सयाजीरावांचे कर्तृत्व गुजराथीमध्येही; अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात खंडांचे प्रकाशन होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2018 12:55 PM2018-01-03T12:55:50+5:302018-01-03T13:06:13+5:30

बडोदानगरीत होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सयाजीराव गायकवाड यांच्या कार्यकर्र्तृत्वाचा मागोवा घेणाऱ्या खंडांचे प्रकाशन होणार आहे.

SayajiRao's work in Gujarati language; The publication of part in the All India Marathi Sahitya Samelan | सयाजीरावांचे कर्तृत्व गुजराथीमध्येही; अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात खंडांचे प्रकाशन होणार

सयाजीरावांचे कर्तृत्व गुजराथीमध्येही; अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात खंडांचे प्रकाशन होणार

Next
ठळक मुद्देसयाजीरावांची गौरवगाथा गुजराथी भाषेतही होणार शब्दबद्धगुजरात शासनाने घेतला पुढाकारमहाराष्ट्र शासनाच्या उच्च शिक्षण विभागातर्फे २५ खंडांचे काम हाती, त्यापैकी १२ खंडांचे काम पूर्ण

प्रज्ञा केळकर-सिंग 
पुणे : बडोदानगरीत होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सयाजीराव गायकवाड यांच्या कार्यकर्तृत्वाचा मागोवा घेणाऱ्या खंडांचे प्रकाशन होणार आहे. या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र शासनाप्रमाणे सयाजीरावांची गौरवगाथा गुजराथी नागरिकांपर्यंत पोहोचविता यावी, यासाठी गुजरात शासनाने पुढाकार घेतला आहे. त्यामुळे या युगपुरुषाची गौरवगाथा गुजराथी भाषेतही शब्दबद्ध होईल.
महाराष्ट्र आणि गुजरातचे ॠणानुबंध अनेक वर्षांपासूनचे आहेत. सयाजीरावांचा शिक्षण, धर्म आणि तत्त्वज्ञान याबाबतचा दृष्टिकोन, साहित्य, कला, संस्कृती याविषयीची आस्था, कलांच्या वाढीसाठी, त्यांच्या जतनासाठी बडोदा संस्थानात केलेले प्रयत्न, राज्य प्रशासनातील हातखंडा ही दोन्ही राज्यांसाठी गौरवाची बाब आहे. ही ओळख सुवर्णाक्षरांमध्ये नोंदवली जावी, यासाठी महाराष्ट्र शासनाच्या उच्च शिक्षण विभागातर्फे २५ खंडांचे काम हाती घेण्यात आले. त्यापैकी १२ खंडांचे काम पूर्ण झाले असून, त्यांपैकी ६ इंग्रजीमध्ये, तर ६ खंड मराठी भाषेत संपादित करण्यात आले आहेत. 
शासनाच्या महाराजा सयाजीराव गायकवाड चरित्र साधने प्रकाशन समितीतर्फे हे काम करण्यात येत आहे. पुढील वर्षी या खंडांचा हिंदी भाषेत अनुवाद होणार असल्याची माहिती समितीचे सचिव बाबा भांड यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. ही गौरवगाथा मराठी भाषकांप्रमाणे गुजराथी बांधवांपर्यंत पोहोचावी, यासाठी गुजरात सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत.
सयाजीराव गायकवाड हे स्वातंत्र्यपूर्व भारतातील एक द्रष्टा आणि लोकशाहीवादी संस्थानिक होते. बडोदा हे त्यांचे संस्थान त्या काळात कला-साहित्यापासून ते आधुनिक बदलांपर्यंत अनेक गोष्टींसाठी वाखाणले गेले होते. 
उत्तम प्रशासक, द्रष्टा नेता आणि कला, साहित्याची उत्तम जाण असलेले संस्थानिक अशी सयाजीरावांची ओळख आजही कायम आहे. गुजरातचे माजी सांस्कृतिकमंत्री राजेंद्र त्रिवेदी यांच्याशी गेल्या वर्षी याबाबत चर्चा झाली होती. त्यानंतर सयाजीरावांच्या नातसून आणि महाराजा सयाजीराव गायकवाड विद्यापीठाच्या कुलपती राजमाता शुभांगिनीराजे गायकवाड यांची काही शासकीय अधिकाºयांनी भेट घेतल्याची माहितीही विश्वसनीय सूत्रांनी दिली. 
सयाजीरावांच्या कार्यकर्तृत्वाचे विविध पैैलू सामान्यांसमोर उलगडता यावेत, यासाठी ही गौैरवगाथा अनुवादित केली जात आहे. 
पहिल्या १२ खंडांची छपाई बालभारतीतर्फे पूर्ण झाली असून, पुढील खंडांच्या कामालाही वेग आला आहे. सयाजीरावांचा इतिहास शब्दबद्ध करीत असताना गुजरात शासनाला सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचा मानसही प्रकाशन समितीतर्फे व्यक्त करण्यात आला आहे.

बडोदा-महाराष्ट्राचे नाते होणार दृढ
संमेलनाच्या स्वागताध्यक्ष महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या नातसून, महाराजा सयाजीराव गायकवाड विद्यापीठाच्या कुलपती राजमाता शुभांगिनीराजे गायकवाड यांचा महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने नुकताच सत्कार करण्यात आला. 
या वेळी ‘संमेलनातून मराठी-गुजराथी साहित्याच्या आदानप्रदानाला चालना मिळेल. साहित्य संमेलनाच्या माध्यमातून बडोदा आणि महाराष्ट्र यांचे नाते दृढ करण्याचे काम होईल,’ अशा शब्दांत त्यांनी सूतोवाच केले होते.
सयाजीराव गायकवाड यांच्या खंडांमध्ये त्यांनी त्या काळात लिहिलेली पत्रे, भाषणे, कायदे, सामाजिक सुधारणा, दुष्काळातील नोंदी, सुप्रशासनाबाबतचे त्यांचे विचार आदी बाबींचा समावेश करण्यात आला आहे. 

Web Title: SayajiRao's work in Gujarati language; The publication of part in the All India Marathi Sahitya Samelan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.