मिरवणुकीत ढोल-ताशांचा गजर... पण, बंधनात

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2018 01:12 AM2018-09-22T01:12:25+5:302018-09-22T01:12:56+5:30

उच्च न्यायालयाने डीजेवर बंदी घातल्याने यंदाच्या विसर्जन मिरवणुकीत ढोल-ताशांचा गजर वाढणार आहे.

Procession of drum-cards ... But in bondage | मिरवणुकीत ढोल-ताशांचा गजर... पण, बंधनात

मिरवणुकीत ढोल-ताशांचा गजर... पण, बंधनात

Next

पुणे : उच्च न्यायालयाने डीजेवर बंदी घातल्याने यंदाच्या विसर्जन मिरवणुकीत ढोल-ताशांचा गजर वाढणार आहे. दरवर्षी डीजेला पसंती देणारी मंडळे यंदा ढोल-ताशांकडे वळण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा पथकांचा ‘भाव’ वाढणार आहे. प्रामुख्याने लक्ष्मी रस्त्यावर वाजणारे ढोल-ताशा आता अन्य भागातही दिवस-रात्र गजर करतील.
शहराच्या वैभवशाली विसर्जन मिरवणुकीमध्ये दरवर्षी ढोल-ताशांबरोबरच डीजेचा आवाजही मोठा असतो. लक्ष्मी रस्त्यासह टिळक रस्ता, कुमठेकर रस्ता, केळकर रस्त्यावर ध्वनिक्षेपकाच्या भिंती पाहायला मिळतात. त्यांचा कर्णकर्कश आवाज रात्री १२ ते सकाळी ६ या ही वेळेत बंद असतो. यंदा उच्च न्यायालयाने डीजेला संपूर्ण मिरवणुकीतच बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यंदाच्या मिरवणुकीत ध्वनिक्षेपकांच्या भिंती दिसणार नाहीत. पण या निर्णयामुळे ढोल-ताशा पथकांची मागणी वाढण्याची शक्यता आहे. यावर्षी शहर व परिसरामध्ये सुमारे पावणे दोनशे पथके सक्रिय आहे. दरवर्षी लक्ष्मी रस्त्यावर सुमारे २५ पथके मिरवणुकीत सहभागी होतात. तर अन्य प्रमुख मार्गांसह उपनगरांमध्ये या मंडळांना मागणी असते. यावर्षी डीजेला बंदी घातल्याने आता शहरातील मुख्य मिरवणूक मार्गांवर ढोल-ताशा पथके वाढण्याची शक्यता आहे.
ढोल-ताशा महासंघाचे
अध्यक्ष पराग ठाकूर म्हणाले,
यंदा मानाच्या गणपतींच्या मिरवणुकीत प्रत्येकी तीन तर इतर मंडळांच्या मिरवणुकीत दोन ढोल-ताशा पथकांना मान्यता देण्यात
आली आहे. प्रत्येक पथकामध्ये जास्तीत जास्त ४० ढोल व १०
ताशे अशी मर्यादा घालण्यात
आली आहे.
काही ठराविक पथकांमध्ये त्यापेक्षा जास्त वाद्ये आहेत. या पथकांकडून ही मर्यादा पाळली जाईल. पण आता डीजेवर बंदी आल्याने पथकांची मागणी वाढणार आहे. मोठ्या पथकांचे विभाजन होऊन अन्य मंडळांकडे ही पथके जाऊ शकतात. पथकांना पर्याय वाढणार असल्याने अधिक पथके मिरवणुकांमध्ये दिसतील.
>एका मार्गावर एकदाच वादन...
पोलिसांनी मिरवणुकीसाठी दिलेल्या नियमावलीनुसार ढोल-ताशा पथकांना एका मार्गावर एकदाच वादन करता येणार आहे. प्रामुख्याने लक्ष्मी रस्त्यावर ढोल-ताशा पथकांचे वादन मोठ्या प्रमाणावर होत असते. काही पथके या मार्गावर दोन-दोन मंडळांसमोरही वादन करतात. आता अशा मंडळांवर बंधने येणार आहेत.
