जिल्ह्यात सायबर क्राईम गुन्हे वाढले, २०२३ या वर्षात ४२ गुन्ह्यांची नोंद

By निखिल म्हात्रे | Published: February 2, 2024 02:27 PM2024-02-02T14:27:13+5:302024-02-02T14:28:21+5:30

यामधील १३ गुन्हे उघड करण्यात पोलिसांना यश मिळाले असून, उर्वरित गुन्ह्यांचा तपास पोलीस करीत आहेत.

Cyber crime crimes increased in the Raigad district, 42 crimes were recorded in the year 2023 | जिल्ह्यात सायबर क्राईम गुन्हे वाढले, २०२३ या वर्षात ४२ गुन्ह्यांची नोंद

प्रतिकात्मक फोटो...

अलिबाग - रायगड जिल्ह्यात सायबर क्राईमचे गुन्हे सातत्याने घडत आहेत. इंटरनेटची उपलब्धता तसेच मोबाईलची वाढती संख्या यामुळे सायबर क्राईमचे लोण सर्वत्र पसरले आहे. २०२३ या वर्षात रायगड जिल्ह्यात सायबर क्राईम निगडित ४२ गुन्हे घडले आहेत. यामधील १३ गुन्हे उघड करण्यात पोलिसांना यश मिळाले असून, उर्वरित गुन्ह्यांचा तपास पोलीस करीत आहेत.

वाढते नागरिकरण तसेच आधुनिक जीवनशैली यामुळे जिल्ह्यात सायबर क्राईमचे गुन्हे सातत्याने घडत आहेत. इंटरनेट तसेच मोबाईलची वाढती संख्या यामुळे सायबर क्राईम वाढत असल्याचे दिसून येते. सायबर क्राईमचे गुन्हे रोखण्यासाठी पोलीस अधिक्षक कार्यालयात सायबर सेल स्थापन करण्यात आला आहे. तसेच सायबर क्राईमसंबंधी वाढते गुन्हे लक्षात घेऊन अशा प्रकारच्या गुन्ह्यांसंबंधी तपास करण्यासाठी जिल्ह्यातील पोलीस कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. मात्र एवढे प्रयत्न करुनही सायबर क्राईमचे गुन्हे सातत्याने घडत आहेत. २०२३ मध्ये सायबर क्राईमचे ४२ गुन्हे घडले आहेत. यामधील १३ गुन्हे उघड करण्यात पोलीसांना यश मिळाले आहे. सायबर क्राईममध्ये परदेशातील तसेच परराज्यातील काही टोळ्या सक्रीय असल्याने पोलीसांना तपास करताना अडचणी निर्माण होत आहेत. 

सायबर गुन्हेगारीचे प्रकार -
- सोशल साईट्सच्या माध्यमातून तरुण, तरुणींना ब्लॅकमेल करणं
- नोकरीविषयक साईट्सवरुन नोकरीच्या आमिषाने पैसे घेऊन फसवणूक करणं
- विवाहविषयक साईट्सवर नोंदणी करणाऱ्या महिलांची आर्थिक फसवणूक
- ई-मेलवर माहिती मागवून त्यांची आर्थिक फसवणूक करणे
- बँकेतून फोन केल्याची बतावणी करत खात्याची सर्व माहिती घेऊन त्याआधारे फसवणूक

लोकांचे दुर्लक्ष सायबर गुन्हे वाढण्यास कारणीभूत -
अनोळखी माणसांना आपल्या एटीएमचा नंबर देऊ नका, असे आवाहन पोलिसांनी अनेकदा केले आहे. वर्तमानपत्रांच्या माध्यमातून हे आवाहन करताना तसे संदेशही अनेकदा मोबाईलवरून देण्यात आले आहेत. मात्र, तरीही त्याकडे दुर्लक्ष करून नागरिक आपला नंबर अनोळखी लोकांकडे देत आहेत. कुठल्याही बँकेचा मॅनेजर फोनवरून एटीएम नंबर विचारत नाही आणि तो विचारूही शकत नाही. याबाबत वारंवार बँकांकडून जागृती केली जाते. तरीही ग्राहक या फसवेगिरीला फसतो आणि दृष्टचक्रात अडकतो.

सोशल नेटवर्किंग साईटवर आपली संपूर्ण माहिती टाकू नका. अनोलखी माणसासोबत चॅटींग करताना त्याला आपले फोटो तसेच वैयक्तिक माहिती देऊ नका असे आवाहनही पोलीस करतात, मात्र याकडेही नागरिक दुर्लक्ष करतात, यामुळे सायबर गुन्हेगारांचे फावत आहे. त्यामुळे नागरीकांनी आपल्याला आलेला ओटीपी कोणालाही  देऊ नये.
- सोमनाथ घार्गे, जिल्हा पोलिस अधिक्षक.
 

Web Title: Cyber crime crimes increased in the Raigad district, 42 crimes were recorded in the year 2023

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.