पाकिस्तानविरुद्ध खेळताना मानसिक तणाव असतोच : आकाश चिटके 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 07:13 PM2017-10-26T19:13:15+5:302017-10-26T19:22:22+5:30

एशिया कप हॉकी अजिंक्यपद स्पर्धेतील विजेतेपदाने भारतीय संघाचा आत्मविश्वास वाढला असून, आता पुढील लक्ष्य वर्ल्ड लीग फायनल असल्याचे भारतीय हॉकी संघाचा गोलरक्षक आकाश चिटके याने सांगितले. 

There is a lot of tension in playing against Pakistan: Akash Chitke | पाकिस्तानविरुद्ध खेळताना मानसिक तणाव असतोच : आकाश चिटके 

पाकिस्तानविरुद्ध खेळताना मानसिक तणाव असतोच : आकाश चिटके 

Next
ठळक मुद्देआकाश काही वर्षांत जगातील आघाडीच्या गोलरक्षकांमध्येसुद्धा गणला जाईल : सूरजीसिंग ठाकूरआगामी काळात होणार्‍या महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करण्याचे ध्येय : सूरज करकेरा

शिवाजी गोरे/पुणे 
ढाका येथे नुकत्याच झालेल्या एशिया कप हॉकी अजिंक्यपद स्पर्धेतील  विजेतेपदाने आमचा (भारतीय संघाचा) आत्मविश्वास वाढला असून, आता पुढील लक्ष्य वर्ल्ड लीग फायनल असल्याचे भारतीय हॉकी संघाचा गोलरक्षक आकाश चिटके याने सांगितले. 
एशिया स्पर्धेत एकूण सुमारे ४५ गोल (पेनल्टी कॉर्नरसह) अडविल्यामुळे ‘उत्कृष्ट गोलरक्षका’चा पुरस्कार जिंकलेला आकाश आणि मुंबईचा त्याचा सहकारी सूरज करकेरा दोन दिवसांच्या सुटीसाठी पुण्यातील खडकी येथील नोकरीचे ठिकाण बॉॅम्बे सॅपर्स येथे आले असता आकाशने ‘लोकमत’ला दिलेल्या खास मुलाखतीत वरील व्यक्तव्य केले. तो म्हणाला, ‘‘एशिया स्पर्धेतील भारतीय संघाची कामगिरी ही सर्वोत्कृष्ट होती. पूलमध्ये आम्ही बांगलादेश, जपान आणि पाकिस्तान या संघांचा पराभव केला. नंतर सुपर फोरमध्ये कोरिया, मलेशिया आणि पुन्हा पाकिस्तानला नमविले. अंतिम लढतीत मलेशियाला पराभूत केले. या एकंदरीत सामन्यांचा अभ्यास आणि अनुभव म्हणाल, तर संपूर्ण स्पर्धेत भारतीय संघ फक्त एका सामन्यात विजय संपादन करू शकला नाही. कोरियाविरुद्ध आम्हाला बरोबरीवर समाधान मानावे लागले. आमच्या आघाडीच्या खेळाडूंनी ज्या प्रकारे खेळ केला, त्याला तोड नाही. कारण आम्हाला वाटत होते, की शोर्ड मारिन संघाचे मार्गदर्शक नवीन आहेत; ते संघातील खेळाडूंशी कसे वागतील? त्यांची मते आणि खेळाडूंची मते जुळतील की नाही? असे अनेक प्रश्न होते. पण, आमच्या सर्वांच्या मनावरील दडपण एका क्षणात नाहीसे झाले. कारण जेव्हा ते मैदानावर आले आणि त्यांनी सर्वांशी चर्चा केली, तेव्हा संघातील वरिष्ठ खेळाडूंना विचारले, की ‘तुम्ही सांगा, कोणत्या संघाविरुद्ध कशी रणनीती आखायची? या वरिष्ठ खेळाडूंनी सर्वांची एकजूट करून जर खेळ केला, तर आपल्या संघाचे विजेतेपद निश्चित आहे.’ त्यामुळे संघातील खेळाडूंचा आत्मविश्वास जास्तच वाढला. ते फक्त सामना संपल्यावर प्रत्येक खेळाडूची कोठे कशी चूक झाली ते सांगत होते आणि ती कशी सुधारायची, याच्या सूचना देत होते.’’


