पुणे पुस्तक महोत्सवातील पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम ऐनवेळी रद्द; नेमकं कारण काय? साधना प्रकाशनाचा तीव्र निषेध

By श्रीकिशन काळे | Published: December 21, 2023 05:29 PM2023-12-21T17:29:55+5:302023-12-21T17:30:19+5:30

सर्व वक्त्यांची वेळ व हॉलची उपलब्धता हे सर्व बुधवारी रात्री ठरवले होते, प्रकाशनाचे मत

Pune Book Festival Book Release Program Cancelled What is the real reason Violent condemnation of Sadhana Prakashan | पुणे पुस्तक महोत्सवातील पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम ऐनवेळी रद्द; नेमकं कारण काय? साधना प्रकाशनाचा तीव्र निषेध

पुणे पुस्तक महोत्सवातील पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम ऐनवेळी रद्द; नेमकं कारण काय? साधना प्रकाशनाचा तीव्र निषेध

पुणे: सध्या फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर पुस्तक महोत्सव सुरू आहे. या महोत्सवात साधना प्रकाशनाच्या एका पुस्तकाचा कार्यक्रम नियोजित होता. परंतु महोत्सवात अनेक कार्यक्रम होत असल्याने तो नॅशनल बूक ट्रस्टने ऐनवेळी रद्द केला. पुस्तक महोत्सवात पुस्तकाचा कार्यक्रम का रद्द केला यामागील गुढ काही उलगडलेले नाही. त्यामुळे या निर्णयाचा साधना प्रकाशनाने तीव्र निषेध केला आहे. 

पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर १६ डिसेंबरपासून पुणे पुस्तक महोत्सव होत आहे. त्यात साधना प्रकाशनाच्या, राजन हर्षे लिखित "पक्षी उन्हाचा : सात विद्यापीठांच्या आवारात" या पुस्तकावर गुरुवार २१ डिसेंबर रोजी होणाऱ्या चर्चेचा कार्यक्रम रद्द करावा लागत आहे, असे  नॅशनल बुक ट्रस्टकडून ऐनवेळी सांगण्यात आले. त्या, निर्णयाचा निषेध करून तो कार्यक्रम आता शुक्रवार 22 डिसेंबर 2023 रोजी, सकाळी 10.30 वाजता, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे सभागृह, टिळक रोड, पुणे या ठिकाणी करण्याचे साधना प्रकाशनाने ठरवले आहे. 

पुणे पुस्तक महोत्सवात पुस्तक व लेखक यांच्याशी संबंधित कार्यक्रम आयोजित करायचा असल्यास प्रस्ताव द्यावा, असे पत्र एनबीटीने 5 डिसेंबर रोजी अन्य अनेक प्रकाशकांसह साधना प्रकाशनालाही पाठवले होते.  त्यानुसार 8 डिसेंबर रोजी साधना प्रकाशनाने, राजन हर्षे लिखित  "पक्षी उन्हाचा" या नव्या पुस्तकावरील चर्चेचा प्रस्ताव पाठवला होता. त्या प्रस्तावाला उत्तर देताना , या संदर्भात आमच्या प्रतिनिधी आकांक्षा बिष्णोई यांच्या संपर्कात राहावे , असे एन. बी. टी.ने कळवले होते . त्यानंतर 12 डिसेंबर रोजी, फर्ग्युसन महाविद्यालयाच्या गेस्ट हाऊस वर साधनाचे संपादक विनोद शिरसाठ यांनी आकांक्षा व त्यांच्या सहकारी निहारिका यांची भेट घेतली होती. तेव्हा सुहास पाटील,  गोपाळ नेवे व साईनाथ जाधव हे साधनाचे तीन सहकारीही उपस्थित होते. त्या भेटीतच आकांक्षा व निहारिका यांनी महोत्सवाचे वेळापत्रक पाहून, 21 डिसेंबर दुपारी 2 ते 3 ही एक तासाची  वेळ निश्चित केली होती. लेखक डॉ राजन हर्षे हे फर्ग्युसनचे माजी विद्यार्थी असल्याने आणि कार्यक्रमाला येणारा वाचक समूह लक्षात घेऊन फर्ग्युसनचे अँफी थिएटर हे स्थळही कार्यक्रमासाठी तेव्हाच त्यांनी निश्चित केले होते,  कार्यक्रमाचे पाहुणे व स्वरुप कळविण्यास सांगितले होते. त्याप्रमाणे, चर्चेचे स्वरूप व वक्त्यांची नावे त्यांना दुसऱ्या दिवशी कळवण्यात आली होती. अलाहाबाद विद्यापीठाचे माजी कुलगुरू असलेले लेखक डॉ.राजन हर्षे, नांदेड येथील स्वामी रामानंद मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ पंडित विद्यासागर, मुंबई विद्यापीठाचे माजी रजिस्ट्रार डॉ सतीश बागल हे चौघे  या पुस्तकावर चर्चा करणारे होते. डॉ संकल्प गुर्जर हे या चर्चेचे संचलन करणार होते. 

या पुस्तकाचा विषय, कार्यक्रमाला येणारे निमंत्रित  वक्ते आणि साधना प्रकाशनाचा पाऊण शतकाचा वारसा हे सर्व लक्षात घेता,  कार्यक्रम रद्द झाल्याचे असे ऐनवेळी सांगणे योग्य नाही, असे साधनाच्या संपादकांनी आकांक्षा यांना सांगितले. तेव्हा, वरिष्ठांशी बोलून थोड्या वेळाने फोन करून सांगते, असे त्या म्हणाल्या. मात्र अर्धा तासाने फोन करून त्यांनी, कार्यक्रम रद्दच करावा लागत आहे, असे कळवले. त्यामुळे साधना प्रकाशननाला इतर ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करावा लागत आहे. 

एनबीटीने घेतलेल्या या निर्णयाचा आम्ही निषेध करीत आहोत. मात्र सर्व वक्त्यांची वेळ व हॉलची उपलब्धता हे सर्व बुधवारी रात्री ठरवले असून, तेच सर्व वक्ते घेऊन तो कार्यक्रम शुक्रवारी 22 डिसेंबर 2023 रोजी, सकाळी 10.30 वाजता , महाराष्ट्र साहित्य परिषदेचे सभागृह, टिळक रोड, पुणे येथे आयोजित करीत आहोत. - विनोद शिरसाठ संपादक, साधना ( साप्ताहिक व प्रकाशन )

Web Title: Pune Book Festival Book Release Program Cancelled What is the real reason Violent condemnation of Sadhana Prakashan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.