प्लॅस्टिकबंदीला मुबलक पर्याय उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 07:17 AM2018-06-26T07:17:16+5:302018-06-26T07:17:20+5:30

शासनाने प्लॅस्टिकबंदी जाहीर केल्यानंतर राज्यभर खळबळ उडाली. याची झळ प्रामुख्याने व्यापारीवर्गाला सोसावी लागली. ग्राहक, नागरिक अशा भूमिकेत असणाऱ्यांची डोकेदुखीही वाढली.

Plenty of plastic bills are available | प्लॅस्टिकबंदीला मुबलक पर्याय उपलब्ध

प्लॅस्टिकबंदीला मुबलक पर्याय उपलब्ध

googlenewsNext

युगंधर ताजणे
पुणे : शासनाने प्लॅस्टिकबंदी जाहीर केल्यानंतर राज्यभर खळबळ उडाली. याची झळ प्रामुख्याने व्यापारीवर्गाला सोसावी लागली. ग्राहक, नागरिक अशा भूमिकेत असणाऱ्यांची डोकेदुखीही वाढली. हे जरी खरे असले, तरी यापूर्वी पाचवेळा प्लॅस्टिकबंदीचा प्रयत्न करण्यात आला. यंदादेखील युद्धपातळीवर ही बंदी सुरू ठेवण्याकरिता प्रयत्न सुरू आहेत. दुसरीकडे ग्राहक आणि नागरिक यांना प्लॅस्टिकशिवाय दैनंदिन व्यवहार पार पाडता येतात, याचा विसर पडल्याचे दिसून येत आहे. अंगवळणी पडलेल्या प्लॅस्टिकच्या सवयीमुळे त्याच्या पर्यायाचा अवलंब करताना नाकं मुरडली जात आहेत.
राज्यात दररोज २३ हजार ४४९ मेट्रिक टन घनकचरा निर्माण होतो. सुरक्षित पर्यावरणाकरिता शासनाने प्लॅस्टिकबंदी केली असली, तरीदेखील त्याला समूळ नष्ट करण्यासाठी जी आवश्यक उपाय योजना करणे अपेक्षित आहे, ती होताना दिसत नाही. यामुळे अनेक ठिकाणी गंभीर प्रश्न निर्माण होत आहेत. प्लॅस्टिक पिशव्यांची सवय होऊन बसलेल्या नागरिकांना प्लॅस्टिकपासून परावृत्त करण्यासाठी थोडावेळ द्यावा लागणार असल्याचे वातावरण सभोवताली आहे. याविषयी काम करणारे सेवानिवृत्त अधिकारी पर्यावरण मित्र मिलिंद पगारे हे व्याख्यानांच्या माध्यमातून शाळा, महाविद्यालये, विविध पर्यावरण संस्था यामध्ये जनजागृतीचे काम करतात. त्यांनी प्लॅस्टिकच्या वाढत्या अतिक्रमणांबाबत चिंता व्यक्त केली. ते म्हणाले की, प्लॅस्टिकचा परिणाम आपल्या आरोग्यावर होत असून, यामुळे मुलगा, मुलगी लवकर वयात येणे, प्रजनन क्षमतेवर परिणाम होणे आणि कॅ न्सरसारख्या दुर्धर आजाराला निमंत्रण प्लॅस्टिकमुळे मिळते. अपेक्षित गुणधर्म मिळविण्यासाठी प्लॅस्टिकमध्ये विविध प्रकारची रसायने मिसळली जातात. यामुळे ते नरम, कडक, उष्णतारोधक होते; मात्र त्या रसायनांचा वापर अप्रत्यक्षरीत्या शरीरावर होतो. हे लवकर लक्षात येत नाही. विघटनशील, अविघटनशील आणि टाकाऊ कचरा या तीन प्रकारे कचरा वर्गीकरण आवश्यक असून, त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी स्वयंस्फूर्तीने व्हायला हवी.
‘टाकाऊपासून टिकाऊ’ या संकल्पनेकडे अद्याप गांभीर्याने पाहावे अशी परिस्थिती समाजात निर्माण झाली नसून ‘युज अँड थ्रो’ला ग्राहक, नागरिकांकडून पसंती मिळत आहे. फार नव्हे तर सुरुवातीचे काही दिवस त्रास झाल्यानंतर, हळूहळू प्लॅस्टिकला एकामागोमाग पर्याय येतील. तोपर्यंत कागद आणि कापडाच्या पिशव्यांचा वापर नागरिकांनी केल्यास फार काही नुकसान होणार आहे असे नाही. सर्वच वस्तूंना पर्याय तातडीने उपलब्ध नसला, तरी सध्या जितक्या वस्तूंकरिता तो आहे त्याचा वापर व्यापक पद्धतीने केला गेल्यास पर्यावरणाची हानी कमी होण्यास मदत होणार असल्याचे पर्यावरण तज्ज्ञांचे ग्राहक, नागरिकांना सांगणे आहे.

