गावठी पिस्तूल, जिवंत काडतुसांसह दोघे जेरबंद; पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची वाघोलीत कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 11:39 AM2017-12-21T11:39:05+5:302017-12-21T11:42:58+5:30

पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेकडून वाघोली, बाजारमैदान चौक (ता. हवेली) येथून रेकॉर्डवरील दोन गुन्हेगार राजेंद्र माणिक राठोड व धोंडिभाऊ महादू जाधव यांना ताब्यात घेवून त्यांच्याकडून एकूण ४ गावठी पिस्तूल व १० जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

pistols, alive cartridges seized, action of Pune rural crime branch | गावठी पिस्तूल, जिवंत काडतुसांसह दोघे जेरबंद; पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची वाघोलीत कारवाई

गावठी पिस्तूल, जिवंत काडतुसांसह दोघे जेरबंद; पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची वाघोलीत कारवाई

Next
ठळक मुद्देवाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी स्वतंत्र पथकाची नेमणूक दोन्ही आरोपींना पुढील कार्यवाहीसाठी देण्यात आले लोणीकंद पोलीस स्टेशनच्या ताब्यात

पुणे : पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेकडून वाघोली, बाजारमैदान चौक (ता. हवेली) येथून रेकॉर्डवरील दोन गुन्हेगार राजेंद्र माणिक राठोड (वय ३२, रा. वाघोली, मूळ रा. निमगाव मायंबा, ता. शिरूर कासार, जि. बीड)  व धोंडिभाऊ महादू जाधव (वय २५, रा.निघोज, ता. पारनेर, जि. अहमदनगर) यांना ताब्यात घेवून त्यांच्याकडून एकूण ४ गावठी पिस्तूल व १० जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.
पुणे जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक सुवेज हक यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांनी स्वतंत्र पथकाची नेमणूक करून गुन्हेगारांना जेरबंद करण्यासाठी विशेष मोहीम राबवलेली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली नेमलेले सहा. पोलीस निरीक्षक गणेश क्षीरसागर, सहा. फौजदार दत्तात्रय गिरमकर, महेश गायकवाड, निलेश कदम, पोपट गायकवाड, राजू मोमीन, दत्तात्रय जगताप, मोरेश्वर इनामदार, रवी शिनगारे, विजय जांभळे यांच्या पथकास बुधवारी (दि. २०) सायंकाळच्या सुमारास वाघोली, बाजार मैदान चौक, श्रीहरी मिसळ हॉटेलचे समोर शिरूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मारामारीच्या गुन्ह्यातील फरारी असलेला व रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार राजेंद्र उर्फ राजा राठोड व त्याचा साथीदार  धोंडिभाऊ जाधव असे दोघेजण गावठी पिस्तूलची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाल्याने गुन्हे शाखेच्या पथकाने त्या ठिकाणी साध्या वेशात सापळा लावून दोघांनाही शिताफीने ताब्यात घेवून त्यांच्याकडून बेकायदा व बिगरपरवाना मिळून आलेले एकूण ४ गावठी बनावटीचे पिस्तूल व १० जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. 
राजेंद्र राठोड याचा निघोज परिसरात वाळूचा व्यवसाय असून त्याने यापूर्वी गंगापूर (जि. औरंगाबाद) तसेच पुणे जिल्ह्यातील दौंड, शिरूर येथेही वाळू व्यवसाय केल्याने तेथील वाळू माफिया व गुन्हेगारांशी त्याचे संबंध आहेत. काही दिवसांपूर्वीच पारनेर येथील तहसीलदार यांच्यावर वाळू माफियांनी केलेल्या हल्ल्यामुळे महसूल विभागाने वाळू माफियांवर कारवाई करण्यासाठी विशेष मोहीम राबविल्यामुळे तो वाघोली येथे वास्तव्यास येवून हॉटेल व्यवसाय सुरू करणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकास मिळाली होती. तसेच राजेंद्र राठोड हा सुमारे एक वर्षापासून शिरूर पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या मारामारीच्या गुन्ह्यांमध्येही फरार होता.
दोन्ही आरोपींना पुढील कार्यवाहीसाठी लोणीकंद पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आलेले असून अधिक तपास लोणीकंद पोलीस स्टेशन हे करीत आहेत.
 

Web Title: pistols, alive cartridges seized, action of Pune rural crime branch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.