शेकडो कोटींच्या चिटफंड घोटाळ्यातील हजारो गुंतवणूकदारांची रक्कम मिळविण्यासाठी शिंदे गटापाठोपाठ भाजपही सरसावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2023 04:16 PM2023-09-05T16:16:43+5:302023-09-05T16:17:05+5:30

मात्र पोलिसांच्या मदतीनेच सत्ताधाऱ्यांनीच सुरू केलेल्या प्रकारामुळे गुंतवणूकदार संभ्रमात.

after the shinde group bjp also rushed to collect the money of thousands of investors in the chit fund scam worth hundreds of crores | शेकडो कोटींच्या चिटफंड घोटाळ्यातील हजारो गुंतवणूकदारांची रक्कम मिळविण्यासाठी शिंदे गटापाठोपाठ भाजपही सरसावली

शेकडो कोटींच्या चिटफंड घोटाळ्यातील हजारो गुंतवणूकदारांची रक्कम मिळविण्यासाठी शिंदे गटापाठोपाठ भाजपही सरसावली

googlenewsNext

मधुकर ठाकूर, उरण : उरणमधील शेकडो कोटींच्या चिटफंड घोटाळ्यातील गुंतवणूकदारांची  रक्कम मिळवून देण्यासाठी शिंदे गटापाठोपाठ आता भाजपने प्रयत्न सुरु केले आहेत.यासाठी पोलिसांच्या मदतीने गुंतवणूकदारांकडून गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केलेल्या रकमेचे फार्म भरुन घेतले जात आहेत. राजकीय आणि आर्थिक स्वार्थापोटी पोलिसांच्या मदतीनेच सुरू असलेल्या या प्रकारामुळे मात्र गुंतवणूकदार संभ्रमात पडले आहेत.

उरण परिसरातील चिटफंड योजनेत झटपट श्रीमंत होण्याच्या हव्यासापोटी गरीब-श्रीमंत अशा हजारोंच्या संख्येने शेकडो कोटी रुपये पिरकोन गावातील सतिश गावंड व कोप्रोली गावातील सुप्रिया पाटील या व्यक्तींकडे गुंतविले आहेत. ऐपत नसतानाही शेकडो गरीबांनी जमीन -जुमला, दागदागिने विकून आणि काहींनी तर उसणवारी,व्याजाने कर्ज काढून ४५ दिवसात दुप्पटीने पैसे मिळतील या आकर्षक लोभाला बळी पडून पैशाची गुंतवणूक केली आहे.कुणी थेट तर कुणी एजंटांच्या मदतीने पैसे गुंतवले आहेत.यामध्ये उरण, पनवेलमधीलच नव्हे तर राज्यभरातील हजारो गुंतवणूकदारांचा समावेश आहे.फसवणुक झालेल्या गुंतवणुकीचा आकडा शेकडो कोटींच्या घरात असल्याचे सांगितले जात आहे.

मात्र दुप्पटीने पैसे मिळतील या आशेवर असलेल्या हजारो गुंतवणूकदारांची मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक झाली असल्याचे निदर्शनास आल्यानंतर मात्र हजारो गुंतवणूकदारांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे.मात्र चिटफंड घोटाळा प्रकरणात गरीब गुंतवणूकदारांचे पैसे अडकून पडले आहेत.सतिश गावंड व सुप्रिया पाटील यांच्या अटकेच्या कारवाईमुळे मात्र प्रकरण न्यायप्रविष्ट झाले आहे.त्यातच चिटफंडातील मुख्य सुत्रधार न्यायालयाकडून मिळालेल्या जामीनानंतर फरार झाला आहे.

या चिटफंड घोटाळ्यात अनेकांनी पैसे गुंतवलेले आहेत.परंतु गुंतवणूक केल्याचे कोणतेही पुरावे हाती नाहीत.त्यामुळे हजारो गुंतवणूकदारांवर तर कपाळावर हात मारुन घेण्याची वेळ येऊन ठेपली आहे.यामध्ये गरिबांची संख्या अधिक आहे. न्यायप्रविष्ठ प्रकरणाचा निकाल कधी लागेल आणि पैसे परत कधी मिळतील,मिळतीलच की नाहीत याची निश्चितपणे खात्री ,कालमर्यादा नसल्याने हजारो गुंतवणूकदार पुरते हवालदिल झाले आहेत.
 अशा फसवणूक झालेल्या हजारो गुंतवणूकदारांचे पैसे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नातून मिळवून देण्याचे आवाहन सारडे-उरण येथील शिंदे गटाचे पदाधिकारी रुपेश पाटील यांनी गुंतवणूकदारांना केले आहे.ठिकठिकाणी सभा घेऊन गुंतवणूकदारांकडून फार्म भरुन घेतले जात आहेत.
शिंदे गटानंतर उरण तालुक्यातील भाजप नेत्यांनीही दोन दिवसांपासून गुंतवणूकदारांकडून फार्म भरुन घेतले जात आहेत.पोलिसांच्या मदतीनेच शिंदे  , भाजप आदी राजकीय पक्षांचे पुढारी फार्म भरुन घेत असल्याने गुंतवणूकदारांकडून मात्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

एकीकडे चिटफंड प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर आणि प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाही पोलिस गुंतवणूकदारांना पोलिस ठाण्यातच येऊन तक्रारी करण्याचे आवाहन करीत आहेत.गुंतवणुकदारांना एकत्रित बोलावून बेकायदेशीर सभा घेण्यासाठी १४४ कलम लागू करण्यात येत आहे.अशा प्रकारे बेकायदेशीर सभा घेणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा देणारे पोलिसच सत्ताधारी शिंदे व भाजप गटातील नेत्यांना गुंतवणूकदारांचे फार्म भरुन घेण्यासाठी मदत करीत असल्याने हजारो गुंतवणूकदार सध्या संभ्रमात पडले आहेत.राजकीय फायदा आणि आर्थिक स्वार्थापोटीच हे सर्व सुरू असल्याचा आरोप गुंतवणूकदारांकडून केला जात आहे.

फसवणूक झालेले गुंतवणूकदार माहिती देण्यासाठी राजकीय पक्षांच्या पुढाऱ्यांच्या प्रयत्नांतून पुढे येत असतील तर त्यांना पोलिस मदत करतील. पत्रकारांनीही यासाठी पुढाकार घेतला तर त्यांनाही पोलिस मदत करतील अशी प्रतिक्रिया उरण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश निकम यांनी दिली.


शेकडो कोटींच्या चिटफंड घोटाळ्यात अनेक राजकीय पक्षांचे पुढारी, नेत्यांनी  दबाव तंत्राचा वापर आर्थिक स्वार्थ साधत उखळ पांढरे करून घेतले आहेत.फसवणुक होण्यापूर्वीच जर गुंतवणूकदारांना राजकीय पक्षांनी सावध केले नाही. त्यामुळे विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून गुंतवणूकदारांना पक्षाच्या माध्यमातून  गुंतवलेले पैसे मिळवून देण्याच्या नावाखाली सुरू करण्यात येणारे प्रयत्न म्हणजे निव्वळ धूळफेक आहे.फसवणुक झालेल्या गोर-गरिब गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत मिळाले पाहिजेत. गुंतवणुकदारांचे पैसे ना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देऊ शकतात. गुंतवणुकदारांचे पैसे फक्त न्यायालयातुनच परत मिळतील.यासाठी गुंतवणूकदारांनी राजकीय पक्षांच्या पुढाऱ्यांच्या मागे न धावता बेधडकपणे पोलिसांकडे जाऊन तक्रारी केल्या पाहिजेत.पोलिसांना सहकार्य केले पाहिजे अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे ( शरद पवार गट ) महाराष्ट्र प्रदेश सदस्य तथा रायगड जिल्हा प्रवक्ते प्रशांत पाटील यांनी दिली.

Web Title: after the shinde group bjp also rushed to collect the money of thousands of investors in the chit fund scam worth hundreds of crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.