Pune-Secunderabad newest version! Anil Shirole presented the green flag | नव्या रुपड्यातील पुणे-सिकंदराबाद...!; अनिल शिरोळे यांनी दाखविला हिरवा कंदिल

ठळक मुद्देपुणे विभागातर्फे ‘प्रोजेक्ट स्वर्ण’ अंतर्गत शताब्दी एक्सप्रेस सुरू करण्यात आली नव्या रुपातपुण्यातून पहाटे ५.५० वाजता सुटणारी ही गाडी सिकंदराबाद येथे पोहचणार २ वाजून २० मिनिटांनी

पुणे : अत्याधुनिक सोयी-सुविधांसह नव्या रुपात प्रवाशांसाठी सुरू करण्यात आलेल्या पुणे-सिकंदराबाद शताब्दी एक्सप्रेसचा शुभारंभ पुण्याचे खासदार अनिल शिरोळे यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आला. शिरोळे यांच्यासह रेल्वेच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी शताब्दी एक्सप्रेसला हिरवा कंदिल दाखवला.
पुणे विभागातर्फे ‘प्रोजेक्ट स्वर्ण’ अंतर्गत शताब्दी एक्सप्रेस नव्या रुपात सुरू करण्यात आली आहे. या गाडीतील डब्यांमधील बैठक व्यवस्था नावीन्यपूर्ण आहे. डब्यांमध्ये रेड कारपेट अंथरले असून ही गाडी धूळ विरहीत आहे. गाडीच्या सजावटीमुळे व आकर्षक बैठक व्यवस्थेमुळे प्रवाशांना आरामदायक प्रवास करता येणार आहे. या गाडीत महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश या दोन राज्यांच्या संस्कृतीचे व लोककलांचे दर्शन घडविणाऱ्या पेंटिंग आहेत. गाडीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरेही लावण्यात आले आहेत. दृष्टीहीन प्रवाशांसाठी ब्रेल लिपीमध्ये बैठक क्रमांकाची व्यवस्था केली आहे. उच्च श्रेणी वर्ग प्रवाशी डब्यांमध्ये वायफाय व्यवस्था बसविण्यात आली आहे. गाडीत प्रवेश करणाऱ्या प्रवाशांना विविध सुविधांची माहिती देणारा सुचना फलक लावले आहेत. पुण्यातून पहाटे ५.५० वाजता सुटणारी ही गाडी सिकंदराबाद येथे २ वाजून २० मिनिटांनी पोहचणार आहे.


अनिल शिरोळे यांनी नव्या रुपात सुरू केल्याबद्दल रेल्वे प्रशासनाचे अभिनंदन केले व समाधान व्यक्त केले. तर पुणे विभागीय रेल्वे व्यवस्थापक मिलिंद देऊस्कर यांनी शताब्दी एक्सप्रेसमधील सोई-सुविधांची माहिती दिली. पुणे स्टेशन येथे आयोजित शताब्दी एक्सप्रेसच्या शुभारंभाच्या कार्याक्रमास रेल्वेचे विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.