विनय अरहानाच्या मॅनेजरला ताब्यात का घेतले नाही? न्यायालयाचा तपासी अधिका-यांना सवाल

By नम्रता फडणीस | Published: October 26, 2023 07:00 PM2023-10-26T19:00:59+5:302023-10-26T19:01:20+5:30

अरहानाच्या ड्रायव्हरसह मॅनेजरची ललित पाटीलला मदत; अरहानाला ३० ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी

Why wasn't Vinay Arhana's manager detained? The court asked the investigating officers | विनय अरहानाच्या मॅनेजरला ताब्यात का घेतले नाही? न्यायालयाचा तपासी अधिका-यांना सवाल

विनय अरहानाच्या मॅनेजरला ताब्यात का घेतले नाही? न्यायालयाचा तपासी अधिका-यांना सवाल

पुणे : विनय अरहाना याचा मॅनेजर अश्विन कामत याचा या प्रकरणात सहभाग दिसून येत असतानाही त्याला आता पर्यंत ताब्यात का घेतले नाही? असा प्रश्न न्यायालयाने तपासी अधिकाऱ्यांना विचारला. याप्रकरणाची चौकशी सुरु असून, ज्यांचा सहभाग असेल त्यांना ताब्यात घेण्यात येईल, असे तपासी अधिकारी यांनी न्यायालयात सांगितले. दरम्यान, ड्रग्स तस्कर ललित पाटीलला पळून जाण्यासाठी मदत करणाऱ्या अरहानासह भूषण पाटील व अभिषेक बलकवडे या तिघांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. सी. बिराजदार यांनी ३० ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

ड्रग्स तस्करी आणि ललित पाटील ससून रुग्णालयातून फरार झाल्याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात २ वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. भूषण पाटील आणि अभिषेक बलकवडे यांना ड्रग्स तस्करीच्या गुन्ह्यातून ललित पाटील फरार झाल्या प्रकरणी गुन्ह्यात वर्ग करण्यात आले आहे. तर दुसरीकडे सक्तवसुली संचालयाने (ईडी) कारवाई केलेल्या विनय अरहाना याला बुधवारी तळोजा जेलमधून पुणेपोलिसांनी ताब्यात घेतले होते. गुरुवारी तिघांना न्यायालयात हजर करण्यात आले.

ललित पाटील हा रुसून रुग्णालयात वार्ड क्र. १६ मध्ये उपचार घेत असताना भूषण पाटीलने २९ सप्टेंबर रोजी प्रत्यक्ष भेट घेतली होती. तर अभिषेक बलकवडे याने ३० सप्टेंबर रोजी भेट घेतली होती. या दोघांनी कट रचून ललित पाटीलला पळविले असल्याचे तपासी अधिका-यांनी न्यायालयात सांगितले. दरम्यान ललित पाटील ससून रुग्णालयात उपचार घेत असताना विनय अरहाना या आरोपीची त्याची ओळख झाली होती. २ ऑक्टोबर रोजी ललित पाटील पळून गेला. त्याला पळून जाण्यासाठी विनय अरहानाकडे काम करणारा चालक दत्तात्रय डोके याने गाडी उपलब्ध करून दिली. तसेच अरहानाचा मॅनेजर अश्विन कामत याने ललित पाटीलला एटीएम दिले. या एटीएमच्या मदतीने ललित पाटील पळून गेला.

विनय अरहाना याने कोणत्या कारणांसाठी ललित पाटीलची मदत केली आहे? कोणाच्या सांगण्यावरून ही मदत केली आहे? अटक करण्यात आलेल्या आरोपींची संगमत करून कट रचला आहे. हा कट कशा प्रकारे रचला आणि कुठे रचला आहे याचा तपास करण्यासाठी सरकारी वकील नीलिमा यादव-इथापे यांनी ७ दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. मात्र आरोपींच्या वकिलांनी पोलिस कोठडीला विरोध केला. विनय अरहाना यांच्या वतीने भाग्यश्री सोतूर यांनी बाजू मांडताना सांगितले की, विनय अरहाना न्यायालयीन कोठडीत होते. न्यायालयीन कोठडीत असतांना ते ड्रायव्हर आणि मॅनेजरला ललित पाटीलची मदत करा हे कसे काय सांगू शकतात. तसेच ललित पाटील पळून गेल्यानंतरही अरहाना हे पुढचे ४ दिवस ससून रुग्णालयात वार्ड क्र १६ मध्ये होते. त्यावेळी पोलिसांनी का चौकशी केली नाही असा प्रश्न उपस्थित केला. तर भूषण आणि अभिषेक बलकवडे यांच्या वतीने संदीप बाली यांनी बाजू मांडली. दोन्ही बाजू ऐकून न्यायालयाने तिघांना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

Web Title: Why wasn't Vinay Arhana's manager detained? The court asked the investigating officers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.