आरटीओच्या खिशात हजार कोटींचा महसूल, शहर आरटीओचा विक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2018 03:59 AM2018-04-05T03:59:51+5:302018-04-05T03:59:51+5:30

प्रादेशिक परिवहन कार्यालयाला (आरटीओ) पुणे शहरातून वर्षभरात तब्बल एक हजार कोटींहून अधिक महसूल मिळाला आहे. शहर आरटीओ कार्यालयाने हा विक्रमी महसूल मिळवत राज्यात पहिल्यांदाच हजार कोटींचा टप्पा गाठण्याचा मान मिळविला आहे, तर पुणे विभागाच्या महसुलातही मोठी वाढ झाली असून, तब्बल १ हजार ८७० कोटी रुपयांचे महसुली उत्पन्न मिळाले आहे.

Thousands of revenues in RTO pocket, records of city RTO | आरटीओच्या खिशात हजार कोटींचा महसूल, शहर आरटीओचा विक्रम

आरटीओच्या खिशात हजार कोटींचा महसूल, शहर आरटीओचा विक्रम

Next

पुणे  - प्रादेशिक परिवहन कार्यालयाला (आरटीओ) पुणे शहरातून वर्षभरात तब्बल एक हजार कोटींहून अधिक महसूल मिळाला आहे. शहर आरटीओ कार्यालयाने हा विक्रमी महसूल मिळवत राज्यात पहिल्यांदाच हजार कोटींचा टप्पा गाठण्याचा मान मिळविला आहे, तर पुणे विभागाच्या महसुलातही मोठी वाढ झाली असून, तब्बल १ हजार ८७० कोटी रुपयांचे महसुली उत्पन्न मिळाले आहे.
परिवहन विभागाचे पुणे विभागाचे कार्यालय पुण्यामध्ये आहे. या विभागाअंतर्गत पुणे शहर, पिंपरी- चिंचवड, बारामती, सोलापूर व अकलूज येथील कार्यालयांचा समावेश होतो.
राज्यात दर वर्षी पुणे विभागाचा महसूल इतर विभागांच्या तुलनेत जास्त असतो. प्रामुख्याने पुणे शहर कार्यालयाच्या महसुलामध्ये दर वर्षी मोठी भर पडत असते. वर्षागणिक वाहनांच्या वाढत जाणाऱ्या संख्येमुळे शहराच्या महसुलात कोट्यवधी रुपये जमा होतात. २०१७-१८ या वर्षांत पुणे कार्यालयांतर्गत सुमारे २ लाख ९० हजार नवीन वाहनांची नोंदणी झाली आहे. या आर्थिक वर्षात महसुलात विक्रमी वाढ होऊन एकट्या शहर कार्यालयात महसूल हजार कोटींच्या पुढे गेला आहे. आतापर्यंत राज्यात पहिल्यांदाच एखाद्या कार्यालयाने हजार कोटींचा टप्पा ओलांडला आहे. शहर कार्यालयासाठी यावर्षी सुमारे ८६२ कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठरविण्यात आले होते. मात्र, हा टप्पा ओलांडून कार्यालयाने तब्बल १ हजार २१ कोटी ५६ लाख रुपयांवर झेप घेतली. २०१६-१७ या वर्षीच्या तुलनेत हा महसूल २३७ कोटींनी अधिक आहे.

आॅनलाईनला वाढता प्रतिसाद
आरटीओ कार्यालयामध्ये दि. १ नोव्हेंबरपासून वाहनांसंबंधी सर्वप्रकारच्या कामकाजासाठी आॅनलाईन पद्धतीने अर्ज व शुल्क भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे आॅनलाईन माध्यमातून शुल्क भरण्यासाठी प्रतिसाद वाढत आहे. जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत नवीन वाहन नोंदणी व वाहनासंबंधित कामकाजासाठी कार्यालयाकडे एकूण २८३ कोटी रुपयांचा महसूल जमा झाला. यापैकी आॅनलाईन पद्धतीने २७२ कोटी रुपयांचा भरणा झाला आहे. परवान्यासाठी एकूण जमा झालेल्या ५ कोटी ३५ लाख रुपयांपैकी ५ कोटी २२ लाख रुपये आॅनलाईन भरले गेले आहेत.

शिकाऊ परवान्यांमध्ये घट
शिकाऊ परवाने घेण्यामध्ये मागील वर्षभरात मोठी घट झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. २०१६-१७ या वर्षात १ लाख ८५ हजार ५२८ जणांनी शिकाऊ परवाना घेतला होता. त्यापैकी ७२ हजार २९१ जणांनी पक्का परवाना काढला, तर २०१७-१८ मध्ये शिकाऊ परवान्यांची संख्या घटून १ लाख ३६ हजारांपर्यंत खाली आली आहे. मात्र, त्याचवेळी पक्का परवाना काढणाºयांच्या संख्येत वाढ झाली असून, ८१ हजार ३८१ जणांनी हा परवाना घेतला आहे. परवाना काढण्यासाठी आता अपॉइंटमेंट घ्यावी लागत आहे. परवाना मिळण्याची प्रक्रिया सोपी राहिली नाही. त्यामुळे पक्का परवाना घेणाºयांची संख्या तुलनेने वाढली असल्याचे आजरी यांनी सांगितले.

कार्यालयाकडून सोळा सेवा आॅनलाईन पद्धतीने नागरिकांसाठी खुल्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आॅनलाईन पद्धतीने शुल्क भरण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. तसचे विविध दंडाच्या रकमेत तसेच करांमध्ये झालेली वाढ, वाहनांची वाढती संख्या, कारवाई यामुळे महसुलामध्ये वाढ झाली आहे. राज्यात पहिल्यांदाच पुणे शहराने महसुलात एक हजार कोटींचा टप्पा पार केला आहे.
- बाबासाहेब आजरी,
प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे विभाग

आकर्षक क्रमांकांतून मोठी कमाई
प्रामुख्याने दुचाकी व चारचाकी वाहनांना आकर्षक क्रमांकांसाठी मोठी मागणी असते. त्यामुळे आरटीओकडून असे क्रमांक राखीव ठेवून लिलाव प्रक्रियेतून हे क्रमांक सर्वाधिक रकमेची बोली लावणाºयास दिले जातात. या प्रक्रियेतून पुणे विभागाला वर्षभरात तब्बल २३ कोटी ७६ लाख रुपयांची कमाई झाली आहे. वर्षभरात ‘१’ या क्रमांकासाठी सर्वाधिक साडेसहा लाख रुपये मिळाले आहेत.

आरटीओ कार्यालय, पुणे विभागाला
मिळालेला महसूल (कोटींत)
कार्यालय वर्ष वाढ वाढीची
२०१६-१७ २०१७-१८ टक्केवारी
पुणे ७८३.९३ १०२१.५६ २३७.६३ १३०
पिंपरी-चिंचवड ४५४.३६ ५६०.९५ १०६.५८ १२३
बारामती ६७.१४ ८३.३३ १६.१८ १२४
पुणे जिल्हा एकूण १३०५.४४ १६६५.८४ ३६०.४० १२७
सोलापूर १२७.७८ १५९.६० ३१.८१ १२४
अकलूज ३७.८१ ४५.४७ ७.६६ १२०
पुणे विभाग एकूण १४७१.०४ १८७०.९२ ३९९.८८ १२७

Web Title: Thousands of revenues in RTO pocket, records of city RTO

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.