रस्ता रुंदीकरणासाठी रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 02:59 AM2018-08-19T02:59:08+5:302018-08-19T02:59:29+5:30

महादजी शिंदे रस्ता ३० मीटर रुंद करण्याची मागणी

Stop the road for widening the road | रस्ता रुंदीकरणासाठी रास्ता रोको

रस्ता रुंदीकरणासाठी रास्ता रोको

Next

पाषाण : औंध येथील महादजी शिंदे रस्ता रुंदीकरण करून तो ३० मीटरपर्यंत करावा, या मागणीसाठी महादजी शिंदे कृती समितीच्या वतीने शनिवारी दुपारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. येथे २४ मीटर रस्ता करण्यात येणार असून, त्यामुळे मोठी वाहतूककोंडी होणार आहे. म्हणून त्याच्या विरोधात नागरिकांनी एकत्र यावे, असेही आवाहन या वेळी कृती समितीने केले आहे.
स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये, महादजी शिंदे मार्ग १८ मीटर (६० फूट) ते ३० मीटर (१०० फूट) पर्यंत विकसित करण्याचा प्रस्ताव आहे. तज्ज्ञ समितीच्या शिफारशीप्रमाणे आणि टाऊन प्लॅनिंगचे संचालक, विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखालील समितीने हा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी शिफारस केली होती. परंतु, राज्य सरकारने फेब्रुवारी २०१८ मध्ये काही घटकांच्या मागणीनुसार रुंदीकरण ३० मीटरवरून २४ मीटरपर्यंत करण्याचा निर्णय दिला. त्याला नागरिकांनी विरोध दर्शविला आहे. सरकारच्या या निर्णयाविरोधात औंध नागरिकांनी एक बैठक घेऊन उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. अ‍ॅड. राजेंद्र अनभुले यांनी ती दाखल केली असून, येत्या २० आॅगस्ट रोजी त्यावर सुनावणी होणार आहे. याचिका दाखल केल्यानंतर येणाऱ्या खर्चासाठी निधी जमा करण्यासाठी आवाहन केले आहे. सुमारे ५ लाख रुपये जमा करण्यात येणार आहेत.
प्रस्तावित अरुंद रस्त्यावर सध्या मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी होत आहे. जर हा रस्ता ३० मीटर झाला नाही, तर येथील कोंडीत भरच पडणार आहे. तसेच वायू प्रदूषणही वाढणार आहे. त्यामुळे शाळेत जाणारी मुले, ज्येष्ठ नागरिक, सायकलस्वार, दुचाकीस्वार यांना त्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागणार आहे. अरुंद रस्त्यामुळे परिसरात आपत्कालीन सेवा रुग्णवाहिका, फायर ब्रिगेड, डॉक्टर, पोलीस मदत त्वरित पोचण्यास विलंब लागणार आहे. त्यामुळे हा रस्ता ३० मीटर झाला पाहिजे, अशी नागरिकांची मागणी आहे.
आंदोलनावेळी महादजी शिंदे रोड कृती समितीचे नितीन राणे, नगरसेविका अर्चना मुसळे, मधुकर मुसळे, मयूर मुंडे, विद्यासागर भापकर अरुण भापकर, प्रशांत थोरात, अशोक पाठक, विकास नाडकर्णी, मंगेश घुगे, विनय शामराज, हिरामण ठोंबरे, मिलिंद कदम, संजय काकड आदी उपस्थित होते. रास्ता रोको आंदोलनामुळे औंध परिसरात वाहतूककोंडी होऊन वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
मधुकर मुसळे म्हणाले, महादजी शिंदे रस्ता रुंदीकरण झाले पाहिजे. परिसरातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आमचा प्रयत्न राहील. रस्ता ३० मीटर करण्यासाठी पालकमंत्री यांना मागणी करणार आहे. दरम्यान, आंदोलनावेळी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

रहिवाशांनी एकत्र येऊन लढावे
औंधच्या रहिवाशांनी एकत्र येऊन या अन्यायाविरुद्ध लढण्याची मागणी केली जात आहे. प्रस्तावित रुंदीच्या रुंदी कमी करण्याचा निर्णय धोकादायक आहे आणि रहिवाशांच्या गुणवत्ता आणि सुरक्षेसाठी गंभीर धोका आहे. कायदेशीरपणे लढण्यासाठी आणि आपल्यातील एकता दर्शविण्याकरिता एकत्र येण्याचे आवाहन कृती समितीतर्फे करण्यात आले आहे.

Web Title: Stop the road for widening the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.