पोलिसांनी एकदा वादन केलेल्या पथकांना पुन्हा या मार्गावर वाजविण्यास मनाई केली आहे. त्यामुळे काही मोठ्या पथकांनी तीन-चार गट केले आहेत. यामधील प्रत्येक गटालाही एकदाच वाजविण्यास परवानगी असेल.
तसेच सर्व पथकातील सदस्यांना ओळखपत्रे दिली जाणार आहेत. त्यामुळे एका गटातील सदस्य पुन्हा दुसऱ्या गटात जाऊन वादन करू शकणार नाहीत. सर्व पथकांना संधी मिळावी,
यासाठी पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे, अशी माहिती ढोल-ताशा महासंघाचे अध्यक्ष पराग ठाकुर यांनी दिली.
>ढोल-ताशा पथकांसाठी पोलिसांची नियमावली
१. एका ढोल ताशा पथकामध्ये ४० ढोल, १० ताशे व ६ झांज एवढ्याच वाद्यांचा समावेश असावा.
२. पथकामध्ये वादकांसह इतर व्यक्ती अशा एकूण १०० सदस्यांचा
समावेश असावा.
३. टोल वापरू नये.
४. मानाच्या मंडळांसमोर जास्तीत जास्त तीन पथके व इतर मंडळांसमोर २ ढोल पथके असावीत.
५. मिरवणुकीदरम्यान ढोल-ताशा पथके बदलता येणार नाहीत
६. एका मंडळासमोर वादन केलेल्या पथकाला पुन्हा नव्याने दुसºया मंडळासोबत सहभागी होता येणार नाही.
७. वादन करण्याची पोलिसांकडून स्वतंत्र परवानगी घेणे बंधनकारक राहील.
८. सर्व सदस्यांनी पोलिसांनी दिलेले ओळखपत्र बाळगणे आवश्यक असेल.
९. लक्ष्मी रस्त्यावर बेलबाग चौक, उंबºया गणपती चौक व अलका टॉकीज चौकामध्ये जास्तीत जास्त २० मिनिटे वादन आवर्तन करता येईल. इतर रस्ते किंवा चौकांमध्ये थांबून वादन करता येणार नाही.
१०. टिळक रस्त्यावर पुरम चौक व स.प. महाविद्यालय चौक, कुमठेकर रस्त्यावर साहित्य परिषद चौक व अलका टॉकीज चौक तर केळकर रस्त्यावर टकले हवेली चौक व अलका टॉकिज चौक या ठिकाणी
थांबून २० मिनिटे वादन करता येईल. इतर रस्त्यांवरही २० मिनिटांची मर्यादा असेल.
११. प्रत्येक पथकाने विसर्जन मिरवणुकीच्यावेळी लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता, कुमठेकर रस्ता किंवा केळकर रस्त्यावर जास्तीत जास्त १२० मिनिटे रहाणे अपेक्षित आहे.
>आव्वाज तर होणारच...
ध्वनीप्रदूषणाच्या कारणास्तव डीजेवर बंदी घातली असली तरी मिरवणुकीमध्ये ढोल-ताशांच्या संख्येवरही मर्यादा यायला हवी. दहा ते पंधरा ढोल-ताशे एकत्र वाजले तरी त्याच्या आवाजही ८० डेसिबलच्या पुढे जातो. त्यामुळे ४० ते ५० ढोल-ताशे वाजल्यास हा आवाज ९० डेसिबलच्या पुढे जाणारच आहे. तसेच आता लक्ष्मी रस्त्यावर अन्य रस्त्यांवरही रात्रभर पथकांचे वादन चालू शकते.
- डॉ. महेश शिंदीकर, प्राध्यापक, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय

Web Title: Procession of drum-cards ... But in bondage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.