पाकिस्तानविरुद्ध खेळताना तुझा अनुभव कसा होता? 
पाक संघाला आपण आपला पारंपरिक प्रतिस्पर्धी म्हणतो. क्रिकेट असो वा हॉकी, त्या संघाबरोबर खेळताना मनावर दडपण हे असतेच. कारण हॉकी किंवा क्रिकेटचा सामना जेव्हा पाकिस्तानविरुद्ध असतो, तेव्हा भारत देशाच्या कोट्यवधी क्रीडाप्रेमींचे लक्ष त्या सामन्यावर असते. प्रत्येकाला वाटते, या देशाविरुद्ध आपला संघ पराभूत होऊ नये. त्यामुळे प्रत्येक खेळाडूच्या मनावर त्याचे दडपण असते; पण या स्पर्धेत आम्ही त्यांच्याविरुद्ध एकाही सामन्यात पराभूत झालो नाही. सुपर फोरमधील त्यांच्याविरुद्धच्या सामन्यात संघातील सर्व खेळाडू पहिल्या तीन क्वार्टरपर्यंत दडपणाखाली होते. कारण, आघाडीच्या फळीतील खेळाडूंना अनेक प्रयत्न करूनही गोल करण्याची संधी मिळत नव्हती. त्यांचे पेनल्टी कॉर्नर अडवितानासुद्धा माझ्या मनावर प्रचंड दडपण असायचे. कारण पेनल्टी कॉर्नर म्हणजे सर्व मदार गोलरक्षकावर असते. त्या वेळी त्याची (गोलरक्षकाची) एक सेकंद जरी चेंडूवरील नजर हलली, तर काय होईल हे सांगता येत नाही; पण माझ्याकडून तसे काही झाले नाही. त्यांच्या संघातील खेळाडूंनीसुद्धा चांगला खेळ केला. त्यांच्या आघाडीच्या फळीने रचलेल्या काही चाली खूप चांगल्या होत्या; पण आपली बचाव फळीसुद्धा भक्कम होती. मलेशियाविरुद्धसुद्धा थोडे दडपण आले होते. ते जास्त वेळ टिकले नाही. 
मूळचा यवतमाळचा असलेला आणि हॉकीची सुरुवात पुणे क्रीडा प्रबोधिनीत करणारा आकाश शेवटी म्हणाला, ‘‘पुढील काळात महत्त्वाच्या खूप स्पर्धा आहे. बंगळुरू येथे भारतीय संघाचे प्रशिक्षण शिबिर ५ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. त्याची तयारी सुरू करून आणि ढाका येथील स्पर्धेत ज्या चुका झाल्या त्या कशा टाळता येतील, याचा पूर्ण अभ्यास होणार आहे.’’

आगामी काळात वर्ल्ड लीग फायनल, राष्ट्रकुल, आशियाई क्रीडा स्पर्धा, वर्ल्ड कप या सर्व महत्त्वाच्या स्पर्धा आहेत आणि आम्ही असा निर्धार केला आहे, की या सर्व स्पर्धांमध्ये आपल्या जिवाची बाजी लावून खेळ करून विजय संपादन करायचा. सध्या एकूण संघातील प्रत्येक खेळाची कामगिरी जर पाहिली, तर हे आमचे ध्येय नक्कीच आम्ही पूर्ण करू. बंगळुरू येथील शिबिरात आम्ही एशिया स्पर्धेतील आणि वर्ल्ड लीग फायनलमध्ये जे जगातील अव्वल १० संघ  सहभागी होतील, त्यांचे काही महिन्यांपूर्वीच्या विविध सामन्यांचे व्हिडिओ पाहून आपल्या प्रतिस्पर्ध्याविरुद्ध कसा खेळ करायचा, याची रणनीतीसुद्धा ठरविली जेईल. पण, वेळ आली तर ती त्या वेळच्या परिस्थितीनुसार बदललीसुद्धा जाईल. 

 

जेव्हा हे दोघे नवीन येथे आले होते, तेव्हापासून त्यांनी जे कष्ट घेतले आहेत; त्यामुळे त्यांच्या खेळात खूप सुधारणा झाली आहे. भारतीय संघाच्या सराव शिबिराचा फायदा त्यांना खूप झाला आहे. आताचे त्यांचे वय जर लक्षात घेतले, तर त्यांना पुढील काळात भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी खूप वर्षे मिळणार आहे. दोघांच्या गोलरक्षणात खूप फरक आहे. आकाश काही वर्षांत जगातील आघाडीच्या गोलरक्षकांमध्येसुद्धा गणला जाईल. कारण त्याच्यात शिकण्याची जिद्द आणि आत्मविश्वास खूप आहे.
- सूरजीसिंग ठाकूर, हॉकी मार्गदर्शक 

 

एशिया कप ही माझी पहिलीच मोठी स्पर्धा होती. या स्पर्धेत खेळल्यामुळे आता मला किती सराव केला पाहिजे आणि माझ्या गोलरक्षणात काय सुधारणा केल्या पाहिजेत, हे लक्षात आले आहे. संघातील खेळाडूंबरोबर सराव करताना आपली तंदुरुस्ती किती महत्त्वाची असते, हेसुद्धा लक्षात आले आहे. आगामी काळात होणार्‍या महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करण्याचे ध्येय आहे. 
- सूरज करकेरा, भारतीय संघाचा गोलरक्षक 

Web Title: There is a lot of tension in playing against Pakistan: Akash Chitke

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.