कलम 370 रद्द करणार : सुब्रह्मण्यम स्वामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2017 10:29 PM2017-07-23T22:29:23+5:302017-07-23T22:29:23+5:30

घटनेतील कलम 370 रद्द करणार असून त्यासाठी राष्ट्रपतीच्या एका आदेशाची आवश्यकता आहे. आता तर भाजपाचेच राष्ट्रपती आहेत.

Section 370 can be canceled: Subrahmanyam Swamy | कलम 370 रद्द करणार : सुब्रह्मण्यम स्वामी

कलम 370 रद्द करणार : सुब्रह्मण्यम स्वामी

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 23 -  घटनेतील कलम 370 रद्द करणार असून त्यासाठी राष्ट्रपतीच्या एका आदेशाची आवश्यकता आहे. आता तर भाजपाचेच राष्ट्रपती आहेत. त्यासाठी दोन तृतीयांश बहुमताची आवश्यकता नाही. येत्या दिवाळीपर्यंत सर्वोच्च न्यायालयात अयोध्या रामजन्मभूमी वादाबाबत निर्णय येईल, त्यानंतर पुढच्या वर्षी प्रत्यक्ष राममंदिराच्या उभारणीला सुरुवात करणार आहे. कॉंग्रेसचा सर्व आघाड्यांवर पराभव झाल्याने नैराश्यामधून त्यांनी असहिष्णुतेचा मुद्दा हाती घेतला आहे. हा केवळ प्रचार असून त्यामधून काहीही साध्य होणार नसल्याचे मत खासदार डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी यांनी व्यक्त केले. 
विवेक संवाद आणि भारत विकास परिषदेच्यावतीने आणिबाणीच्या काळात मिसामध्ये कारागृह भोगलेल्या सत्याग्रहींच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी स्वामी यांचे  ‘असहिष्णूता सत्य की आभास’ या विषयावर व्याख्यान झाले. यावेळी महापौर मुक्ता टिळक, माजी खासदार प्रदीप रावत, भारत विकास परिषदेचे अध्यक्ष दत्तात्रय चितळे, विवेक समुहाचे प्रबंधक संपादक दिलीप करंबेळकर उपस्थित होते. स्वामी म्हणाले, ‘आपण देशावर आणीबाणी लादली याची जाणिव असतानाही कॉंग्रेसकडून असहिष्णूतेचा प्रचार केला जात आहे. आणीबाणीच्या काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी सत्याग्रहींचे भुमीगत जाळे निर्माण केले होते. कॉंग्रेसला आणीबाणीची भिती वाटत असल्यानेच त्यांनी मधुर भांडारकरच्या सिनेमाला विरोध केला आहे. ही असहिष्णूता नाही का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. अधिकार हिसकावणे ही असहिष्णूता आहे. 
मोदींचे नेतृत्व, भ्रष्टाचाराविरुद्धची लढाई, हिंदु म्हणून झालेले मतदान यामुळे 2014 मध्ये केंद्रात पुर्ण बहुमत मिळाले. यापुर्वी अल्पसंख्यांना एकत्र करुन त्यांचे एकगठ्ठा मतदान घेतले जात होते आणि बहुसंख्यांकांची मते जातीच्या आधारावर विभाजित केली जात होती. भाजपाने बहुसंख्यकांना एकत्र करुन अल्पसंख्यकांची मते विभागीत केल्यामुळे यश मिळाले. त्यामुळे कॉंग्रेसला परायजाचा सामना करावा लागला. जुन्या मुद्यांवर आपण निवडणुका जिंकू शकणार नाही याची कल्पना आल्यानेच असहिष्णूतेचा मुद्दा त्यांनी तापवायला सुरुवात केली आहे. आणीबाणी हीच खरी असहिष्णूता होती. त्यामुळेच 1977 साली कॉंग्रेसचा दारुण पराभव झाला. 
