विना ‘फास्टॅग’ वाहने एकाच लेनमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2019 11:54 AM2019-11-29T11:54:17+5:302019-11-29T12:07:45+5:30

‘फास्टॅग’ कोणत्याही ऑनलाईन माध्यमातून किंवा काही खासगी व राष्ट्रीयकृत बँकांमध्ये रिचार्ज करता येईल...

Without 'fastag' vehicles in the one lane | विना ‘फास्टॅग’ वाहने एकाच लेनमध्ये

विना ‘फास्टॅग’ वाहने एकाच लेनमध्ये

googlenewsNext
ठळक मुद्देटोलनाक्यांवर बंधनकारक : दुप्पट टोलबाबत निर्णय नाही३० नोव्हेंबरपर्यंत फास्टॅगची विक्री मोफत विना ‘फास्टॅग’ वाहनांच्या लेनमध्ये दुप्पट टोल देण्यासंदर्भात अंतिम निर्णय नाही

पुणे : देशभरातील सर्व राष्ट्रीय महामार्ग व द्रुतगर्ती महामार्गांवर टोल नाक्यांवर फास्टॅग नसलेल्या वाहनांसाठी केवळ एक लेन ठेवण्यात येणार आहे. या लेनमधूनच सर्वप्रकारच्या वाहनांना टोल द्यावा लागेल. पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर याची चाचणीही सुरू आहे. त्यामुळे ‘फास्टॅग’ नसल्याने या लेनमध्ये लांबच लांब रांगेत वाहनांना थांबावे लागणार आहे. तर ‘फास्टॅग’च्या लेनमध्ये घुसखोरी केल्यास दुप्पल टोल द्यावा लागु शकतो. विना ‘फास्टॅग’ वाहनांच्या लेनमध्ये दुप्पट टोल देण्यासंदर्भात अद्याप अंतिम निर्णय झाला नसल्याची माहिती भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणा (एनएचएआय)तील अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. 
टोल नाक्यांवर लागणाऱ्या लांबच लांब रांगा कमी करण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतुक मंत्रालयाने सर्व राष्ट्रीय महामार्गांवर ‘फास्टॅग’ ही इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन प्रणाली सुरू केली आहे. मागील काही महिन्यांपासून अनेक टोल नाक्यांवर याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. मात्र, येत्या रविवार (दि. १ डिसेंबर) पासून दुचाकी वगळून सर्व प्रकारच्या वाहनांना ‘फास्टॅग’ बंधनकारक असेल. त्यासाठी टोल नाक्यांवर ‘फास्टॅग’ असलेल्या वाहनांसाठी स्वतंत्र लेन असतील. तर फास्टॅग नसलेल्या वाहनांसाठी केवळ एकच लेन ठेवली जाणार आहे. या लेनमधूनच कार, बस, टॅकसह सर्व वाहनांना जावे लागेल. सध्या फास्टॅगला मिळणारा प्रतिसाद अपेक्षेपेक्षा खुप कमी आहे. त्यामुळे या लेनमध्ये मोठ्या प्रमाणावर वाहनांच्या रांगा लागण्याची शक्यता आहे. तासन् तास या रांगेत थांबून टोल द्यावा लागेल, असे अधिकाºयांनी स्पष्ट केले आहे. तसेच फास्टॅग नसलेली वाहने फास्टॅगच्या लेन मध्ये घुसल्यास त्यांच्याकडून दुप्पट टोल वसुली केली जाण्याची शक्यता आहे. फास्टॅग नसलेल्या वाहनांच्या स्वतंत्र रांगेतूनही दुप्पट टोल घेण्याबाबतही अद्याप स्पष्टता नाही. पुढील दोन दिवसांत याबाबत चित्र स्पष्ट होईल, असेही अधिकाºयांनी सांगितले. 
--------------
फास्टॅग म्हणजे काय?
‘फास्टॅग’ म्हणजे एका टॅगवर चिप लावलेली असते. हा टॅग वाहनाच्या पुढील बाजुच्या काचेवर लावणे आवश्यक आहे. मोबाईल रिचार्ज केल्याप्रमाणे ‘फास्टॅग’ कोणत्याही ऑनलाईन माध्यमातून किंवा काही खासगी व राष्ट्रीयकृत बँकांमध्ये रिचार्ज करता येईल. त्यासाठी स्वतंत्र ऑनलाईन अकाऊंट तयार होईल. 
