चौकोनी कुटुंबाचा त्रिकोण उद्धवस्त; अपघातात पती- पत्नी, मुलीचा दुर्दैवी अंत, मुलावर दुःखाचा डोंगर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2023 03:07 PM2023-07-01T15:07:53+5:302023-07-01T15:11:25+5:30

मुलाला नागपूर येथील विधी महाविद्यालयात सोडल्यावर आई वडिलांची मुलाबरोबर अखेरची भेट

Triangulation of the quadrilateral family; Husband and wife in an accident, daughter's unfortunate end, son's mountain of grief | चौकोनी कुटुंबाचा त्रिकोण उद्धवस्त; अपघातात पती- पत्नी, मुलीचा दुर्दैवी अंत, मुलावर दुःखाचा डोंगर

चौकोनी कुटुंबाचा त्रिकोण उद्धवस्त; अपघातात पती- पत्नी, मुलीचा दुर्दैवी अंत, मुलावर दुःखाचा डोंगर

googlenewsNext

शिरूर: उपेक्षित समाजात झालेला जन्म, त्यातूनही प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जात घेतलेले शिक्षण व स्वतः शिक्षित झाल्यावर मुलांना उच्च शिक्षित करण्याचे गाठलेले ध्येय... अशा स्वप्नवत प्रवासाला जणू कुणाची नजर लागली. सर्वार्थाने परिपूर्ण अशा कैलास गंगावणे यांच्या चौकोनी कुटुंबाचा त्रिकोणच उध्वस्त झाला आहे. समृध्दी महामार्गावर मध्यरात्री दोनच्या सुमारास खासगी बसला झालेल्या अपघातात गंगावणे,त्यांची पत्नी व मुलीचा दुर्दैवी अंत झाला.

प्रा. कैलास गंगावणे यांचे वडील बबनराव हे ताशावादक होते. लोकांच्या कार्यक्रमांमध्ये ताशा वादनाचा कार्यक्रम करून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. अशातही त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना शिक्षक केले. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन कैलास व सुरेश या बंधूंनी समाजात आपले एक वेगळे स्थान निर्माण केले होते. कैलास गंगावणे हे निरगुडसर येथील नेहरू विद्यालयात इंग्रजीचे प्राध्यापक होते. ते २७ वर्षांपासून कार्यरत होते.

 कैलास गंगावणे हे आपला मुलगा आदित्य यास नागपूर येथील विधी महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी गेले होते. त्यांच्या समवेत आदित्य याच्यासह त्यांची पत्नी कांचन व मुलगी डॉ. ऋतुजा होती. आदित्यला नागपूर येथे सोडून ते विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बस मधून नागपूरहून शिरूरला निघाले होते. बस एका ठिकाणी जेवणासाठी थांबून अर्ध्या तासाने निघाली असता समृध्दी महामार्गावर सिंदखेडराजा जवळील  पिंपळखुटी जवळ दुभाजकाला धडकून बसने पेट घेतला. यातून प्रवाशांना बाहेर पडता न आल्याने त्यांचा होरपळून मृत्यू झाला. काही प्रवाशी काचा फोडून बाहेर येण्यात यशस्वी होऊ शकले. गंगावणे त्यांची पत्नी व मुलीचा यात करुण अंत झाला. ही वार्ता येथील गंगावणे कुटुंबीयांना समजताच कुटुंबीयांवर शोककळा पसरली. मुलाला वकील करण्याचे गंगावणे यांचे ध्येय होते. मुलगा वकील होईलही. मात्र ते पाहण्यासाठी गंगावणे या जगात नसतील याची मोठी खंत आहे. 

गंगावणे यांचे बंधू सुरेश गंगावणे हे येथील विद्याधाम प्रशालेत शिक्षक असून त्यांचे दोन्ही भाचेही शिक्षक आहेत.चुलत बंधू रुपेश गंगावणे हे शिक्षण मंडळाचे माजी सभापती आहेत. आमच्या कुटुंबावर हा फार मोठा आघात असल्याची प्रतिक्रिया रुपेश यांनी दिली. अपघातातील मृतदेह ओळखण्यासाठी डी एन ए टेस्ट करावी लागण्याची शक्यता आहे. गंगावणे यांचे नातेवाईक बुलढाण्याकडे रवाना झाले आहेत. 

Web Title: Triangulation of the quadrilateral family; Husband and wife in an accident, daughter's unfortunate end, son's mountain of grief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.