भारतीयांवर ‘थर्ड क्लास’ राजकारण्यांची सत्ता - कुमार विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2018 02:11 AM2018-10-01T02:11:31+5:302018-10-01T02:12:38+5:30

लायन्स क्लब पुणे आयोजित कवी संमेलन

The Third Class' Politics of Power on Indians - Kumar Vishwas | भारतीयांवर ‘थर्ड क्लास’ राजकारण्यांची सत्ता - कुमार विश्वास

भारतीयांवर ‘थर्ड क्लास’ राजकारण्यांची सत्ता - कुमार विश्वास

Next

कात्रज : ‘‘आपल्या देशातील नागरिकांची गुणवत्ता सर्वोत्कृष्ट आहे. परंतु ‘फर्स्ट क्लास’ भारतीयांवर ‘थर्ड क्लास’ राजकीय लोकांचे वर्चस्व आहे आणि त्यांनी हुकूमत गाजवणे ही देशाची खरी शोकांतिका आहे. त्यामुळे लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर बिनधास्तपणे प्रश्न विचारायला शिका,’’ असे परखड मत प्रख्यात कवी आणि राजकीय नेते डॉ. कुमार विश्वास यांनी व्यक्त केले.

लायन्स क्लब आॅफ पुणे गणेशखिंड ट्रस्टच्या वतीने ‘एक श्याम कुमार विश्वास के नाम’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन गणेश कला क्रीडा मंदिर येथे केले होते. सामाजिक बांधिलकीच्या भूमिकेतून पुणे शहरात महिलांसाठी १० ई टॉयलेट आणि पुणे महापालिकेच्या शाळा व विनाअनुदानित अशा ३०० शाळांमध्ये स्मार्ट बोर्ड बसवण्याचा संकल्प हाती घेण्यात आला आहे. त्यापार्श्वभूमीवर या हास्य कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. संमेलनात हास्य कवी संपत सरल, भुवन मोहिनी, रमेश मुस्कान, दिलीप शर्मा आणि रोहित शर्मा यांच्या बहारदार कवितांनी धमाल उडवून दिली. आजच्या सामाजिक परिस्थितीवर, राजकीय स्थित्यंतरांवर मार्मिक भाष्य करत आणि हवे तिथे चिमटे काढत त्यांनी हास्याची मैफल रंगवली. तब्बल चार तास चाललेल्या हास्यमैफलीत सारे मनापासून रंगून गेले. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून राहुल गांधींपर्यंत आणि जीएसटीपासून ते पेट्रोल भाववाढीपर्यंतच्या ताज्या संदर्भांना कवितेत गुंफत या हास्य कवींनी हसत हसत मार्मिक सामाजिक भाष्य केले.

क्लब अध्यक्ष विजय भंडारी यांनी या उपक्रमामागील सामाजिक दृष्टिकोन स्पष्ट केला. सामाजिक बांधिलकीची विचारधारा यामागे असल्याचे त्यांनी सांगितले. या निमित्ताने शाळांसाठी ‘स्मार्टबोर्ड’ देणाऱ्या देणगीदारांचा विशेष सन्मान उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. देशाविषयी आत्मभान जागृत करणाºया डॉ. विश्वास यांच्या अखेरच्या कवितांनी कार्यक्रमात कळसाध्याय गाठला आणि ‘होठोंपे गंगा है.. दिल मे तिरंगा है..’ असा उद्घोष करीत कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विजय भंडारी, राजीव अग्रवाल, द्वारका जालन, शाम खंडेलावल यांनी प्रयत्न केले.

भाषा टिकली तरच संस्कृती टिकेल
संपत्ती, प्रगती या सर्वांपेक्षा सर्वांत महत्त्वाची आहे ती भाषा! त्यामुळे भाषा संवर्धनासाठी आणि जपणुकीसाठी असे कार्यक्रम होत राहिले पाहिजेत. आपण एकमेकांशी मातृभाषेतच बोलायचा आग्रह धरला पाहिजे. भाषेचे बीज जिवंत राहिले तरच संस्कृतीचा वटवृक्ष जिवंत राहील हे तथ्य लक्षात घ्यायला हवे, असेही मत कुमार विश्वास यांनी व्यक्त केले.

डॉ. विश्वास कवितेतून व्यक्त होत म्हणाले, ‘‘दूध महँगा, खून सस्ता है इस देश मे... अब वजीरो, अफसरो, पागलोंको छोड के कौन हसता है इस देश मे.. आपण विकासाच्या गप्पा मारतो मात्र गेल्या ७० वर्षांत आपण चांगला देश साकारू शकलो नाही, ही वस्तुस्थिती आहे.
देश अग्रक्रमावर हवा, त्याखाली विचार, त्याखाली पक्ष व सर्वात शेवटी व्यक्ती. मात्र आपल्याकडे नेमके उलटे चित्र आहे. लायन्स क्लब आॅफ गणेशखिंड ट्रस्टच्या सामाजिक उपक्रमाचे कौतुक करून ते म्हणाले, खरे तर हे शासनाचे काम आहे.
४सुरक्षा, वीज, पाणी, शिक्षण आणि आरोग्य चांगले मिळावे म्हणून आपण कर देतो. मात्र, त्यात शासन अपयशी ठरते म्हणून ही धुरा आपल्याला खांद्यावर घ्यावी लागते.

Web Title: The Third Class' Politics of Power on Indians - Kumar Vishwas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.