पुण्यात आज जो विचार होतो, तो उद्या देशात होतो - माजी सरन्यायाधीश उदय लळीत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2022 07:12 PM2022-11-23T19:12:17+5:302022-11-23T19:12:28+5:30

पुण्याला मोठा सामाजिक, राजकीय, वैचारिक वारसा लाभलेला आहे

What happens in Pune today happens in the country tomorrow Former Chief Justice Uday Lalit | पुण्यात आज जो विचार होतो, तो उद्या देशात होतो - माजी सरन्यायाधीश उदय लळीत

पुण्यात आज जो विचार होतो, तो उद्या देशात होतो - माजी सरन्यायाधीश उदय लळीत

Next

पुणे : पुण्याबददल मला कायमच आकर्षण राहिलं आहे. पुण्याशी माझं नातं देखील आहे. माझ्या आई-वडिलांचे शिक्षण पुण्यात झाले, माझे आजोळही अगदी सदाशिव पेठेत होते. त्यामुळे आमच्या ‘डायनिंग टेबल’ वर पुण्याबद्दलच चर्चा व्हायची. मात्र, मी पुण्यात शिकू शकलो नाही, अशी खंत सर्वोच्च न्यायालयाने माजी सरन्यायाधीश उदय लळीत यांनी बोलून दाखविली. पुणे ही देशाची वैचारिक राजधानी असून, पुण्यात आज जो विचार होतो, तो उद्या देशात होतो असेही ते म्हणाले.

पुणे जिल्हा न्यायालयाच्या ऐतिहासिक इमारतीच्या पायाभरणीची शताब्दी आणि पुणे बार असोसिएशनच्या अमृत महोत्सवानिमित्त असोसिएशनतर्फे पुणे जिल्हा न्यायालयाच्या अशोका हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. 

पुण्याविषयीच्या जुन्या आठवणींना उजाळा देताना उदय लळीत म्हणाले, पुणे जिल्हा न्यायालयाच्या ऐतिहासिक इमारतीशी माझा दुरून संबंध आला होता. एका फौजदारी खटल्यात पक्षकाराची बाजू मांडण्यासाठी तरुणपणी पुणे जिल्हा न्यायालयात आलो होतो, तसेच जनरल अरुणकुमार वैद्य हत्या खटल्यात सीबीआयचा वकील या नात्याने घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी पुण्यात आलो होतो. पुण्याला मोठा सामाजिक, राजकीय, वैचारिक वारसा लाभलेला आहे. अशा या पुण्यनगरीत सामाजिक देवाणघेवाणीतून उद्भवणा-या वादात प्रतिनिधित्व करण्याची संधी वकिलांना मिळते, हे त्यांचे सुदैव आहे. राज्यघटना अंमलात आल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पहिले भाषण पुणे जिल्हा न्यायालयाच्या सभागृहात झाले होते, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

''पुणे जिल्हा न्यायालयाच्या इमारतीच्या पायाभरणीची शताब्दी आणि पुणे बार असोसिएशनचा अमृत महोत्सव हा ’दुग्धशर्करा योग’ आहे, असे नमूद करत उदय लळीत वकिली व्यवसायाबाबत अपेक्षा व्यक्त केल्या. वकील हे समाजातील हेवेदावे आणि वादांचे निराकरण करणा-या न्यायसंस्थेचा भाग आहेत. ते आपली भूमिका किती प्रगल्भतेने मांडतात, त्यावर न्यायसंस्थेचे यश अवलंबून आहे. राज्यघटनेत ’विधी सेवा’ या केवळ एकाच व्यवसायाचा उत्कटतेने उल्लेख करण्यात आला आहे. ही सर्व वकिलांसाठी अभिमानास्पद बाब आहे, असेही ते म्हणाले.''

घटनात्मक नितीमत्तांचे पालन होणे गरजेचे

लोकशाहीचा उत्कर्ष होण्यासाठी समाज हा कधीही विषमतेने दुभंगलेला नसावा, विरोधी पक्षाचे सकारात्मक व परिणामकारक अस्तित्व असावे, कायदा व प्रशासनाच्या सर्व कामांमध्ये समानता असावी आणि घटनात्मक नितीमत्तांचे पालन होणे गरजेचे आहे, अशी चार तत्वे राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितली होती. लोकशाहीसाठी आवश्यक या तत्त्वांची सदैव जपणूक करण्याची जबाबदारी वकिलांची आहे. - उदय लळीत, माजी सरन्यायाधीश

Web Title: What happens in Pune today happens in the country tomorrow Former Chief Justice Uday Lalit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.