साेमवारपासून पूर्व भागातील नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2018 08:36 PM2018-09-30T20:36:00+5:302018-09-30T20:37:18+5:30

दांडेकर पुलाजवळ कालवा फुटल्यामुळे शहराच्या पूर्व भागातील पाणी पुरवठा गेल्या दोन दिवसांपासून बंद होता. साेमवारपासून या भागातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येणार असल्याची माहिती पालिकेच्या पाणी पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.

water supply will be regular to east pune area from Monday | साेमवारपासून पूर्व भागातील नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा

साेमवारपासून पूर्व भागातील नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा

Next

पुणे : दांडेकर पुलाजवळ कालवा फुटल्यामुळे शहराच्या पूर्व भागातील पाणी पुरवठा गेल्या दोन दिवसांपासून बंद होता.मात्र,पर्वती जलशुध्दीकरण केंद्रातून रविवारी कालव्यात पाणी सोडण्यात आले आहे.त्यामुळे सोमवारपासून (दि.1)शहराच्या पूर्व भागातील नागरिकांना सुरळीतपणे पाणी पुरवठा होईल,असा दावा पालिकेच्या पाणी-पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. परंतु, काही भागात कमीदाबाने पाणी पुरवठा होणार असल्याने अनेकांना सलग तिस-या दिवशी पाणी मिळणार नाही,असा अंदाज जाणकारांकडून वर्तविला जात आहे.

    खडकवासल्यापासून इंदापूरपर्यंत जाणारा कालवा दांडेकर पुलाजवळ फुटल्याने खडकवासला धरणातून कालव्यात सोडण्यात आलेले पाणी पूर्णपणे बंद करावे लागले. मात्र,कालव्यातून लष्कर जलशुध्दीकरण केंद्रासाठी वर्षभर पाणी पुरवठा केला जातो.कालवा बंद झाल्याने लष्कर जलशुध्दीकरण केंद्रासाठी केला जाणारा पाणी पुरवठा पूर्णपणे बंद झाला.त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून कोंढवा, मुंढवा, हडपसर, महमदवाडी, काळेपडळ,येरवडा, कोरेगावपार्क ,विश्रांतवाडी, टिंगरेनगर, खराडी, वडगावशेरी, चंदनगर, नगररस्ता, विमाननगर आदी भागातील पाणी पुरवठा बंद आहे.त्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

   पुणेकर क्षमतेपेक्षा जास्त पाणी वापरत असल्याची टिका जलसंपदा विभागाकडून नेहमीच केली जाते.त्यात सलग दोन दिवस अनेकांच्या घरातील नळाला पाणीच आले नाही. घरात भांड्यांमध्ये व टाकीमध्ये भरून ठेवलेले पाणी दोन दिवसाच्या वापरानंतर पूर्णपणे संपले.परिणामी काही गृह निर्माण सोसायट्यांनी पाण्याचे टँकर मागवले.त्यासाठी हवी ती किंमत मोजली.तर काही नागरिकांनी कॅनॉलमध्ये साचलेल्या पाण्यात कपडे धुण्यासाठी कॅनॉलवर गर्दी केली.
खडकवासला धरण ते पर्वती जलशुध्दीकरण केंद्र या दरम्यान बंद पाईप लाईन आहे.या पाईप लाईनमधून पर्वती केंद्रात आवश्यक पाणी पुरवठा गेला जातो.कालव्यातील पाणी बंद असल्यामुळे शनिवारी लष्कर येथील जलशुध्दीकरण केंद्राला पर्वती जलशुध्दीकरण केंद्रातून कालव्यामधूनच पाणी सोडण्यात आले.

     मात्र,गणेश विसर्जनानंतर कालव्यात अडथळे निर्माण झाले आहेत.कालव्यात काही ठिकाणी घाण साचली आहे.त्यामुळे पर्वती जलशुध्दीकरण केंद्रातून सोडलेले पाणी लष्कर जलशुध्दीकरण केंद्राकडे न जाता उलट दिशेने वाहू लागले.परिणामी ज्या ठिकाणाहून कालवा फुटला येथून पुन्हा एकदा पाणी वाहून आल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले.परंतु,काही कालावधीतच पर्वती केंद्रातून सोडलेले पाणी बंद करण्यात आले.परंतु,रविवारी पुन्हा कालव्यातून पाणी सोडण्यात आले आहे.

-------------------------
पर्वती जलशुध्दीकरण केंद्रातून लष्कर भागासाठी कॅनॉलद्वारे पाणी सोडले आहे.त्यामुळे सोमवारपासून पूर्व भागातील पाणी पुरवठा सुरळीतपणे सुरू होईल.
- प्रविण गेडाम,अधिक्षक अभियंता,पाणी-पुरवठा विभाग,पुणे महापालिका 
 

Web Title: water supply will be regular to east pune area from Monday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.