suspends Officer caught a bribe of 10 lakhs | बडतर्फ विधी अधिकारी १० लाखांची लाच घेताना जाळ्यात
बडतर्फ विधी अधिकारी १० लाखांची लाच घेताना जाळ्यात

पुणे : बडतर्फ असतानाही त्या पदावर असल्याचे भासवून मोकाच्या गुन्ह्यात तक्रारदाराच्या बाजूने अभिप्राय देण्यासाठी १० लाख रुपयांची लाच घेताना पुणे ग्रामीण कार्यालयातील बडतर्फ विधी अधिकारी व खासगी व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले. बडतर्फ विधी अधिकारी चंद्रकांत कांबळे व खासगी व्यक्ती शशिकांत जयप्रकाश राव (वय ५०, रा़ वडवण, मुंढवा) अशी त्यांची नावे आहेत. याबाबत माहिती अशी, तक्रारदार यांच्या मालकांविरुद्ध मोका कायद्यान्वये कारवाई करण्याचा प्रस्ताव प्राप्त झाला होता.

या प्रस्तावावर विधी अधिकाऱ्यांचा अभिप्राय दिला जातो. चंद्रकांत कांबळे यांना या पदावरून मे २०१८ मध्ये बडतर्फ करण्यात आले होते. कांबळे याने अजून आपण त्याच पदावर असल्याचे तक्रारदाराला भासविले. त्यांंच्या मालकाच्या विरुद्ध मोका कायद्यान्वये प्राप्त प्रस्तावावर तक्रारदारांच्या बाजूने अभिप्राय देण्यासाठी १० लाख रुपयांची मागणी केली. तक्रारदारांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिल्यानंतर त्याची पडताळणी केली. कांबळे यांनी शशिकांत राव याच्याकडे पैसे देण्यास सांगितले. त्यानुसार पोलीस आयुक्तालयासमोरील चौपाटीवर तक्रारदारांकडून १० लाख रुपये स्वीकारताना राव याला पकडण्यात आले. त्यापाठोपाठ चंद्रकांत कांबळे यांना पकडण्यात आले. त्यांच्याविरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संशयास्पद वागणुकीमुळेच केले होते बडतर्फ
चंद्रकांत कांबळे यांची ग्रामीण पोलीस दलातील मुख्यालयात कंत्राटावर विधी अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली होती. त्यांच्याविरुद्ध तक्रार आली होती. त्याची चौकशी करुन व त्यांची वागणूक आणि व्यवहार संशयास्पद राहिल्याने मे २०१८ मध्ये त्यांना बडतर्फ करण्यात आले होते. अतिरिक्त पोलीस अधीक्षकांनी याबाबत चौकशी करून त्याचा अहवाल तयार केला. चंद्रकांत कांबळे यांना पुन्हा ग्रामीण पोलीस दलात विधी अधिकारी म्हणून नेमणूक करू नये, असा अहवाल गेल्या महिन्यात जानेवारी २०१९ मध्ये विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे पाठविला होता, असे पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी सांगितले.


Web Title: suspends Officer caught a bribe of 10 lakhs
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.