साताऱ्यातील साडी सेंटर लुटून दहशतवाद्यांनी खरेदी केले बॉम्बचे साहित्य

By नम्रता फडणीस | Published: March 13, 2024 09:28 PM2024-03-13T21:28:41+5:302024-03-13T21:28:41+5:30

विशेष न्यायालयाने सुनावली २१ मार्चपर्यंत पोलिस कोठडी

Terrorists looted the saree center in Satara and bought bomb materials | साताऱ्यातील साडी सेंटर लुटून दहशतवाद्यांनी खरेदी केले बॉम्बचे साहित्य

साताऱ्यातील साडी सेंटर लुटून दहशतवाद्यांनी खरेदी केले बॉम्बचे साहित्य

पुणे: गेल्या वर्षी इस्लामिक स्टेट (आयएस) संघटनेच्या अटक केलेल्या दोन दहशतवाद्यांनी सातारा महामार्गावरील अजंठा चौकातील गणपती सिल्क साडी
सेंटरवर दरोडा टाकून लुटलेल्या एक लाख रुपयांतून बॉम्ब तयार करण्याचे साहित्य खरेदी केल्याची धक्कादायक माहिती दहशतवादविरोधी पथकाच्या (एटीएस)
तपासात समोर आली आहे.

या प्रकरणी ‘एटीएस’ने महंमद शहानवाज आलम खान उर्फ अब्दुल्ला उर्फ इब्राहिम (वय ३१, रा. झारखंड), महंमद युनूस महंमद याकू साकी उर्फ छोटू
(वय २४, रा. रतलाम) आणि झुल्फिकार अली बडोदावाला उर्फ लाला उर्फ लालाभाई (रा. मुंबई) यांना अटक केली असून, न्यायालयाने त्यांना २१ मार्चपर्यंत
पोलिस कोठडी सुनावली.

सातारा महामार्गावरील अजंठा चौकातील गणपती सिल्क साडी सेंटरमध्ये ८ एप्रिल २०२३ रोजी रात्री नऊच्या सुमारास ही लुटमारीची घटना घडली होती. या
दुकानाचे व्यापारी रात्री दुकान बंद करत असताना अचानक दोघेजण दुकानात शिरले. त्यांनी पिस्तुलाचा धाक दाखवून दुकानाच्या गल्ल्यातून तीन दिवसांत
जमा झालेली एक लाख रुपयांची रोकड लुटली. त्यानंतर दुचाकीवरून पोबारा केला. या घटनेनंतर या विक्रेत्याने सातारा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली
होती.

दरम्यान, कोथरूड पोलिसांनी दुचाकी चोरताना तिघांना पकडले होते. हे तिघे संशयित दहशतवादी असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. त्यानंतर या
गुन्ह्याचा तपास ‘एनआयए’कडे सोपविण्यात आला होता. दरम्यान याच दहशतवाद्यांनी साताऱ्यातील व्यापाऱ्याला लुटल्याचे ‘एटीएस’च्या तपासात
निष्पन्न झाले आहे. या तीनही आरोपींविरोधात बेकायदा हालचाली प्रतिबंधक कायद्यासह (यूएपीए) विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या
आरोपींनी साडीचे दुकान लुटून तो पैसा दहशतवादी कारवायांसाठी वापरला आहे.

त्यांनी या पैशातून बॉम्ब तयार करण्याचे साहित्य कुठून खरेदी केले, या लुटमारीसाठी बंदूक कोठून आणली होती, याचा तपास करायचा आहे, तसेच या
गुन्ह्यात त्यांनी वापरलेली दुचाकी जप्त करायची आहे. त्यासाठी त्यांना पोलिस कोठडी देण्याची मागणी विशेष सरकारी वकील विजय फरगडे यांनी केली.
न्यायालयाने ती मान्य करत, आरोपींना नऊ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. 

 

Web Title: Terrorists looted the saree center in Satara and bought bomb materials

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.