तुकाराम मुंढे यांची धडाकेबाज निर्णयांची वादग्रस्त कारकीर्द; राजकारण्यांसह अधिकारी-कर्मचारी विरोधात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2018 08:00 PM2018-02-07T20:00:21+5:302018-02-07T20:02:13+5:30

पुणे महानगर परिवहन महामंडळाला (पीएमपी) गती देण्यासाठी धडाकेबाज निर्णय घेणारे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांची अखेर बदली झाली आहे.

Tukaram Mundhe's controversial career; Against officials and employees with politicians | तुकाराम मुंढे यांची धडाकेबाज निर्णयांची वादग्रस्त कारकीर्द; राजकारण्यांसह अधिकारी-कर्मचारी विरोधात

तुकाराम मुंढे यांची धडाकेबाज निर्णयांची वादग्रस्त कारकीर्द; राजकारण्यांसह अधिकारी-कर्मचारी विरोधात

Next
ठळक मुद्देमुंढे यांची १० महिन्यांची कारकीर्द वादग्रस्त ठरलीतुकाराम मुंढे यांनी २९ मार्च २०१७ रोजी हाती घेतली पीएमपीच्या अध्यक्षपदीची सूत्रे

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाला (पीएमपी) गती देण्यासाठी धडाकेबाज निर्णय घेणारे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांची अखेर बदली झाली आहे. कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्यापासून ते राजकारण्यांचा हस्तक्षेप पूर्ण थांबवून टाकणाऱ्या मुंढे यांची १० महिन्यांची कारकीर्द वादग्रस्त ठरली. 
मुंढे यांनी २९ मार्च २०१७ रोजी पीएमपीच्या अध्यक्षपदीची सूत्रे हाती घेतली. पहिल्या दिवसापासूनच त्यांची कारकीर्द वादग्रस्त ठरली. कर्जाच्या गर्तेत रुतलेल्या पीएमपीला मार्गावर आणण्यासाठी कर्मचाऱ्यांमधील बेशिस्तपणा त्यांनी मोडून काढला. कामचुकार कर्मचाऱ्यांना ठिकाणावर आणले. एक कंपनी म्हणून पीएमपीचे कामकाज चालावे यासाठी मोठे प्रशासकीय बदल केले. अगदी वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही कारवाई केली. मुंढे यांनी मार्गांचे  सुसूत्रीकरण, नवीन रुट सुरू करणे, बीआरटी सेवेला गती देणे, ब्रेक डाऊन कमी करण्यासाठी गाड्यांची योग्य प्रकार देखभालीची सोय, रात्रपाळीत झोपणाऱ्या कर्मचाऱ्यांचे निलंबन, ओव्हरटाईम बंद, नवीन आस्थापन आराखडा तयार करणे असे महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. मात्र, कर्मचाऱ्यांच्या कामाच्या वेळत बदल, उशीराने येणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्या दिवसाचा पगार  न देणे, हेतूपुरस्पर बदली केलेल्या कर्मचाऱ्यांची पुन्हा मूळ ठिकाणी बदली, बेकायदेशीरपणे केलेली पदोन्नती, कामचुकार अधिकारी व कर्मचाऱ्यांची बदली-निलंबन व बडतर्फीची कारवाई त्यांनी केली. तब्बल १५८ कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवामुक्त केले. ३७५ कायम कर्मचारी आणि १५० रोजंदारीवरील वाहकांची कामातील अनियमिततेप्रकरणी चौकशी सुरू केली. यामुळे कर्मचारीही नाराज होते. 
हे सगळे करताना पीएमपीमधील राजकीय हस्तक्षेप त्यांनी पूर्णपणे बंद केला. पदभार स्वीकारल्यानंतर काही दिवसांतच मुंढे यांचे पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही महापालिकांतील  पदाधिकाऱ्यांशी खटके उडू लागले. लोकप्रतिनिधींना सन्मानाने वागणूक देत नसल्याचा आरोप त्यांच्यावर होऊ लागला. सर्वसाधारण सभांमध्ये अनेक नगरसेवकांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली. पिंपरी-चिंचवड महापालिकेतील पदाधिकाऱ्यांनीही मुंढे यांची कार्यशैली हिटलरप्रमाणे असल्याचे म्हटले होते. दुसऱ्या बाजुला कामगार संघटनाही मुंढे यांच्या विरोधात गेल्या होत्या. राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि कॉँग्रेस प्रणित पीएमपी कामगार संघटनांची कार्यालये त्यांनी पीएमपीच्या इमारतीतून हटविली. 
पदाधिकाऱ्यांच्या आग्रहाखातर सुरू करण्यात आलेले तोट्यातील मार्ग, पास केंद्रही त्यांनी बंद केले. कर्मचारी संघटनांनाही त्यांनी अनधिकृत ठरविले. त्यामुळे सर्वपक्षीय राजकारणी त्यांच्या विरोधात गेले होते. संचलन तुटीपोटी पीएमपीला मिळणारा निधी घेण्यासाठी मुंढे यांना पालिकेत येवून बोलावे लागेल, अशी भूमिका अनेक नगरसेवकांनी घेतली होती. मात्र मुंढे यांनी त्यास नकार दिल्याने त्यांच्यावर अनेक नगरसेवक नाराज झाले होते. त्यावेळेपासूनच मुंढे यांची बदली करण्याची मागणी होत होते. तसेच मंगळवारी  पुण्यातील काही नगरसेवक आणि मुख्यमंत्री यांच्यात झालेल्या बैठकीत नगरसेवकांनी मुंढेबाबत नाराजी व्यक्त केली होती. नवीन आस्थापन आराखडा आणि पीएमपीच्या नियमावरील बोट ठेवत कर्मचाºयाची कोंडी केल्याने त्यांना होणार विरोध वाढतच होता. 
त्यामुळे वरिष्ठ नेत्यांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे हा विषय पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले जात होते. विविध राजकीय पक्षांतील पदाधिकारी, लोकप्रतिनिधींसह कर्मचारी संघटनाही आता मुंढे यांच्या बदलीसाठी प्रयत्न  करत होत्या. त्यातूनच मुंढे यांची बदली करण्यात आली असे बोलले जात आहे. 

