तहानलेल्या तळजाई टेकडीला मिळणार हक्काचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2018 08:30 PM2018-05-08T20:30:28+5:302018-05-08T20:30:28+5:30

ग्रे -वॉटर प्रक्रिया प्रकल्पातून तळजाई टेकडीवर अडीच किमीच्या जलवाहिनीद्वारे आता प्रक्रिया केलेले पाणी आज पोहचले आहे. दररोज पाच लाख लिटर पाणी येथे मिळणार आहे. परिणामी आता वर्षभर तळजाई टेकडी हिरवीगार राहणार आहे.

Taljai hill still remains green due to gray water | तहानलेल्या तळजाई टेकडीला मिळणार हक्काचे पाणी

तहानलेल्या तळजाई टेकडीला मिळणार हक्काचे पाणी

googlenewsNext
ठळक मुद्देतळजाई टेकडीवरील झाडांना मिळणार जीवनदान टाकाऊ पाण्यामुळे टिकून राहणार तळजाईचे सौंदर्य

पुणे :  रणरणते ऊन आणि त्यामुळे शुष्क झालेली माती त्यामुळे वाळून जाणारी वनराई असे चित्र उन्हाळ्यात दिसून येते. त्यातच झाडे जर सार्वजनिक असतील तर त्यांची निगा राखण्याची जबाबदारी घेण्यास शासकीय यंत्रणाही तितकासा उत्साह दाखवत नाहीत. अशा परिस्थितीत पाण्याचा पुनर्वापर करून पुण्यातील तळजाई टेकडी हिरवीगार होणार आहे. या आगळ्या वेगळ्या उपक्रमामुळे तब्बल अडीच किलोमीटरची पाईपलाईन टाकून हजारो झाडे उन्हाळ्यातही बहरतील यात शंका नाही. 


  तळजाई टेकडीवर १०७ एकर क्षेत्रात वसुंधरा जैव वैविध्य उद्यान हा महत्वाकांक्षी प्रकल्प पुणे महानगरपालिकेकडून साकारला जात आहे. आतापर्यंत  पिण्याच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या तळजाई टेकडीवरील वनसंपदा उन्हाळ्यात वाळून जात असे. या टेकडीवरील वनसंपदेला वाचविण्यासाठी ,प्राणी -पक्षांच्या सुरक्षिततेसाठी पर्यावरणप्रेमी कार्यरत होते.  टेकडीवर टँकरद्वारे पिण्याचे पाणी पोहचवले जात होते मात्र आजपासून तिथे  कै. वसंतराव बागुल उद्यानात सुरु असणाऱ्या  ग्रे -वॉटर प्रक्रिया प्रकल्पात शुद्ध होऊन बाहेर येणारे पाणी पोचवले जाणार आहे. या प्रकल्पापासून  काही अंतर जवळ असणाऱ्या आणि उंचीवर असणाऱ्या तळजाई टेकडीला पाईपलाईनद्वारे पाणी दिले जाणार आहे.मंगळवारी प्रथमच प्रक्रिया केलेले पाणी जलवाहिनीतून तळजाई टेकडीवर  पोहचले. यावेळी या शुद्ध पाण्याचे जलपूजन करण्यात आले, याविषयी स्थानिक लोकप्रतिनिधी आबा बागुल यांनी माहिती दिली असून या पाण्यामुळे झाडांचे संरक्षण तर होणार आहेच पण जमिनीची धूपही रोखली जाणार असल्याचे सांगितले. या प्रकल्पासाठी ५० लाखांची पाईपलाईन टाकली असून प्रकल्प उभारण्यासाठी २ कोटी रुपयांचा खर्च आल्याचे सांगितले.  या ठिकाणी नेहरू स्टेडियमच्या धर्तीवर येथे एक लाख चौरस फुटाचे क्रीडांगणही  पूर्णत्वास आले असून लवकरच सौरउर्जेवरील ३०० किलोवॅटचा आदर्शवत प्रकल्पही  कार्यान्वित होणार आहे. टेकडीवर येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही यंत्रणाही सुरु होणार आहे. अशी माहिती बागुल यांनी यावेळी दिली. 
 

Web Title: Taljai hill still remains green due to gray water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.