'येळकोट येळकोट जय मल्हार...' सोमवती यात्रेनिमित्ताने लाखो भाविक खंडेराया चरणी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2024 03:38 PM2024-04-08T15:38:32+5:302024-04-08T15:38:53+5:30

सदानंदाचा येळकोट, येळकोट येळकोट जय मल्हार च्या जयघोषात मुक्त हस्ताने भंडार खोबऱ्याची उधळण करीत भाविकांनी कुलदैवताचे दर्शन घेतले

Yelkot Yelkot Jai Malhar Lakhs of devotees on the occasion of Somvati Yatra in jejuri | 'येळकोट येळकोट जय मल्हार...' सोमवती यात्रेनिमित्ताने लाखो भाविक खंडेराया चरणी

'येळकोट येळकोट जय मल्हार...' सोमवती यात्रेनिमित्ताने लाखो भाविक खंडेराया चरणी

जेजुरी: नवं वर्षाच्या पूर्वसंध्येला फाल्गुन महिन्यातील अमावस्येनिमित्त भरलेल्या सोमवती यात्रेत सुमारे दोन लाखांवर भाविकांनी जेजुरीत गर्दी केली होती. सदानंदाचा येळकोट, येळकोट येळकोट जय मल्हार च्या जयघोषात मुक्त हस्ताने भंडार खोबऱ्याची उधळण करीत भाविकांनी कुलदैवताचे दर्शन घेतले. सोमवती अमावस्येनिमित्त भरलेल्या खंडोबा यात्रेत राज्यभरातून भाविक जेजुरीत आले होते. 

उद्या दि. ९ रोजी चैत्र मासारंभ आणि गुडी पाडवा असल्याने भाविकांनी काल रविवारी (दि.७) पासूनच जेजुरीत गर्दी केली होती. आज दिवसभर अमावस्येचा पुण्यकाल असल्याने दुपारी १ वाजता पालखी सोहळा कऱ्हा स्नानासाठी काढण्यात आला. पेशव्यांच्या इशारतीत आणि बंदुकीच्या फैरी झाडत सोहळ्याला सलामी देण्यात आली. पालखीचे मानकरी खांदेकऱ्यांनी देवाची पालखी उचलली. मुख्य मंदिराला प्रदक्षिणा घालून पालखी बालदारीत नेण्यात आली. देवाच्या सेवेकऱ्यांनी उत्सवमूर्ती पालखीत स्थानापन्न केल्या. आणि निघाला देवाच्या उत्सवमूर्तींचा पालखी सोहळा कऱ्हा स्नानासाठी गडकोटाबाहेर  पडला. यावेळी देव संस्थान चे मुख्य विश्वस्त, व्यवस्थापक, कर्मचारी उपस्थित होते. गडकोटाबाहेर सोहळ्याने प्रस्थान ठेवल्यानंतर पायरीमार्ग, ऐतिहासिक चिंच बागेतील गौतमेश्वर मंदिर मार्गे जानुबाई चौकातून सोहळ्याने शिवाजी चौक मार्गे कऱ्हा नदीकडे कूच केले. सायंकाळी ५ वाजता देवाच्या उत्सवमूर्तींचे कऱ्हा स्नान उरकून सोहळा माघारीचे प्रस्थान ठेवणार आहे. 

Web Title: Yelkot Yelkot Jai Malhar Lakhs of devotees on the occasion of Somvati Yatra in jejuri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.