देशात हिंदु एक होत चालले असून भाजपाच्या मतदानाचा टक्का 40 टक्क्यांवर जाईल. सोनिया गांधी, राहुल गांधी यांना हेराल्ड प्रकरणी न्यायालयात खेचले, पी. चिदम्बरम, शशी थरुर हे सुध्दा कारागृहात जातील. ज्यांनी अपराध केलेत त्यांच्यावर कारवाई करणे ही असहिष्णूता कशी होऊ शकते. राज्य घटनेने दिलेल्या मूलभूत अधिकारांमध्ये लिखाण आणि भाषण स्वातंत्र्यालाही सीमा घातलेली असून देशाची अखंडता आणि सुरक्षेला उपद्रव होणार नाही असा अंकुश ठेवण्यात आलेला आहे. गो हत्येवर प्रतिबंध असावा, संस्कृत शब्दांचा अधिकाधिक वापर व्हावा असे संविधानातच नमूद आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल यांना उशीरा भारतरत्न देण्यात आले. पंडीत जवाहरलाल नेहरुंनी स्वत:च्याच स्वाक्षरीने स्वत:ची शिफारस करुन भारतरत्न पदरात पाडून घेतल्याचा आरोपही त्यांनी केला. 
नेहरुंच्या सांगण्यावरुनच शेख अब्दुल्लांनी कलम 370 घटनेमध्ये अंतर्भूत करण्याचा आग्रह धरल्याचे सांगत ही सुद्धा असहिष्णूताच होती असेही ते म्हणाले. आॅपरेशन ब्ल्यू स्टार कोणाच्या आदेशावरुन झाले, इंदिरा गांधींच्या हत्येनंतर तीन हजार शिखांचे हत्याकांड करण्यात आले ही सुद्धा असहिष्णूताच होती. पी. चिदंबरम यांच्या आदेशावरुन उत्तरप्रदेशातील 40 तरुणांना गोळ्या घालून त्यांचे मृतदेह कालव्यात फेकून देण्यात आले होते. त्यामुळे कॉंग्रेसने असहिष्णूतेविषयी बोलू नये असेही त्यांनी ठाणकावले. आॅस्टेÑलिया आणि अमेरिकेमध्ये  समान नागरी कायदा आहे. भारतामध्ये का नसावा. आजवर इतिहासामध्ये देशातील मुळ राजे, वीर यांना स्थानच देण्यात आले नाही. आक्रमकांचा इतिहास शिकवला जातो. त्यामुळे इतिहासांच्या पुस्तकांमध्ये बदल करण्यात येत आहेत. आर्य आणि द्रवीड असा वाद निर्माण करुन भेद वाढवण्यात आला. चुकीच्या गोष्टी सांगून समाजाचे विभाजन करण्यात आले. हिंदुविरोधी विष डोक्यामध्ये भरवले जात आहे. रामजन्मभूमी ही आमची आस्था आहे. जमाते इस्लामी आणि सुन्नी वक्फ बोर्ड हे अयोध्येतील वादग्रस्त जागा आमची मालमत्ता आहे असे म्हणतात. मात्र, आम्ही त्यांना शरयू नदीच्या पलिकडे मस्जिद बांधण्यासाठी मदत करुन असे म्हटले आहे. राम मंदिर बांधण्यासाठी आम्हाला सरकारची गरज नाही. हिंदु मर्यादेपेक्षा अधिक सहिष्णू आहेत. यावेळी महापौर मुक्ता टिळक म्हणाल्या,  ‘संघ परिवाराला संघर्ष नवा नाही. सध्या नवं वारं वाहू लागलय. पंतप्रधान नरेंद्र मोदी एवढ काम करतात, मात्र, त्यांनाच असहिष्णू ठरवलं जातंय.’ माजी खासदार प्रदीप रावत यांनी कार्यक्रमामागील भुमिका स्पष्ट केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करंबेळकर यांनी केले. तर सुत्रसंचालन अभिनेते राहुल सोलापूरकर आणि निरजा आपटे यांनी केले. चितळे यांनी आभार मानले. 
 
यावेळी 1975 साली लादण्यात आलेल्या आणीबाणीच्या काळात मिसाखाली कारागृहात शिक्षा भोगलेल्या 700 सत्याग्रहींचा सत्कार करण्यात आला. प्रातिनिधीक स्वरुपामध्ये ज्येष्ठ सत्याग्रही विजयाताई काडगी, वसंत दत्तात्रय प्रसादे आणि नारायण वासुदेव अत्रे यांचा मंचावर स्वामी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Web Title: Section 370 can be canceled: Subrahmanyam Swamy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.