लाइटर - काडीपेटी
टूथब्रश - बाजारात बांबूचे ब्रश उपलब्ध असून, मागणीनुसार त्याची विक्री केली जाते.
हार, गुच्छ - प्लॅस्टिकशिवाय हार-गुच्छ किंवा साधी फुले वापरणे.
सॅनिटरी पॅड - कप किंवा पुन्हा वापरण्यासारखे कापडी पॅड.
पाण्याची बाटली - स्टिल अथवा कॉपर बॉटल, मातीची भांडी.
प्लॅस्टिक पिशवी - कापडी किंवा ज्युटची पिशवी, कागदाची पिशवी.
प्लॅस्टिक सजावट - पर्यावरणपूरक फुले, पाने यांच्या साह्याने सजावट
दाढी करण्याचे साधन - धातूचे ब्लेड आणि दाढी करण्याचे साधन.
बड (प्लॅस्टिकची काडी) - लाकडाच्या काडीला कापूस लावून वापरणे.
भेटवस्तूला चकचकीत आवरण - साध्या कागदाचे कापडाचे किंवा इतर
पर्यावरणपूरक आवरण.

डिस्पोजेबल कटलरी
एकदा वापर करून झालेल्या वस्तू फेकून देणे या प्रकारात डिस्पोजेबल कटलरींचा समावेश होतो. मात्र, या वस्तू विघटनशील नसल्याने त्यांच्यापासून पर्यावरणाला धोका निर्माण होत आहे. उदा. प्लॅस्टिकच्या वस्तू.

कंपोस्टेबल कटलरी
डिस्पोजेबल वस्तूंकरिताचा पर्याय म्हणून या प्रकाराकडे पाहिले जाते. यात वनस्पतींपासून विविध प्रकारच्या वस्तू बनविल्या जातात. ज्याचा उपयोग दैनंदिन व्यवहारात करता येणे सहज शक्य आहे. उदा. पेन्सिल, ताट, वाटी, पेला, चमचे, पळसाच्या पानांपासून पत्रावळी तयार करणे, सुपारीच्या झाडांच्या पानांपासून ताट, वाटी, पेला या वस्तू तयार केल्या जातात. ज्या कंपोस्टेबल (विघटनशील) आहेत.

एडिबल कटलरी
या प्रकारांमध्ये धान्यापासून ताट, वाटी, चमचे बनविले जातात. यामुळे काम झाल्यानंतर या वस्तू खाता येतात; परंतु या वस्तू उपयोगात आणण्याचे प्रमाण तुलनेने कमी आहे. वेगवेगळ्या आकर्षक पद्धतीने या वस्तू बनविल्या गेल्यास त्याचा दैनंदिन व्यवहारात उपयोग करता येणे शक्य आहे.

कारागिरांच्या कागदी, कापडी पिशव्यांची ‘चलती’
पाच ते सहा वर्षांपासून कारागृहात कागदी पिशव्या बनविणे सुरू झाले. आता सध्या मागणीनुसार पिशव्या बनविण्याचे काम केले जाते. कपडे शिवण्याचे काम करणारे बंदी उरलेल्या कपड्यांतून पिशव्या तयार करतात. प्लॅस्टिक पिशव्यांना बंदी आली, तेव्हापासून कारागिरांनी कापड, कागदापासून तयार केलेल्या पिशव्यांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. येरवडा मध्यवर्ती कारागृहाच्या वस्तूच्या विक्री केंद्रात नागरिकांना त्या घेता येतील. साधारण पाच ते दहा रुपयांपर्यंत कागदी, तर २० ते ५० रुपयांपर्यंत कापडी पिशव्या केंद्रात उपलब्ध असून, बंदीमुळे कागद, कापडांपासून आकर्षक वस्तूनिर्मितीकरिता बंदी प्रयत्नशील आहेत.
- यू. टी. पवार,
अधीक्षक, येरवडा मध्यवर्ती कारागृह

Web Title: Plenty of plastic bills are available

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.