आगामी साहित्य संमेलन मराठवाड्यात होणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2019 03:14 AM2019-05-16T03:14:14+5:302019-05-16T03:14:31+5:30

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा आगामी सन्माननीय अध्यक्ष कोण असेल? या चर्चेबरोबरच आता २०२० चे साहित्य संमेलन कुठे होणार? याविषयी साहित्य वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

 Will the forthcoming literary meet be held in Marathwada? | आगामी साहित्य संमेलन मराठवाड्यात होणार?

आगामी साहित्य संमेलन मराठवाड्यात होणार?

googlenewsNext

पुणे : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा आगामी सन्माननीय अध्यक्ष कोण असेल? या चर्चेबरोबरच आता २०२० चे साहित्य संमेलन कुठे होणार? याविषयी साहित्य वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कार्यालय तीन वर्षांसाठी मराठवाडा साहित्य परिषदेकडे गेल्यामुुळे साहित्य संमेलन हे मराठवाड्यातच व्हावे यासाठी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. लातूर किंवा उस्मानाबादला संमेलन होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
नागपूरच्या विदर्भ साहित्य संघाकडे तीन वर्षांपासून असलेले साहित्य महामंडळाचे कार्यालय १ एप्रिलपासून पुढील तीन वर्षांसाठी औरंगाबाद येथील मराठवाडा साहित्य परिषदेकडे गेले आहे. यवतमाळ येथे झालेल्या ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपामध्ये आगामी ९३ व्या साहित्य संमेलनासाठी महामंडळाकडे लातूर, उस्मानाबाद आणि बुलडाणा
येथील प्रगती वाचनालय या तीन ठिकाणांहून निमंत्रणे आल्याचे सांगण्यात आले आहे. आजवरचा संमेलनाचा इतिहास पाहता ज्या घटक संस्थेकडे साहित्य महामंडळ जाते त्याच संस्थेचे संमेलनावर वर्चस्व असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. यातच महामंडळाचे फिरते कार्यालय औरंगाबादला असल्याने आगामी तीनपैकी दोन संमेलने तरी मराठवाड्यात आयोजित करून साहित्यिक, सांस्कृतिक व वाङ्मयीन अनुशेष भरून काढण्यासाठी मराठवाडा साहित्य परिषद आग्रही आहे. यामुळे पुढील तीन संमेलनांवर मराठवाड्याचे वर्चस्व राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
साहित्य संमेलन आयोजित करण्यासाठी उस्मानाबाद अनेक वर्षांपासून प्रयत्नशील आहे. २०१५ मध्ये उस्मानाबाद येथे संमेलन होण्याची शक्यता होती; पण त्यांची संधी हुकली आणि हे
संमेलन घुमानला झाले. उस्मानाबाद आणि लातूर येथे एकदाही
साहित्य संमेलन झालेले नाही.
संमेलन म्हणजे पुणे-मुंबई आणि शहरपट्टा असे समीकरण झाले आहे. इतर भागात सांस्कृतिक भूक कायम आहे. तेथील अनुशेष भरून काढण्यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषद मराठवाड्याला समर्थन देईल, असे मसापमधील पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

आगामी साहित्य संमेलनासाठी लातूर, उस्मानाबाद आणि विदर्भ येथून निमंत्रणे आली आहेत. महामंडळाचे कार्यालय मराठवाड्याकडे आल्यापासून एकही निमंत्रण आलेले नाही. पुढील काही दिवसांत आणखी निमंत्रणे येतील. त्यानंतर बैठकीत चर्चा होईल. निमंत्रण पाठवण्यासाठी अंतिम मुदत दिलेली नाही. यापुढे येणाºया निमंत्रणांचा विचार केला जाईल.
- कौतिकराव ठाले-पाटील, अध्यक्ष, साहित्य महामंडळ

Web Title:  Will the forthcoming literary meet be held in Marathwada?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.