जागतिक दर्जासाठी दावेदारी भक्कम; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा प्रस्ताव दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 01:00 PM2017-12-19T13:00:19+5:302017-12-19T13:02:58+5:30

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडून देशातील १० सरकारी व १० खासगी अशा २० विद्यापीठांची निवड करून त्यांना जागतिक दर्जाचे विद्यापीठ बनण्यासाठी प्रत्येकी १ हजार कोटी रुपये दिले जाणार आहेत.

World-grade demand is strong; Savitribai Phule Pune University proposal | जागतिक दर्जासाठी दावेदारी भक्कम; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा प्रस्ताव दाखल

जागतिक दर्जासाठी दावेदारी भक्कम; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा प्रस्ताव दाखल

Next
ठळक मुद्देजगभरातील पहिल्या ५०० विद्यापीठांमध्ये भारतातील एकाही विद्यापीठाचा समावेश नाहीनिवड प्रक्रिया पार पाडली जाणार केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडून त्रयस्थ संस्थेमार्फत

पुणे : केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडून देशातील १० सरकारी व १० खासगी अशा २० विद्यापीठांची निवड करून त्यांना जागतिक दर्जाचे विद्यापीठ बनण्यासाठी प्रत्येकी १ हजार कोटी रुपये दिले जाणार आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने यासाठी नुकताच प्रस्ताव दाखल केला आहे. एनआरएफ रँकिंगनुसार पुणे विद्यापीठ देशात दहावे आहे, त्यामुळे या २० विद्यापीठांमध्ये निवड होण्यासाठी पुणे विद्यापीठाची दावेदारी भक्कम मानली जात आहे.
जगभरातील विद्यापीठांचे रँकिंग काढण्यात आले असता पहिल्या ५०० विद्यापीठांमध्ये भारतातील एकाही विद्यापीठाचा समावेश नाही. त्यामुळे भारतीय विद्यापीठांना जागतिक दर्जाचे बनविण्यासाठी केंद्र शासनाने पुढाकार घेतला आहे. त्यानुसार २० विद्यापीठांची निवड केली जाणार आहे. या स्पर्धेमध्ये एनआरएफ रँकिंगमध्ये पहिल्या ५० च्या आत असलेल्या विद्यापीठ, महाविद्यालये व संस्थांना सहभाग घेता येणार आहे.  
महाराष्ट्रातून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाबरोबरच शिवाजी विद्यापीठ (कोल्हापूर), आयसर (पुणे), आयआयटी (मुंबई) यांनी प्रस्ताव दाखल केले आहेत. त्यामध्ये पुणे विद्यापीठाची दावेदारी भक्कम मानली जात आहे. पुणे विद्यापीठाने दिलेल्या प्रस्तावामध्ये संशोधन, पायाभूत सुविधा, शिष्यवृत्ती यास अग्रक्रम दिलेला आहे. एकूण १९ निकषांवर ही निवड केली जाणार आहे. या निकषांनुसार पुणे विद्यापीठाची दावेदारी अत्यंत भक्कम मानली जात आहे. ही निवड प्रक्रिया केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडून त्रयस्थ संस्थेमार्फत पार पाडली जाणार आहे. 
जागतिक दर्जासाठी निवड झालेल्या विद्यापीठांना आर्थिक मदत तर मोठ्या प्रमाणात केली जाणारच आहे. त्याचबरोबर यासाठी निवड झालेल्या विद्यापीठांना सरकारी बंधने, नियम यातून मुक्तता देण्यात येईल. जागतिक दर्जा मिळालेल्या विद्यापीठातील प्रशासक, अध्यापक, संशोधक व विद्यार्थी यांच्यावर मोठी जबाबदारी राहणार आहे. देशभरातील १०० शहरांची निवड करून त्यांना स्मार्ट सिटी बनविण्यासाठी ज्या प्रकारे कार्यवाही करण्यात आली आहे, त्याच धर्तीवर २० विद्यापीठांची निवड करून त्यांना जागतिक दर्जाचे विद्यापीठ बनविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे.
जागतिक दर्जाच्या विद्यापीठ बनविण्याच्या २० विद्यापीठांच्या यादीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा समावेश व्हावा, यासाठी प्रस्ताव पाठविण्यासाठी विशेष मेहनत घेण्यात आली आहे. शिक्षण क्षेत्रातील मान्यवर, शिक्षणतज्ज्ञ यांची मते विद्यापीठाने जाणून घेतली. त्याचबरोबर प्राध्यापक, विद्यार्थी व नागरिकांना आवाहन करून त्यांच्याकडूनही सूचना मागविण्यात आल्या होत्या. 

जागतिक दर्जा मिळविण्यासाठी या सुधारणा आवश्यक
भारतातील विद्यापीठांमध्ये मूलगामी संशोधन होत नसल्याने सातत्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. विद्यापीठे व संलग्न महाविद्यालयांत शिकवणाऱ्या प्राध्यापकांपैकी काही प्राध्यापकांच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. विद्यापीठाकडे सादर होणाऱ्या पीएचडी प्रबंधांच्या दर्जावरही अनेकदा टीका झाली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला जागतिक दर्जा मिळविण्यासाठी या सुधारणा तातडीने कराव्या लागणार आहेत.


तीन महिन्यांनी निवड
जागतिक दर्जाचे विद्यापीठ बनण्यासाठी देशभरातून १४६ प्रस्ताव दाखल झाले आहेत. या प्रस्तावांची छाननी करण्याचे काम सुध्या सुरू आहे. नियोजित वेळापत्रकानुसार ३ महिन्यांनी या २० विद्यापीठांची निवड जाहीर होऊ शकेल.

Web Title: World-grade demand is strong; Savitribai Phule Pune University proposal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.