खड्डेमय रस्ते बनताहेत प्रवाशांसाठी संतापाचे कारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2017 01:35 AM2017-11-09T01:35:40+5:302017-11-09T01:35:48+5:30

गोवा राष्ट्रीय महामार्गासह जिल्ह्यातील रस्त्यांची झालेली अत्यंत धोकादायक दुरवस्था आणि त्यांच्या दुरुस्तीच्या कामात होत असलेली दिरंगाई यामुळे रायगड जिल्ह्यातील नागरिक आणि पर्यटनार्थ येणारे पर्यटक

Causes of anger due to the construction of paved roads | खड्डेमय रस्ते बनताहेत प्रवाशांसाठी संतापाचे कारण

खड्डेमय रस्ते बनताहेत प्रवाशांसाठी संतापाचे कारण

Next

जयंत धुळप
अलिबाग : गोवा राष्ट्रीय महामार्गासह जिल्ह्यातील रस्त्यांची झालेली अत्यंत धोकादायक दुरवस्था आणि त्यांच्या दुरुस्तीच्या कामात होत असलेली दिरंगाई यामुळे रायगड जिल्ह्यातील नागरिक आणि पर्यटनार्थ येणारे पर्यटक यांच्यात आता नाराजी नव्हे तर संताप व्यक्त होत आहे. पेण उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातून प्राप्त माहितीनुसार जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांत नव्याने आलेल्या मोटारसायकल, मोटार कार आणि ट्रान्सपोर्ट व्हेईकल्स यांच्या मालकांनी एकूण २६९ कोटी ७५ लाख रुपयांचा रस्ते कर (रोड टॅक्स) आपल्या वाहनांची पेण उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात नोंदणी करताना सरकारजमा केला आहे. ‘जनतेचे सरकार...आपले सरकार’ असा विकासाचा डांगोरा पिटणाºया सरकारकडे नियमानुसार रस्ते कर भरून देखील सरकार सुस्थितीतील रस्ते वाहन चालकांना उपलब्ध करून देत नाही, या मुद्द्यांवरून आता वाहन चालक व मालक अत्यंत संतप्त मानसिकतेत आहेत.
गेल्या पाच वर्षांत जिल्ह्यातील ६० पेक्षा अधिक वयाच्या नागरिकांमध्ये मणक्यांच्या व्याधी आणि मणक्यामधील फ्रॅक्चर्सच्या प्रमाणात विक्रमी वाढ झाली असल्याची माहिती अलिबागमधील अस्थिरोग तज्ज्ञ डॉ.चंद्रशेखर साठे यांनी दिली आहे. सर्वसाधारणपणे जनसामान्य प्रवासाकरिता एसटी बसचा सर्वाधिक वापर करतात. परंतु ही एसटी बस खड्डे असलेल्या रस्त्यावरून जात असताना त्यामधील प्रवाशांना खड्ड्यांमुळे बसणारे धक्के हे मणक्यांच्या व्याधी आणि मणक्यामधील फ्रॅक्चर्सचे प्रमुख कारण आहेत. ६० वर्षांपेक्षा अधिक वयाच्या नागरिकांमध्ये मुळातच हाडांमधील कॅल्शियमचे प्रमाण कमी झाल्याने काही प्रमाणात हाडे ठिसूळ बनलेली असतात. त्यातच एसटी बस प्रवासात अचानक आणि सातत्याने बसणाºया धक्क्यांमुळे हाडांचे साधे निखळणे, मणके सरकणे, मणक्यांमध्ये गॅप अशा समस्या निर्माण होतात आणि अशा समस्याग्रस्त रुग्णांच्या प्रमाणात गेल्या पाच वर्षांत मोठी वाढ झाली आहे. वैद्यकीय शास्त्रात या व्याधीला ‘आॅस्टीओपोरोटिक फ्रॅक्चर’ असे म्हटले जात असल्याचे डॉ.साठे यांनी सांगितले.
खड्डेमय दुरवस्थेतील रस्त्यावरून कोणतेही वाहन चालवताना, वाहन चालकांना ते अल्पवेगात चालवावे लागते. परिणामी वाहनाचा गेअर पहिला वा दुसरा ठेवावा लागतो. अशा परिस्थितीत वाहन चालवताना पेट्रोल वा डिझेल या इंधनाचा निष्कारण अतिरिक्त वापर होतो आणि त्यातून कार्बन मोनॉक्साईड व अन्य धोकादायक वायू वाहनांच्या सायलेन्सरमधून मोठ्या प्रमाणात वातावरणात मिसळून वायू प्रदूषणाची पर्यावरणीय समस्या गंभीर बनते आहे. श्वसन व डोळ््याचे आजार त्यातून वाढत आहेत असे जे.एस.एम.कॉलेजचे प्राचार्य पर्यावरण तज्ज्ञ डॉ.अनिल पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
रस्त्याच्या दुरवस्थेमुळे एसटी बसच्या टायर्सची झीज होवून ्टायर पंक्चर होण्याच्या प्रमाणात देखील मोठी वाढ झाली आहे.

एसटीला बसतोय फटका : जिल्ह्यातील रस्त्यांच्या गंभीर दुरवस्थेचा सर्वाधिक आर्थिक फटका सरकारच्याच एसटी महामंडळास बसत असून, मुळातच तोट्यात चालणाºया एसटी महामंडळास अधिक तोटा सोसावा लागत असल्याची माहिती राज्य परिवहन मंडळाच्या रामवाडी (पेण) येथील रायगड एसटी विभागीय कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी अजितकुमार मोहिते यांच्याशी संपर्क साधला असता प्राप्त झाली.
 

Web Title: Causes of anger due to the construction of paved roads

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.