९० ग्रामपंचायतींसाठी दोन हजार ७३२ उमेदवारी अर्ज दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2019 11:42 PM2019-02-10T23:42:27+5:302019-02-10T23:42:41+5:30

रायगड जिल्ह्यातील ९० ग्रामपंचायतींसाठी २४ फेब्रुवारीला मतदान पार पडणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शनिवारी शेवटच्या दिवशी सरपंचपदासाठी १३७ तर, सदस्यपदासाठी ८८५ अर्ज दाखल झाले.

 2 thousand 732 nominations filed for 90 panchayats | ९० ग्रामपंचायतींसाठी दोन हजार ७३२ उमेदवारी अर्ज दाखल

९० ग्रामपंचायतींसाठी दोन हजार ७३२ उमेदवारी अर्ज दाखल

Next

अलिबाग : रायगड जिल्ह्यातील ९० ग्रामपंचायतींसाठी २४ फेब्रुवारीला मतदान पार पडणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शनिवारी शेवटच्या दिवशी सरपंचपदासाठी १३७ तर, सदस्यपदासाठी ८८५ अर्ज दाखल झाले. त्यामुळे आता सरपंचपदासाठी एकूण ३७४ आणि सदस्यपदासाठी दोन हजार ३५८ असे एकूण दोन हजार ७३२ उमेदवार निवडणूक लढवण्यास इच्छुक ठरले आहेत. मात्र, १३ फेब्रुवारी रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी किती उमेदवार आपले उमेदवारी अर्ज मागे घेतात. त्यानंतरच निवडणुकीच्या रिंगणात किती उमेदवार शिल्लक राहणार याचे चित्र स्पष्ट होणार आहे.
सर्वच राजकीय पक्षांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज भरण्याच्या तारखेपासून शनिवारपर्यंत गेली सहा दिवस उमेदवारांसह पक्षातील काही वरिष्ठ नेते,पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची चांगलीच गर्दी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या ठिकाणी मोठ्या संख्येने होती. शनिवार ९ फेब्रुवारी हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे संबंधित तहसीलदार कार्यालयामध्ये उमेदवारांची चांगलीच झुंबड उडाली होती.
उमेदवारांची गैरसोय होऊ नये यासाठी ग्रामपंचायतीनिहाय टेबल मांडण्यात आले होते. त्यामुळे नेमक्या कोणत्या ग्रामपंचायतीसाठी कोठे उमेदवारी अर्ज दाखल करायचा आहे याची माहिती उमेदवारांना मिळत होती.
जिल्ह्यातील तब्बल ९० ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होत आहे. त्यामुळे अर्ज दाखल करण्याची शनिवार ९ फेब्रुवारी ही शेवटची तारीख असल्याने उमेदवारांसह वरिष्ठ नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी त्या त्या तहसीलदार कार्यालयात प्रचंड गर्दी केली होती. ९ फेब्रुवारी रोजी या एकाच दिवसामध्ये सरपंचपदासाठी तब्बल १३७ तर, सदस्यपदासाठी ८८५ अर्ज दाखल झाले. त्यानुसार आता सरपंचपदासाठी एकूण ३७४ आणि सदस्यपदासाठी दोन हजार ३५८ असे एकूण दोन हजार ७३२ उमेदवार निवडणुकीमध्ये नशीब आजमावण्यासाठी सज्ज झाले आहेत.
११ फेब्रुवारीला उमेदवारी अर्जाची छाननी होणार आहे. १३ फेब्रुवारीला उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. या दिवशी किती उमेदवार आपापला उमेदवारी अर्ज मागे घेतात यावरच निवडणुकीतील एकूण उमेदवारांची संख्या निश्चित होणार आहे. त्यानंतरच प्रचाराला रंगत येणार आहे.

म्हसळा येथे ७० उमेदवार रिंगणात
म्हसळा : तालुक्यातील रोहीणी, गोंडघर, खामगाव व खारगांव (बु.) अशा चार ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहिर झाल्या आहेत. अर्ज भरायच्या शेवटच्या दिवशी रोहीणी ग्रामपंचायतीसाठी थेट सरपंच एक पद व तीन प्रभागातून अन्य सात सदस्यपदासाठी तेवढच अर्ज दाखल झाल्याने ही ग्रामपंचायत बीनवीरोध आल्यासारखे आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने आपले रोहिणीवर प्राबल्य राखले.
गोंडघर, खामगाव व खारगांव (बु.) या अन्य तीन ग्रामपंचायतीमध्ये दुरंगी-तीरंगी लढतींची शक्यता आहे.यासाठी३ सरपंच पदासाठी १५ उमेदवार २५ सदस्य पदासाठी ५५ उमेदवार रिंगणात आहेत. खामगाव ग्रामपंचायतीत सरपंचपदासाठी ६ व ३ प्रभागांतून ९ सदस्यांसाठी २४ जण रिंगणात आहेत. गोडघर ग्रामपंचायतीत सरपंचपदासाठी ५ , ३ प्रभागांतून ९ सदस्यांसाठी १४ जण रिंगणात आहेत. प्रभाग ३मधून सचीन पयेर, वैशाली सावंत व पुष्पा नाईक यांना प्रातिस्पर्धी नसल्याने बिनविरोध आहेत.
खारगांव (बु.) ग्रामपंचायतीत सरपंचपदासाठी४, ३ प्रभागांतून ७ जागांसाठी १५ जण रिंगणात आहेत.वॉर्ड क्र . २ मध्ये दोनही जागेसाठी स्पर्धक नसल्याने सुरई येथील संतोष जाधव व सरिता जाधव यांची बिनविरोध निवड आहे. रोहिणी ग्रामपंचायतीवर एकहाती राष्ट्रवादीची सत्ता आहे. गोंडघर व खारगांव (बु.) मध्ये थेट सरपंच लढत निकराची होणार आहे.

राजकीय पक्ष सज्ज
शेकाप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि भाजपा असे सर्वच प्रमुख राजकीय पक्ष निवडणुकीसाठी सज्ज झाले आहेत. मोठमोठ्या सभा घेण्यापेक्षा मतदारांच्या घरी जाऊन त्यांची थेट भेट घेऊनच प्रचार करण्याची रणनीती सर्वच राजकीय पक्षांची असल्याचे दिसून येते. ज्या उमेदवारांची उमेदवारी पक्की आहे त्यांनी त्यांच्या प्रचाराला सुरुवातही केली आहे.
त्यामुळे ग्रामीण भागातील राजकीय वातावरण चांगलेच तापायला सुरुवात झाली आहे. गाव बैठका घेऊन उमेदवारांसाठी प्रचार केला जात आहे. या बैठकांमध्ये सर्वच राजकीय पक्षांतील नेते, पदाधिकारी हे हजेरी लावत आहेत. दरम्यान, उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतरच खरे चित्र स्पष्ट होणार असल्याने प्रचाराचा धुरळा अनुभवता येणार आहे.

Web Title:  2 thousand 732 nominations filed for 90 panchayats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड