ज्येष्ठांच्या एकटेपणावरही पोलीस मदत; कर्मचा-यांकडून किरकोळ समस्यांचीही सोडवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 05:53 AM2018-02-16T05:53:14+5:302018-02-16T05:53:42+5:30

अमेरिकेत राहणा-या मुलीने पुण्यातील आपल्या आईची काळजी घेण्यासाठी केअरटेकर नेमली होती. तिला महिना १० हजार रुपये दिले जायचे.पण, ती काम करण्याऐवजी आईलाच त्रास द्यायची. शेवटी आईने आपल्या मुलीला ही बाब कळविली. 

Police help on the unity of the senior citizens; Removal of retail issues from employees | ज्येष्ठांच्या एकटेपणावरही पोलीस मदत; कर्मचा-यांकडून किरकोळ समस्यांचीही सोडवणूक

ज्येष्ठांच्या एकटेपणावरही पोलीस मदत; कर्मचा-यांकडून किरकोळ समस्यांचीही सोडवणूक

Next

पुणे : अमेरिकेत राहणा-या मुलीने पुण्यातील आपल्या आईची काळजी घेण्यासाठी केअरटेकर नेमली होती. तिला महिना १० हजार रुपये दिले जायचे.पण, ती काम करण्याऐवजी आईलाच त्रास द्यायची. शेवटी आईने आपल्या मुलीला ही बाब कळविली. पण, केअरटेकरला एक महिन्याचा जादा पगार देण्यास तयार असतानाही ती जाण्यास तयार नव्हती़ शेवटी तिने आपल्या नागपूर येथील चुलत्यांना कळविले़ त्यांनी ज्येष्ठ नागरिक कक्षाशी संपर्क करून ही समस्या सांगितली़ कक्षातील कर्मचाºयांनी तातडीने या केअरटेकरला फोन करुन तू बंगल्यातून जाणार आहे की नाही, का पोलीस पाठवू, असे सांगितल्यावर तिने मी नवीन काम कशी शोधू अशी सबब सांगितली़ तेव्हा पोलिसांनी तिला तुला ते एक महिन्याचा पगार देत आहेत ना त्या कालावधीत नवीन काम शोध, असा पर्याय सांगितल्यावर शेवटी ती तेथून निघून गेली़

एकटे रहात असल्यांची संख्या पुणे शहरात मोठ्या वेगाने वाढत आहे़ मुलगा, मुलगी परदेशात गेलेले़ तेथे जाणे या ज्येष्ठांना शक्य नसल्याने ते इथे एकाकी जीवन जगत असल्याने वैफल्यग्रस्तता दिसून येते. अनेकदा आयुष्यातील उमेदीच्या काळात नोकरीत इतके बिझी राहिल्याने जवळचे म्हणावे असे मित्रमैत्रिणी नसतात़ मुले, सुना हे आपल्या कामात व्यस्त असल्याने ते ज्येष्ठांना वेळ देऊ शकत नाही़ त्यातून आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांच्यात एकाकीपणा वाढू लागतो़ त्यातून मग, होणारी चिडचिड जवळच्या लोकांवर काढली जात असल्याचे ज्येष्ठ नागरिक कक्षातील पोलीस अधिकारी आणि कर्मचाºयांना अनुभवास येत आहे़
पुणे पोलीस दलाने स्थापन केलेल्या ज्येष्ठ नागरिक कक्षात ज्येष्ठ नागरिकांचे सातत्याने फोन येत असतात़ त्यांना या कक्षातून तातडीने मदतही पुरविली जाते़ पोलीस या ज्येष्ठांना जी सेवा देतात, तो एक मदतीचा हात असतो़ पण, आता काहींना तो आपला हक्कच आहे, असे वाटायला लागले आहे़ त्यातूनच मग पोलिसांकडून अवास्तव अपेक्षाही ते करु लागले आहेत़ आपली साधी साधी कामे करुन घेण्यासाठीही आता ज्येष्ठ नागरिक या कक्षाला वेठीस धरत असल्याचे जाणवू लागले आहे़ अनेकदा घरातील लोक अथवा शेजारील एखादी व्यक्तीही जे काम सहज करु शकतील, त्या कामासाठी काही ज्येष्ठ नागरिक या कक्षाचा वापर करु लागले आहेत़
काही दिवसांपूर्वी या कक्षात असाच एका ज्येष्ठ नागरिकाचा फोन आला होता़ त्याला १५ दिवसांनी दुबईला जायचे होते आणि त्यांचा पासपोर्ट घरात सापडत नव्हता़ त्यांनी कक्षात फोन करुन माझा पासपोर्ट सापडत नाही़ मला दोन दिवसात पासपोर्ट काढून द्या अशी मागणी केली़ तेथील कर्मचाºयांनी त्यांना समजाविण्याचा प्रयत्न केला, तर त्यांचे उत्तर होते़ तुम्हाला पासपोर्ट बनवून देता येत नाही तर का कक्ष कशाला काढला़ शेवटी त्यांना तुमच्या घरातच असेल, घरातील इतर कोणाला तरी शोधायला सांगा. नाही सापडला तर पाहू असे सांगण्यात आले़ सायंकाळी त्यांची मुलगी कामावरुन परत आल्यावर तिला घरातच पासपोर्ट सापडला़
दिघी येथील एक ज्येष्ठ नागरिक या कक्षाला कायम फोन करीत असतात़ कर्मचारी मार्शलला पाठवितात़ तेव्हा ते त्यांना घरातील दुध संपले आहे़ ते आणून द्या, अशी कामे सांगतात़ एक दोनदा पोलिसांनी तेही केले़ पण पोलीस आपले काम करतात, हे दिसल्यावर घरातील लोक कामाला गेले की, ते फोन करुन पोलिसांना बोलावून घेतात़ घरच्याविषयी तक्रार करतात़ माझा मोबाईल रिचार्ज करुन देत नाही, अशी तक्रार करतात.

वैफल्यग्रस्तता : अनेकदा विनाकारण तक्रारीही
दरवेळी ज्येष्ठ नागरिकांचेच बरोबर असते असे नाही, याचा अनुभव कक्षातील अधिकारी आणि कर्मचाºयांना येत असतो़ एक आई आपल्या मुलाविषयी सातत्याने कक्षाकडे तक्रार करत होती़ पोलिसांनी त्याची खोलात जाऊन चौकशी केली तेव्हा चक्क आईच मुलाविरुद्ध खोटी तक्रार करीत असल्याचे दिसून आले़
शासकीस सेवेतील वरिष्ठ अधिकाºयाने या कक्षाकडे मुलगा त्रास देत असल्याची तक्रार केली होती़ तो पैशासाठी भांडत असल्याचे त्यांचे म्हणणे होते़ जेव्हा मुलाकडे विचारणा केली तर असा काही प्रकार नव्हता़ त्याच्या मोठ्या मुलीचे लग्न होते़ वडिलांनी या लग्नासाठी मदत करावी, अशी त्याची अपेक्षा होती़ पण, वडील त्यातून वेगळाच अर्थ काढत होते़
कौटुंबिक कारणाबरोबरच इतर कारणावरूनही ज्येष्ठ नागरिक या कक्षाकडे तक्रार करत असतात़ एक ८२ वर्षांची महिला शेजारचा आपल्या जागेत सामान ठेवत असल्याची तक्रार करीत होती. पोलिसांनी तेथे जाऊन पाहिले तर त्यांच्या शेजारील गृहस्थ हे ८८ वर्षांचे होते़ दोघांनाही पोलिसांनी समजावून सांगून त्यांचा प्रश्न मार्गी लावला.

ज्येष्ठ नागरिकांचे पैैसे परत मिळवून देण्यासाठी पैसे
बांधकाम व्यावसायिक डी़ एस़ कुलकर्णी यांच्याकडे असंख्य ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या ठेवी ठेवल्या आहेत़ पण गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्याकडून मुद्दल तर सोडाच, व्याजही दिले जात नाही़ त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल झाले असून न्यायालयात हे प्रकरण सध्या सुरू आहे़ डी़ एस़ कुलकर्णींकडे ठेवी ठेवलेल्या असंख्य ज्येष्ठ नागरिकांचे फोन या कक्षाला येत असतात़ आमच्या उत्तरार्धातील तरतूद म्हणून आम्ही त्यांच्याकडे गुंतवणूक केली होती़ आता दरमहा व्याजही मिळत नसल्याने त्यांची कुचंबणा होऊ लागली आहे़ आमचे पैसे मिळवून द्या, अशी विनंती करणारे फोन येत असतात.

वडील व मुलगा दोघेही डॉक्टऱ वडिलांनी कक्षात मुलगा त्रास देतो, अशी तक्रार केली़ पोलिसांनी दोघांचे म्हणणे ऐकून घेतले, मुलाला दवाखाना काढण्यासाठी कर्ज घ्यायचे होते़ त्यासाठी घर गहाण टाकावे असे त्याचे मत होते़ त्यावरून दोघात वाद होऊन वडिलांनी मुलाला घर खाली करायला लावले़ वाद मिटल्यानंतर महिनाभराने अधिकाºयांनी पुन्हा त्यांच्या घरी भेट देऊन वडिलांची विचारपूस केली़ तेव्हा हे सर्व जे काही आहे ते शेवटी त्याचेच आहे़, असे त्यांनी पाणावलेल्या डोळ्यांनी सांगितले़

पुणे शहरात जवळपास किमान साडेपाचशे ज्येष्ठ नागरिक हे एकटे राहत असल्याची या कक्षाकडे नोंद आहे़ ज्येष्ठ नागरिक कक्षाने आतापर्यंत पुणे शहरातील १६ हजार नागरिकांना ओळखपत्र दिले असून त्यावर त्यांची सर्व माहिती व फोटो असतो़ त्याद्वारे हे ज्येष्ठ नागरिक वेळप्रसंगी कोणाकडूनही मदत घेऊ शकतात़

Web Title: Police help on the unity of the senior citizens; Removal of retail issues from employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे