शाहरूख खानसह अनेकांनी केली चंद्रावर जमीन खरेदी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 05:33 AM2019-01-19T05:33:03+5:302019-01-19T05:33:20+5:30

अमेरिकेतील लुना सोसायटीचा दावा

Shah Rukh Khan and many people buy land on moon! | शाहरूख खानसह अनेकांनी केली चंद्रावर जमीन खरेदी!

शाहरूख खानसह अनेकांनी केली चंद्रावर जमीन खरेदी!

- युगंधर ताजणे 


पुणे : ‘चाँद चुराके लाया हूँ...’ हे गाणे गुणगुणत प्रेयसीची मनधरणी करण्याची कविकल्पना फक्त सिनेमात शक्य आहे. मात्र, ज्यांनी चंद्रावर घर बांधण्याचे स्वप्न उराशी बाळगून चंद्रावरील जमीन खरेदी केली, त्यांची फसवणूकच झाली.


पुण्यातील राधिका दाते-वाईकर यांच्या फसवणुकीचे प्रकरण नुकतेच उघडकीस आले आहे. असे असले तरी चंद्रावर जमीन खरेदी करणाऱ्या राधिका या एकट्याच नाहीत. प्रसिद्ध अभिनेता शाहरूख खान आणि सुशांतसिंग रजपूत यांच्यासह भारतातील अनेक नागरिकांनी चंद्रावर ‘प्रॉपर्टी’ खरेदी केली आहे, अशी माहिती लुना सोसायटी इंटरनॅशनलचे संचालक मायकेल रिकी यांनी ‘लोकमत’ला दिली आहे. तेरा वर्षापूर्वी ५० हजार रुपये एकर या दराने चंद्रावर खरेदी केलेल्या पुण्यातील राधिका दाते-वाईकर यांची फसवणूक झाली आहे. तशी तक्रारही त्यांनी पोलीस ठाण्यात दिली आहे. या संदर्भात ‘लोकमत’च्या १४ जानेवारीच्या अंकात वृत्त प्रसिद्ध होताच या प्रकरणाला वाचा फुटली. भारतातील आणखी किती जणांनी अशाप्रकारे चंद्रावर जमीन खरेदी केली?, त्याचा दर काय आहे? जमिनीचा मालकीहक्क कसा मिळतो, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी ज्या कंपनीच्या माध्यमातून हा व्यवहार सुरु आहेत, अशा लुना सोसायटी इंटरनॅशनल या संस्थेशी ‘लोकमत’ने ई-मेलद्वारे संपर्क साधला.


१९९९ पासून लुना सोसायटी इंटरनॅशनल आणि द लुनर रजिस्ट्रीच्या वतीने चंद्रावरील हजारो एकर जागा विक्रीकरिता खुली करण्यात आली आहे. लुनर सेटलमेंट अ‍ॅक्ट १९९९ आणि ‘स्पेस रिसोर्स एक्स्प्लोरेशन अ‍ॅण्ड युटिलायझेशन अ‍ॅक्ट २०१५’ नुसार ही खरेदी विक्री केली जाते. जगभरातील अनेक नामांकितांनी आजवर चंद्रावर शेकडो एकर जमीन खरेदी केली आहे. यात शाहरुख खानसह अनेक भारतीयांचा समावेश आहे. जगप्रसिध्द पॉप गायक मायकेल जॅक्सन याने हजारो एकर जागा चंद्रावर खरेदी केली होती. तसा उल्लेख त्याने मृत्युपत्रात केला असून आपल्या निधनानंतर ती मुलांच्या नावावर करावी असे म्हटले आहे.

जगभरातील उद्योगपती, व्यापारी चंद्रावर जागा घेण्याकरिता आमच्या कंपनीशी संपर्क साधतात, असा दावा संस्थेचे संचालक मायकेल रिकी यांनी केला आहे. मात्र प्रत्यक्षात जमिनीचा ताबा कधी आणि कसा मिळणार, या प्रश्नाचे उत्तर त्यांनी दिले नाही. शिवाय, राधिका दाते यांचा आरोपही या सोसायटीने फेटाळून लावला आहे.

Web Title: Shah Rukh Khan and many people buy land on moon!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.