आधुनिक काळात पारंपरिक पोतराज उपेक्षित

By Admin | Published: May 31, 2017 02:14 AM2017-05-31T02:14:42+5:302017-05-31T02:14:42+5:30

पूर्वी ठिकठिकाणी आवर्जून दिसणाऱ्या पोतराजाच्या नशिबी सध्या उपेक्षिततेचे जिणे आले आहे. मरिआई, कडकलक्ष्मी किंवा मरिबाई

Traditional portraves neglected in modern times | आधुनिक काळात पारंपरिक पोतराज उपेक्षित

आधुनिक काळात पारंपरिक पोतराज उपेक्षित

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
रावेत : पूर्वी ठिकठिकाणी आवर्जून दिसणाऱ्या पोतराजाच्या नशिबी सध्या उपेक्षिततेचे जिणे आले आहे.  मरिआई, कडकलक्ष्मी किंवा मरिबाई जेवढी कडक, उग्र असल्याचा समज आहे. तेवढाच तिचा भक्त पोतराजही कडक व उग्र वाटतो. लांब वाढलेले जटा झालेले केस, कपाळाला मळवट, चेहरा व त्वचा रापलेली, कमरेला विविध रंगांच्या कापडांचं बनविलेलं कमरेचं वस्त्र, त्यावर बांधलेली मोठ्या आकाराची घुंगरं, पायात चाळ आणि हातात आसूड असा त्याचा वेश असतो. त्याच्यासोबत असणारी बाई डोक्यावर मरिआईचा गाडा घेऊन हाताने ढोलकं वाजवीत असते. ढोलक्याच्या एका बाजूने विशिष्ट प्रकारचा, सलग ध्वनी निर्माण करत दुसऱ्या बाजूला ठेका वाजवला जातो. तो वैशिष्ट्यपूर्ण ध्वनी मनात वेगळंच, गूढ वातावरण तयार करतो. या तालावर नाचणारा पोतराज पायातल्या घुंगरांनी वातावरण भारून टाकतो आणि हातातल्या आसुडाने स्वत:वर फटक्यांचा वर्षाव करून मरिआईच्या कडक स्वभावाला साजेसा भक्तीचा आविष्कार दाखवत राहतो.
मरिआईच्या गाड्यासमोर बोललेला नवस सहसा मंदिरात जाऊन फेडला जात नाही. त्यासाठी वर्षभर थांबून पोतराज येण्याचीच वाट पाहिली जाते. मरिआई देवी कुटुंबाच्या कल्याणासाठी, रक्षणासाठी सदैव जागृत असणाऱ्या भाबड्या गृहिणींची कल्याणकर्ती आहे आणि पोतराज देवी आणि भक्त या दोघांमधला दुवा आहे. दार उघड बया, दार उघड म्हणत तो मरिआईला भक्ताच्या भेटीला घेऊन येतो. मरिआई ही मूळची दक्षिणेची; द्रविडांच्या ग्रामदेवींपैकी एक आहे. दक्षिणेत तिला मरिअम्मा या नावाने संबोधले जाते. महाराष्ट्रात तिचे मंदिर गाववेशीवर असते.
पोतराज या मराठी शब्दाचा मूळ द्रविड शब्द पोत्तुराजु असा आहे. पोत्तु म्हणजे रेडा किंवा बकरा. दक्षिणेत अशा प्राण्यांचा बळी देवीला प्रसन्न करण्यासाठी दिला जात असे. असा बळी देण्याचे काम करणारा जो, तो पोत्तुराजु म्हणजेच मराठीत पोतराज होय. वर्षभरात एकदातरी ढोलक्याचा तालबद्ध आवाज, त्यावर वाजणारी घुंगरं आणि आसुडाचे कडाडणारे फटके कानावर पडतातच. हा थोडासा उग्र , भयावह वाटणारा गोंधळ कानी आला की, ग्रामीण व शहरी भागातील आयाबाया हातात धान्याचं सूप किंवा खण-नारळ घेऊन लगबगीनं बाहेर येतात. ग्रामीण भागातल्या महिलांची या देवीवर गाढ श्रद्धा आहे, असे पोतराज शंकर शिंदे सांगत होता.  मिळेल त्या धान्यावर कुटुंबाची गुजराण करणारा आणि आपल्या कलेवर अफाट प्रेम करणारा पोतराज आज आधुनिकतेच्या या समजामध्ये उपेक्षित राहिला आहे.

पोटाची खळगी भरणार तरी कशी?

ग्रामीण भागातील लोकांच्या श्रद्धेला आधार देणारा हा पोतराज आता विरळ होत चालला आहे. श्रद्धेच्या नावावर पोटासाठी चाबकाचे फटके अंगावर मारून घेतो, कोणताही सण असो पोटाची खळगी भरण्यासाठी दिवसभर उन्हा तान्हात ठिकठिकाणी घरोघरी फिरणारा पारंपरिक पोतराजाचे कुटुंबीय आजच्या स्पर्धेच्या व आधुनिकतेच्या युगात पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहेत. भुकेने पोट भरायला देवीची श्रद्धा व चाबकाच्या फटक्याने झालेल्या वेदनांना भक्तीचे रूप दिले जाते़ मळकट कपडे कंबरेला बांधून अंगावर चाबकाचे फटके मारून पैसा व धान्य मागत फिरणाऱ्या पोतराजाची कहाणी.
पोटाची खळगी भरण्यासाठी आपल्या कुटुंबाचे बिऱ्हाड पाटीवर बांधून दररोज विविध ठिकाणी भटकणाऱ्या सोलापूर येथील शंकर शिंदे आणि रमेश कोल्हे या पोतराजाची ही कहाणी. कंबरेला रंगीबेरंगी कपडे बांधून कपाळी कुंकवाचा मोठा टिळा लावून हातातील चाबकाचे अंगावर फटके ओढत पोटासाठी काही तरी मिळेल या अपेक्षेने वर्षोनवर्षे हा समाज भटकत आहे. यामधून मिळणाऱ्या धान्य व पैशांवर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवावा लागतो. पत्नी ढोल वाजविते आणि मी लोकांसमोर स्वत:वर चाबकाचे फटके घेत भीक मागून कुटुंबाचे पोट भरतो़
आम्हा कलावंताना ग्रामीण भागात थोड्या फार प्रमाणात किंमत मिळते, आम्हा कलावंताचा देव शेतकरी आहे; परंतु गेल्या दोन तीन वर्षांपासून पावसाने पाठ फिरवली आहे, त्यामुळे शेतकऱ्याचेच फार मोठे नुकसान झाले आहे़ त्यामुळे आम्हाला शहराकडे यावे लागत असल्याचे सांगितले.

Web Title: Traditional portraves neglected in modern times

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.