मुंढेबाबत अधिकाऱ्यांमध्ये होती नाराजी
पीएमपीच्या विकासात अडथळा ठरणाऱ्या प्रत्येकावर कारवाई करण्यात येईल, अशी स्पष्टोक्ती केल्यानंतर महामंडळातील काही अधिकाऱ्यांना देखील घाम फुटला होता. वाहतूक व्यवस्थापक अनंत वाघमारे यांची पदानवती, सुनिल गवळी व १४ टाईम किपरची हकालपट्टी, अनेक वरीष्ठ अधिकाºयांच्या बदल्या, बस वेळेत न जाणे-ब्रेकडाऊन होणे-ठरलेल्या नियोजनाप्रमाणे संचलन न झाल्याने अधिकारी व डेपो मॅनेजरांना करण्यात आलेला दंड आणि सहव्यवस्थापक डी. पी. मोरे यांची बदली अशा विविध कारणांसाठी पीएमपीतील अनेक अधिकारी देखील मुंढे यांच्यावर नाराज होते. काही अधिकारी तर येथून बदली करा, अशी मागणी देखील शाससनाकडे करीत होते. 

मुंढे यांचे काही निर्णय व कामे 
- उशीराने येणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्या दिवसाचा पगार न देण 
- इतरत्र काम करणाऱ्या १७८ कर्मचाऱ्यांची पुन्हा पीएमपीत बदली
- आॅनड्युटी डुलकी घेणाऱ्यांचे निलंबन
- मालकीच्या अधिकाधीक गाड्या मार्गावर आणणे
- १०० बसेसची पुनर्बांधणी 
- ओव्हरटाईम बंद 
- प्रवाशांशी गैरवर्तन करणाऱ्यांचे निलंबित
- पीएमपीचे ई-कनेक्ट अ‍ॅप तयार करणे 
- वेबसाईटचे अद्ययावतीकरण 
- कागदीपास ऐवजी मी-कार्ड  
- आयटीएमएसची प्रभावी अंमलबजावणी 
- शिफ्टमध्ये कामकाजाचे नियोजन 
- चालक व वाहकाला फिक्स बस देणे 
- कामाप्रमाणे बढती व पगारवाढ 
- स्वारगेटला पीएमपीसाठी स्वतंत्र लेन
- जाहिरातीचे कंत्राट रद्द 
- पर्पल मोबिलिटी सोल्यूशनची सेवा थांंबविली 
- व्हीएचएमएसद्वारे बसची तपासणी 
- बीआरटीमध्ये घुसखोरी करणाऱ्यांना दंड 

प्रस्तावित निर्णय 
- प्रत्येक मिनिटाला मीडी बस
- चालक व वाहकांना बस देण्यासाठी आॅटोमॅटीक यंत्रणा 
- मीडीबसच्या जाळ्याचा विस्तार
- नवीन अ‍ॅटोमॅटिक बसची खरेदी 

वादग्रस्त निर्णय 
- पासेसच्या किंमतीमध्ये वाढ 
- नगरसेवक सिद्धार्थ शिरोळे यांचे पीएमपीतील आॅफिस खाली करणे 
- कर्मचारी संघटनांचे कार्यालय खाली करणे 
- बस ठेकेदारांना दंड 
- नवीन आस्थापना आरखडा 
- दिवाळी बोनस न देण्याची भूमिका 
- महिन्याला एकच दिवस सुटी

बदलीची आॅर्डर मिळाली आहे. गुरुवारी पीएमपीचा पदभार सोडणार असून शुक्रवारी नाशिकला जाणार आहे. पीएमपीमधे १० महिन्याचा जो कालावधी मिळाला त्यात बरेच बदल केले. त्याचे चांगले परिणामही दिसून येत आहेत. जेवढे शक्य तेवढे बदल केले. कर्मचारी शिस्त, आॅटोमेशन, मागंर्चे सुसूत्रीकरण असे अनेक निर्णय घेतले. हे पुढे असेच सुरु राहिले तर पीएमपी निश्चितपणे उभारी घेईल.
- तुकाराम मुंढे

 

Web Title: Tukaram Mundhe's controversial career; Against officials and employees with politicians

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.