--------
फास्टॅग कुठे मिळेल? 
सध्या सुमारे २२ खासगी व राष्ट्रीय कृत बँकांमध्ये तसेच टोल नाक्यांवर किंवा अ‍ॅमेझॉन, पेटीएम सारख्या ऑनलाईन माध्यमातूनही फास्टॅग उपलब्ध आहे. ३० नोव्हेंबरपर्यंत फास्टॅगची विक्री मोफत आहे. मात्र, डिपॉझिट व रिचार्जचे पैसे द्यावे लागतील. हे शुल्क बँकांनुसार वेगवेगळे असु शकते. फास्टॅगची वैधता पुढील पाच वर्षांसाठी असेल. 
------------
विनाथांबा प्रवास
फास्टॅग असलेल्या वाहनांसाठी टोल नाक्यावर स्वतंत्र लेन असतील. या लेनमध्ये अन्य वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही. फास्टॅग लावलेले वाहन टोल नाक्यांवर आल्यानंतर सेन्सरच्या माध्यमातून आपोआप टोल जमा होईल. त्यासाठी नाक्यावर थांबावे लागणार नाही. टोल जमा झाल्याचा संदेश काही वेळात मोबाईलवर येईल. हा टोल रिचार्जमधून कट होईल. त्यामुळे पुन्हा टोल नाक्यांवर जायचे असल्यास पुरेसे पैसे टॅगमध्ये उपलब्ध हवेत.
----------
फास्टॅगसाठी आवश्यक कागदपत्रे
वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र (आरसी)
- वाहन मालकाचे जन्मतारीख नमुद असलेले ओळखपत्र
- आधार कार्ड 
- पॅन कार्ड
--------------
फास्टॅगचे फायदे 
- टोल नाक्यावर स्वतंत्र लेन
- रांगेतून सुटका
- आॅनलाई रिचार्जची सुविधा
- इंधन व वेळेची बचत
- कमी प्रदुषण 
- टोल जमा झाल्यास मोबाईलवर संदेश
----------
सर्व राष्ट्रीय महामार्गांवरील टोल वसुली १०० टक्के इलेक्टॉनिक माध्यमातून करण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी ‘फास्टॅग’ ही सुविधा आहे. टोलनाक्यांवर त्यासाठी स्वतंत्र लेन असतील. इतर वाहनांसाठी केवळ एकच लेन राहील. या लेनमुळे किती लांब रांगा लागत आहेत, किती वेळ जातोय, याची चाचपणी सुरू आहे. दुप्पट टोलबाबत अद्याप स्पष्टता नाही. पुढील दोन दिवसांत याबाबत निर्णय होईल.
- ‘एनएचएआय’चे अधिकारी
-----
दोन महिने मुदतवाढ द्यावी
‘फास्टॅग’च्या अंमलबजावणीबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाºयांशी गुरूवारी दिल्लीमध्ये चर्चा झाली आहे. त्यामध्ये या यंत्रणेतील त्रुटी मांडण्यात आल्या. सध्या फास्टॅगची उपलब्धता व अंमलबजावणीबाबत अधिकाºयांमध्ये संभ्रम आहे. त्यामुळे पुढील दोन महिने याला मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात आली आहे. 
- बाबा शिंदे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माल व प्रवासी वाहतुक संघटना
---------------
दुप्पट टोल वसुली अन्यायकारक
‘फास्टॅग’ ही प्रणाली सध्या नवीन आहे. त्यामुळे अनेकांना समजण्यास वेळ लागणार आहे. तसेच अनेक वाहनचालक क्वचितच महामार्गावरून जातात. त्यांच्याकडून दुप्पट टोल घेणे अन्यायकारक होईल. तसेच सध्या केवळ एक लेन ठेवणेही चुकीचे होईल. निम्म्या-निम्म्या लेन ठेवणे गरजेचे आहे. टप्याटप्याने लेन कमी कराव्यात. तसेच या प्रणालीवर योग्य पध्दतीने नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.
- विवेक वेलणकर, टोल अभ्यासक
---------------------

Web Title: Without 'fastag' vehicles in the one lane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.