पर्यटकांनो, हुल्लडबाजीला आवरा, जिवाला सावरा...!  

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2019 02:06 PM2019-07-11T14:06:36+5:302019-07-11T14:23:29+5:30

मागील दहा बारा दिवसांत मुंबई-पुण्यासह मावळ तालुका व लोणावळा परिसरात झालेल्या जोरदार पावसाने डोंगर भागातून मोठ्या प्रमाणात धबधबे वाहू लागले आहेत.

people.. please take care in nature...! | पर्यटकांनो, हुल्लडबाजीला आवरा, जिवाला सावरा...!  

पर्यटकांनो, हुल्लडबाजीला आवरा, जिवाला सावरा...!  

Next
ठळक मुद्देलोणावळा, खंडाळा परिसरात धबधबे पाहण्यासाठी वाढली पर्यटकांची गर्दीपावसाळी पर्यटनाची तरुणाईमध्ये मोठ्या प्रमाणात क्रेझ

विशाल विकारी- 
लोणावळा : पावसाळी पर्यटनाची क्रेझ तरुणाईमध्ये मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या नवतरुण पर्यटकांमध्ये हुल्लडबाजांची संख्या वाढू लागल्याने पर्यटकांनो, हुल्लडबाजीला आवरा..जिवाला सावरा म्हणण्याची वेळ आली आहे.
जून महिन्यात ओढ दिलेल्या पावसाला नुकतीच सुरुवात झाली आहे. मागील दहा बारा दिवसांत मुंबई पुण्यासह मावळ तालुका व लोणावळा परिसरात झालेल्या जोरदार पावसाने डोंगर भागातून मोठ्या प्रमाणात धबधबे वाहू लागले आहेत. मावळ तालुका हा पावसाळी पर्यटनाकरिता प्रसिद्ध आहे. यामधील लोणावळा व खंडाळा ही शहरे सध्या पावसाळी पर्यटनाची महत्त्वाची ठिकाणे बनली आहेत. याठिकाणी असलेले भुशी धरण, लायन्स पॉइंट, गिधाड तलाव धबधबा, सहारा पुलासमोर धबधबे, खंडाळ्यातील काचळदरीत कोसळणारा धबधबा, सनसेट व ड्युक्स नोज पॉइंट, ग्रामीण भागातील कार्ला, भाजे व बेडसे लेणी, लोहगड, विसापूर, तुंग व तिकोना किल्ला, पवना धरणाचा अथांग जलाशय व असंख्य धबधबे, हिरवेगार डोंगर, धुक्याची सर्वदूर पसरलेली चादर व ऊन पावसाचा लपंडाव हे सर्व सौंदर्य पाहण्याकरिता लाखोंच्या संख्येने पर्यटक लोणावळा व खंडाळा परिसरात येत आहेत. दुदैर्वाने यामध्ये हुल्लडबाजांचे प्रमाण अधिक असल्याने स्थानिक नागरिकांसह कुटुंबासह पर्यटनाला येणाऱ्या पर्यटकांनादेखील या हुल्लडबाजीचा त्रास होऊ लागला आहे.

पावसाळी पर्यटनाकरिता येणाऱ्या पर्यटकांमध्ये नव तरुणांचा भरणा जास्त आहे. अनेक महाविद्यालयीन युवक युवती तसेच कापोर्रेट कंपन्यांमधील तरुण-तरुणी एकत्र पर्यटनाला येत असतात. काही तरी थ्रील करायचे म्हणून तरुण नको ती रिस्क घेतात. यामध्ये डोंगर दऱ्याच्या टोकावर जाऊन फोटोग्राफी करणे, काही तरी तुफानी स्टंट करणे असे प्रकार करतात. अशा अनेक घटनांमध्ये काही युवकांना प्राण गमवावा लागला आहे. याचे भान ठेवत युवकांनी डोंगर दऱ्याच्या टोकावर जाणे टाळावे.
सेल्फीच्या मोहापायी अनेकांना आपले जीव गमवावे लागत आहेत. अवघड ठिकाणी जाऊन सेल्फी काढणे व तो फोटो स्टेटसला ठेवण्याची जणू तरुणाईमध्ये स्पर्धा लागलेली असते. दुचाकी चालविताना देखील सेल्फी काढणारे काही महाभाग आहेत. यामध्ये मुली देखील मागे नाहीत. सेल्फी प्रमाणे ट्रिपल सीट दुचाकी चालविण्याची सध्या क्रेझ वाढली आहे. मात्र हे धोकादायक असून कायद्याची पायमल्ली करणारे असल्याने तो धोकादायक ठरू शकते याची दक्षता युवकांनी घ्यावी.

* आपत्कालीन मदतीसाठी क्रमांक 

लोणावळा शहर पोलीस स्टेशन
02114-273033
लोणावळा नगर परिषद
02114-273767
शिवदुर्ग मित्र (रेस्कू पथक)
9822500884 
(सुनील गायकवाड - सचिव)
सरकारी रुग्णवाहिका
108

......................

* लोणावळ्यातील मद्याच्या दुकानांमध्ये मुलांपेक्षा मुलींची संख्या जास्त
 पावसाळी पर्यटन, मद्य सेवन व हुल्लडबाजी हे जणू युवा पिढीचे समीकरण बनले आहे. पर्यटनस्थळांवर येणाऱ्या पर्यटकांमध्ये मद्यसेवन करणाऱ्यांचे प्रमाण मोठे आहे. मुलीदेखील यामध्ये मागे नाहीत, लोणावळ्यातील मद्याच्या दुकानांमध्ये मुलांपेक्षा मुलींची संख्या जास्त पहायला मिळते. 
मावळ तालुका व लोणावळा, खंडाळा हा सर्व निसर्गसंपदेचे वरदान लाभलेला परिसर आहे. येथील निसर्गसौंदर्य पाहण्याकरिता कल्पक दृष्टीची आवश्यकता आहे. मात्र या निसर्गसंपदेचा आनंद घेण्याऐवजी स्टंटबाजी करणाऱ्यांची संख्या वाढली आहे.
...............
हुल्लडबाजी नको, निसर्गाचा आनंद घ्या: बी. आर. पाटील 
पर्यटकांनीदेखील हुल्लडबाजी न करता येथील निख्खळ निर्सगसौंदर्याचा आनंद घ्यावा. येथील धरणे, धबधबे, डोंगर व दऱ्यांचा आनंद घेताना स्वत:च्या जीविताची काळजी घ्यावी. लोणावळा पोलिसांनी पर्यटकांना मार्गदर्शक ठरतील, अशा दहा प्रश्नांचे बोर्ड जागोजागी लावले आहेत. सोशल मीडियाचा वापर करत जनजागृती केली आहे. पर्यटकांनी हुल्लडबाजी न करता सुरक्षित पर्यटन केल्यास कोणतीच दुर्घटना घडणार नाही. पश्चाताप करण्यापेक्षा काळजी घेणे केव्हाही चांगले असा सल्ला लोणावळा शहराचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी दिला आहे. 

Web Title: people.. please take care in nature...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.