नमो महारोजगार मेळावा, विकासकामांच्या  उदघाटन कार्यक्रमाचे शरद पवारांना आमंत्रण नाही; निमंत्रण पत्रिकेत उल्लेख टाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 29, 2024 09:07 PM2024-02-29T21:07:57+5:302024-02-29T21:09:09+5:30

बारामतीत शनिवारी महायुतीच्या बड्या नेत्यांची उपस्थिती.

sharad pawar not invited to namo maharojgar melava inauguration of development works | नमो महारोजगार मेळावा, विकासकामांच्या  उदघाटन कार्यक्रमाचे शरद पवारांना आमंत्रण नाही; निमंत्रण पत्रिकेत उल्लेख टाळला

नमो महारोजगार मेळावा, विकासकामांच्या  उदघाटन कार्यक्रमाचे शरद पवारांना आमंत्रण नाही; निमंत्रण पत्रिकेत उल्लेख टाळला

लोकमत न्यूज नेटवर्क, बारामतीशहरात शनिवारी (दि २) विविध विकासकामांच्या उदघाटनासह नमो महारोजगार मेळाव्याचे  आयोजन करण्यात आले आहे.यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस,अजित पवार उपस`थित राहणार आहेत.मात्र,या कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते शरद पवार यांना कार्यक्रमाचे आमंत्रण दिले नसल्याचे स्पष्ट झाले आहे.तसेच कार्यक्रम पत्रिकेत देखील त्यांचा उल्लेख टाळण्यात आला आहे.

बारामतीत शनिवारी पोलीस उपमुख्यालय,पाेलीस उपअधिक्षक कार्यालय,पोलीस वसाहतीसह विमानतळाच्या धर्तीवर उभारलेल्या भव्यदिव्य बसस`थानकाचे या बड्या नेत्यांच्या हस्ते उदघाटन होणार आहे.शनिवारी सकाळी ९ वाजल्यापासुनच उदघाटनांचे कार्यक्रम होणार आहेत.त्यानंतर सकाळी १०.३० वाजता विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात नमो महारोजगार मेळावा होणार आहे.याच ठीकाणी सभा देखील होणार आहे.त्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे.

राज्यातील सर्वोच्च पदावर असणारे नेते येणार असल्याने बारामती देखील चकाचक झाली आहे.मेळाव्याच्या निमित्ताने ३०० पेक्षा जास्त उद्योजक यावेळी सहभागी होणार आहेत.तर ४० हजार पेक्षा जास्त पदांसाठी संधी मेळाव्यात मिळणार असल्याचे कळविण्यात आले आहे.त्यासाठी विभागीय आयुक्त ,जिल्हाधिकारी,जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी,सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता आदी अधिकार्यांनी बारामतीत तळ ठोकुन लक्ष घातले आहे.यावरुनच या कार्यक्रमाच्या भव्यदिव्यतेचे संकेत मिळतात.

मात्र, या कार्यक्रमाच्या निमंत्रणापासुन ज्येष्ठ नेते पवार  गुरुवारी(दि २९) सायंकाळपर्यंत दुरच असल्याचे चित्र होते.‘साहेबां’ना शनिवारच्या कार्यक्रमाचे कोणतेहि निमंत्रण मिळालेले नव्हते. तर कार्यक्रमाच्या ४८ तास अगोदर गुरुवारी (दि २९) खासदार सुळे यांना निमंत्रण पत्रिका मिळाली.या पत्रिकेत खासदार वंदना चव्हाण,श्रीरंग बारणे,सुप्रिया सुळे,डाॅ.अमोल कोल्हे यांची सन्माननीय उपस`थतीमध्ये नावे आहेत.मात्र,या पत्रिकेवर खासदार शरद पवार यांचा उल्लेख टाळण्यात  आला आहे.यावरुन राजकारण पेटण्याची चिन्हे आहेत.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांना या कार्यक्रमाचे आमंत्रण मिळालेले नाही.  याबाबत बारामतीत पत्रकारांशी  बोलताना खासदार सुप्रिया  सुळे  म्हणाल्या,याचे मला आश्चर्य वाटले.कारण २०१५ च्या शासनाच्या जीआरनुसार अशा कार्यक्रमांमध्ये स्थानिक लोकसभा, राज्यसभा खासदारांचे नाव घालावे लागते. ‘पवारसाहेब’ आजही ‘पार्लमेंट मेंबर’ आहेत.पत्रिकेत 'वंदनाताईं'चे चे नाव आहे.पण ‘पवारसाहेबां’चे नाव नाही.याचे उत्तर माझ्याकडे नाही.याबाबत प्रोटोकाॅल डीपार्टमेंटला विचारावे लागेल.मला ४८ तास अगोदर या कार्यक्रमाचे आमंत्रण मिळाले तरी आपण कार्यक्रमाला  जाणार आहे.लोकप्रतिनिधी या नात्याने जाणे  हि माझी नैतिक जबाबदारी आहे.कीती तास आमंत्रण मिळाले हे महत्वाचे नाही.शेवटच्या क्षणी आमंत्रण मिळाले तरी मला कमीपणा नाही.लोकांसाठी शेवटच्या क्षणी बोलावले असते तरी मी कार्यक्रमाला गेले असते,असे सुळे म्हणाल्या.महाराष्ट्राच्या वतीने ‘साहेब’ राज्यसभेवर गेले आहेत.त्यामुळे साहेबांना न बोलविणे म्हणजे महाराष्ट्राच्या लोकप्रतिनिधींना न बोलविणे असा त्याचा अर्थ होतो,असे सुळे म्हणाल्या.

Web Title: sharad pawar not invited to namo maharojgar melava inauguration of development works

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.