गुन्हेगारांवर कायद्याचा वचक राहण्यासाठी लोणी काळभोर व लोणीकंद परिसरात 'पुणे पॅटर्न' राबविणार: अमिताभ गुप्ता

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2021 04:23 PM2021-03-24T16:23:47+5:302021-03-24T16:24:23+5:30

पुणे शहरातील संघटित गुन्हेगारीचे जाळे उखडून टाकण्यासाठी पोलीस दल प्रयत्नशील आहे.

'Pune pattern' to be implemented in Loni Kalbhor and Loni kand areas to keep law abiding on criminals: Amitabh Gupta | गुन्हेगारांवर कायद्याचा वचक राहण्यासाठी लोणी काळभोर व लोणीकंद परिसरात 'पुणे पॅटर्न' राबविणार: अमिताभ गुप्ता

गुन्हेगारांवर कायद्याचा वचक राहण्यासाठी लोणी काळभोर व लोणीकंद परिसरात 'पुणे पॅटर्न' राबविणार: अमिताभ गुप्ता

googlenewsNext

लोणी काळभोर : संघटित गुन्हेगारीचे जाळे उखडून टाकण्यासाठी राज्य सरकारने तयार केलेला महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार ( मोक्का ) शहरात पुणे पोलिसांनी अनेक गुन्हेगारी टोळ्यांवर यापूर्वीच कारवाई केली आहे. बहुतांश टोळ्यांवर प्रभावीपणे मोक्का लावल्यामुळे संघटित गुन्हेगारीचे कंबरडे मोडले आहे. याचप्रमाणे अगामी काळात लोणी काळभोर व लोणीकंद पोलीस ठाण्याचे हद्दीतील गुन्हेगारांवर कायद्याचा धाक राहावा याकरिता पुणे पॅटर्न राबवून मोक्का अंतर्गत शिक्षा होण्यासाठी पाठपुरावा करणार, असे प्रतिपादन पोलीस आयुक्त पुणे शहर अमिताभ गुप्ता यांनी केले. 


लोणी काळभोर व लोणीकंद ही ग्रामीण भागातील पोलीस ठाणी शहर पोलीस आयुक्तालयास जोडण्यात आली आहेत. या पार्श्वभूमीवर लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे हद्दीची पाहणी करण्यासाठी गुप्ता आले होते. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. 

या पत्रकार परिषदेला सहआयुक्त रविंद्र शिसवे, पुर्व प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, परिमंडल ५ पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, वाहतूक शाखा पोलीस उपायुक्त राहूल श्रीरामे, सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणराव विधाते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बंडगर व दगडू हाके उपस्थित होते.

गुप्ता म्हणाले,  बेकायदेशीर सावकारीच्या समूळ उच्चाटनासाठी महाराष्ट्र शासनाने दमदार पावले टाकली असून बेकायदेशीर सावकारांना पायबंध घालण्यासाठी शासनाने महाराष्ट्र सावकारी (नियमन) अध्यादेश हा कायदा संपूर्ण राज्यभर लागू केला आहे. या कायद्याच्या तरतुदीनुसार विनापरवाना सावकारी करणाऱ्यास कडक शिक्षेची तरतूद केलेली असून आगामी काळामध्ये ग्रामीण भागात बेकायदा खाजगी सावकारकी करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल. गरज पडली तर तडीपार व मोक्का यांसारख्या गुन्ह्यांची नोंद केली जाईल. यांचबरोबर दारू, मटका, जुगार तसेच वाळूमाफियांसमवेत इतर अवैध धंदे करणाऱ्यांवरही कठोर कारवाई करण्यात येईल. 

पुणे- सोलापूर व पुणे नगर या दोन्ही महामार्गावरील वाढती वाहतूक त्याचप्रमाणे वाढत्या लोकसंख्येसाठी कायदा, सुव्यवस्था सांभाळणे यांस आम्ही प्राधान्य देणार आहोत. 


गुन्हेगारी कमी करायची असेल तर लोकसहभाग अत्यंत आवश्यक आहे. पण लोक तेव्हाच तक्रार करायला पुढे येतात जेव्हा त्यांना खात्री असते की पोलीस कारवाई करतील. यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार करून त्या अनुषंगाने गुन्हे व इतर प्रशासकीय माहिती घेऊन लवकरात लवकर या दोन्ही पोलीस ठाण्याचे हद्दीत कशाप्रकारे प्रभावीपणे काम करता येईल यासाठी अधिक मनुष्यबळ वाढवण्यात येणार आहे. त्यामुळे गस्त वाढवून गरजेच्या वेळी तात्काळ मदत मिळेल याकरिता आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत, अशी ग्वाही शहर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली.

Web Title: 'Pune pattern' to be implemented in Loni Kalbhor and Loni kand areas to keep law abiding on criminals: Amitabh Gupta

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.