विश्रामगृह नोंदणी प्रक्रिया होणार आॅनलाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 06:15 PM2018-08-11T18:15:59+5:302018-08-11T18:30:58+5:30

आयबी विश्रामगृहाचा ताबा ठराविक कार्यकर्त्यांनी घेतला असल्याची बाब प्रशासनाच्या निदर्शनास आली होती. त्यामुळे काही महिन्यांपूर्वी अनधिकृतपणे खोल्यांमध्ये राहणा-या व्यक्तींना बाहेर काढण्याची मोहीम पीडब्ल्यूडीकडून हाती घेण्यात आली.

rest house registration process will be online | विश्रामगृह नोंदणी प्रक्रिया होणार आॅनलाईन

विश्रामगृह नोंदणी प्रक्रिया होणार आॅनलाईन

googlenewsNext
ठळक मुद्देपुण्यातील आयबीसह इतरही सर्व शासकीय विश्रामगृहांचे वाटप सुलभ आणि पारदर्शी पध्दतीने होणार आहे. विश्रामगृहाच्या खोल्यांच्या वितरण व्यवस्थेत बदल करण्याचा निर्णय

पुणे: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियंत्रणाखाली असलेल्या शासकीय विश्रामगृह वितरणात मोठ्या प्रमाणावर गोंधळ होत असल्याने सर्व विश्रामगृहांच्या खोल्यांचे वितरण आॅनलाईन पध्दतीने करण्यात यावे, असा प्रस्ताव विभागातर्फे शासनाला पाठविण्यात आला आहे. त्यामुळे पुण्यातील आयबीसह इतरही सर्व शासकीय विश्रामगृहांचे वाटप सुलभ आणि पारदर्शी पध्दतीने होणार आहे.
लोकप्रतिनिधी तसेच विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि शासकीय अधिकारी विविध कामानिमित्ताने पुण्यात येत असतात. पुण्यात आलेल्या या व्यक्तींची एक- दोन दिवस किंवा काही दिवस निवासाची व्यवस्था व्हावी, यासाठी शहरात व शहराबाहेर सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे शासकीय विश्रामगृह बांधण्यात आली आहेत. मात्र,गेल्या काही वर्षांपासून ही विश्रामगृह ठराविक व्यक्तींची निवासस्थाने झाली आहेत. तसेच या वसतीगृहाच्या वितरणात गैरव्यवहार होत असल्याचाही आरोप काही संघटनांकडून करण्यात आला. त्यामुळे विश्रामगृहाच्या खोल्यांच्या वितरण व्यवस्थेत बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 
आयबी विश्रामगृहाचा ताबा ठराविक कार्यकर्त्यांनी घेतला असल्याची बाब प्रशासनाच्या निदर्शनास आली होती. त्यामुळे काही महिन्यांपूर्वी अनधिकृतपणे खोल्यांमध्ये राहणा-या व्यक्तींना बाहेर काढण्याची मोहीम पीडब्ल्यूडीकडून हाती घेण्यात आली. त्यासाठी संबंधित खोल्यांवर नोटीस चिटकविण्यात आली. तसेच पोलीस बंदोबस्तात या खोल्या खाली करण्यात आल्या. संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून खोल्यांचे वितरण झाल्यास किती खोल्या खाली आहेत.कोणत्या खोलीमध्ये कोणती व्यक्ती किती दिवसांपासून राहत आहे. ही माहिती आॅनलाईन पद्धतीने उपलब्ध होऊ शकणार आहे. त्यामुळे ही आॅनलाईन प्रणाली लवकरात लवकर सुरू व्हावी, यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्रयत्न केले जात आहेत. शासनाकडे सादर करण्यात आलेल्या प्रस्तावास मंजूरी मिळाल्यांतर लगेचच आॅनलाईन वितरण प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.

Web Title: rest house registration process will be online

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.