या भागात एक मार्ग निश्चित केला आहे. तर दुसरा मार्ग हा मोग्रजवाडी, मोग्रज गाव, आनंदवाडी, जाधववाडी, फणसवाडी, मालेगाव, जांभूळवाडी असे दोन मार्ग निश्चित करण्यात आले असून ग्रामपंचायत सदस्य या सर्व भागात आपल्या खर्चाने टँकर सुरू करून पाणी पुरविणार आहेत.

शासनाच्या टँकरची वाट पाहून कंटाळा आला,त्यात पाण्याची भीषणता आणखी वाढली असल्याने ग्रामस्थांचा पाण्याअभावी मृत्यू होण्याची शक्यता लक्षात घेऊन ट्रँकर सुरू करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. पावसाळा सुरू होईपर्यंत ट्रँकरचे पाणी पोहचविण्याचे नियोजन केले असून तसे आर्थिक नियोजन करण्याचा प्रयत्न आहे.
- विलास भला, उपसरपंच

Web Title:  Dasgaon, Praetor, Kamburlei water problem critical

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.