‘ससून’चा तृतीयपंथीयांचा स्वतंत्र वॉर्ड रिकामा, सध्या एकही रुग्ण दाखल नाही

By ज्ञानेश्वर भोंडे | Published: March 2, 2024 06:58 PM2024-03-02T18:58:54+5:302024-03-02T18:59:20+5:30

पुणे : ससून रुग्णालयात तृतीयपंथीय (ट्रान्सजेंडर) रुग्णांच्या उपचारासाठी नव्या इमारतीमध्ये गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात स्वतंत्र वाॅर्ड तयार केला. मात्र, या ...

The independent ward of 'Sassoon' for third party is empty, currently no patient is admitted | ‘ससून’चा तृतीयपंथीयांचा स्वतंत्र वॉर्ड रिकामा, सध्या एकही रुग्ण दाखल नाही

‘ससून’चा तृतीयपंथीयांचा स्वतंत्र वॉर्ड रिकामा, सध्या एकही रुग्ण दाखल नाही

पुणे : ससून रुग्णालयात तृतीयपंथीय (ट्रान्सजेंडर) रुग्णांच्या उपचारासाठी नव्या इमारतीमध्ये गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात स्वतंत्र वाॅर्ड तयार केला. मात्र, या वाॅर्डमध्ये तृतीयपंथीयांचा उपचारासाठी अल्प प्रतिसाद दिसून येत आहे. सध्या येथे एकही तृतीयपंथीय रुग्ण उपचारासाठी नाही.

तृतीयपंथीय रुग्णांना उपचारात भेदभावाची वागणूक मिळू नये, यासाठी हा वाॅर्ड तयार केला गेला. त्यांच्या शारीरिक गरजाही इतर रुग्णांच्या तुलनेत वेगळ्या असतात. त्यासाठी संपूर्ण राज्यातच शासकीय वैद्यकीय रुग्णालयांत तृतीयपंथीयांसाठी हा वाॅर्ड गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात सुरू करण्यात आला होता. या वॉर्डचे उद्घाटन वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी हा वाॅर्ड सजवण्यात आला हाेता. या वॉर्डमध्ये १५ बेड असून, दोन अतिरिक्त आयसीयू बेड आहेत.

या वाॅर्डमध्ये सध्या किती रुग्ण उपचार घेत आहेत? याबाबत ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डाॅ. विनायक काळे यांना विचारले असता ते म्हणाले की, सध्या या वाॅर्डमध्ये एकही रुग्ण नाही; परंतु भविष्यात असे रुग्ण आल्यास त्यांच्यासाठी हा वाॅर्ड सज्ज आहे; तसेच गेल्या आठ महिन्यांत फार थाेड्या रुग्णांनी यामध्ये उपचार घेतले आहेत. या वाॅर्डमध्ये अधिकाधिक रुग्णांनी उपचार घ्यावेत, असेही आवाहन त्यांनी यावेळी केले.

ट्रान्सजेंडर कार्डच्या मागणीमुळे अल्प प्रतिसाद

पुण्यातील तृतीयपंथीयांची संख्या सुमारे पाच हजार आहे. ‘ससून’मध्ये उपचार घेण्यासाठी ट्रान्सजेंडर कार्डची मागणी केली जाते. बहुतेक तृतीयपंथीयांकडे ते कार्ड नाही. त्यामुळे, त्यांना त्या वाॅर्डमध्ये दाखल करून घेण्यात येत नाही, अशा भावना काही तृतीयपंथीयांनी व्यक्त केल्या. तसेच, याबाबत त्यांच्या उपचारासाठी असा काही स्वतंत्र वाॅर्ड तयार करण्यात आलेला आहे, याबाबत माहिती नसल्यानेही या वाॅर्डमध्ये उपचारास प्रतिसाद मिळत नसल्याचे त्यांचे मत आहे.

ससून रुग्णालयात थर्ड जेंडर वॉर्ड तयार झाला असून एका बाजूला खेद व्यक्त केला जात आहे. त्या वॉर्डमध्ये पारलिंगी महिला यांची संख्या कमी दर्शवीत आहे. पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका यातून सुमारे ६ ते ७ हजार पारलिंगी महिला आणि पुरुष यांची नोंद असून त्यांनी या रुग्णालयात उपचार घेणे सुरू करणे अपेक्षित आहे; परंतु वॉर्डमध्ये तृतीयपंथी ओळखपत्र नसल्यास किवा शस्त्रक्रिया झाल्यावर लगेच डिस्चार्ज दिला जात आहे. त्यामुळे महिना सुमारे ४ ते ५ जण या वॉर्डमध्ये उपचार घेताहेत. कागदपत्र पूर्तता याची पडताळणी करूनच ॲडमिट केले जाते आहे. संबंधित संस्था या ठिकाणी जाऊन चौकशी केल्यावर उपचार पूर्ण होताना दिसत आहे. या ठिकाणी आजही जेंडर न्यूट्रल टॉयलेट उपलब्ध नाही.

वॉर्डमध्ये तृतीयपंथी महिला/ पुरुष यांना चांगला योग्य उपचार मिळावा आणि त्यांना सुयोग्य वॉर्ड यासाठी मागणी असताना देखील तशी कुठलीही यंत्रणा अद्याप सुखकर नाही. त्यामुळे ॲडमिट होण्यास तृतीयपंथी समाज आजही साशंक आहे.

- कादंबरी, सामाजिक कार्यकर्ती.

Web Title: The independent ward of 'Sassoon' for third party is empty, currently no patient is admitted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.