take decision about Marathi 'Abhijat' soon; request to Chief Minister of Maharashtra | मराठीच्या अभिजाततेचा निर्णय तातडीने व्हावा; महामंडळ अध्यक्षांचे मुख्यमंत्र्यांना साकडे
मराठीच्या अभिजाततेचा निर्णय तातडीने व्हावा; महामंडळ अध्यक्षांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

ठळक मुद्देडॉ. श्रीपाद जोशी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली विनंती वर्षानुवर्षे केला जाणारा पाठपुरावा याची दखल घेतली जात नसल्याची व्यथाही मांडली पत्रात

पुणे : बडोदा येथील साहित्य संमेलनापूर्वी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळणे आणि मराठी विद्यापीठाबाबत निर्णय घेण्याच्या दृष्टीने तातडीने कृती व्हावी, यासाठी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी यांनी मुख्यमंत्र्यांना साकडे घातले आहे. 
बडोद्यात होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, सर्व मराठी खासदार, आमदार, केंद्रातील मराठी मंत्री यांनी एकत्रितपणे पंतप्रधानांना विनंती करुन मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची घोषणा करण्याची गळ घालावी, त्यासाठी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी व्यक्तिश: वेळ काढून तातडीचे प्रयत्न करावेत, केवळ राज्य सरकारच्या अधिकारात असलेल्या मराठी विद्यापीठाच्या स्थापनेची घोषणा बडोदा संमेलनापूर्वी करावी, जेणेकरुन संमेलनात अभिनंदनाचा ठराव करण्याची संधी प्राप्त होऊ शकेल, अशी विनंती अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
मराठीच्या अभिजात दर्जासाठी पत्रे, निवेदने, मागण्या, ठराव, वर्षानुवर्षे केला जाणारा पाठपुरावा याची दखल घेतली जात नसल्याची व्यथाही जोशी यांनी पत्रात मांडली आहे.
९१ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन केंद्राकडून मराठीला अभिजात दर्जाची घोषणा आणि राज्याकडून मराठी विद्यापीठ स्थापनेची घोषणा या पार्श्वभूमीवरच होईल, असे प्रयत्न करत मुख्यमंत्र्यांनी तडक कृती करावी, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने यासाठी केलेल्या ठरावांचा सातत्याने पाठपुरावा केला असल्याचे स्मरण मुख्यमंत्र्यांना करुन देत, मराठीला अभिजात दर्जा प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी मान्यवरांचे शिष्टमंडळ पंतप्रधानांकडे नेण्याची आणि दिल्लीत जंतरमंतरवर त्यांच्या नेतृत्वाखाली मराठी विश्वाला हे गा-हाणे मांडण्याची संधी उपलब्ध करुन देण्याची विनंती ९० व्या साहित्य संमेलनाप्रसंगी मुख्यमंत्र्यांना करण्यात आली होती. त्याचेही स्मरण डॉ. जोशी यांनी पत्राद्वारे करुन दिले आहे.


Web Title: take decision about Marathi 'Abhijat' soon; request to Chief Minister of Maharashtra
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.