Nitin Karamlakar will solve the question of students scolarship in four days | विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनाचा प्रश्न चार दिवसात सोडवणार :  नितीन करमळकर 
विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनाचा प्रश्न चार दिवसात सोडवणार :  नितीन करमळकर 

ठळक मुद्देअनुदान बंद करण्याचा निर्णय घेतल्याने संशोधक विद्यार्थी अडचणीत

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी पीएच.डी, एमफिल करणाऱ्या विद्यार्थ्यांचे विद्यावेतन अचानक बंद करण्याचा निर्णय मागे न घेतल्यास उपोषण करण्याचा इशारा ९ अधिसभा सदस्यांनी दिला आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी या मागणीसाठी सोमवारी सकाळी कुलगुरू कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. त्यावेळी येत्या ४ दिवसात विद्यावेतनाचा प्रश्न सोडवू असे आश्वासन कुलगुरूंनी विद्यार्थ्यांना दिले आहे.   
संशोधक विद्यार्थ्यांचे विद्यावेतन गेल्या ३ महिन्यांपासून निधी नसल्याचे कारण देऊन कुलगुरूंनी बंद केले आहे. यापार्श्वभुमीवर अधिसभा सदस्य प्रा. शामकांत देशमुख, डॉ. संजय खरात, अभिषेक बोके, संतोष ढोरे, शशिकांत तिकोटे, दादाभाऊ शिनलकर, विश्वनाथ पडवी, अनिल विखे, डॉ. तानाजी वाघ आदी ९ सदस्यांनी कुलगुरूंना सोमवारी निवेदन दिले. कुलगुरूंनी विद्यावेतनाचा प्रश्न येत्या १५ दिवसात न सोडविल्यास सिनेट सदस्यांकडून तीव्र आंदोलन व उपोषण केले जाईल असा इशारा या निवेदनामध्ये देण्यात आला आहे.  
विद्यापीठातील पीएचडीच्या विद्यार्थ्यांना दरमहा ८ हजार तर एमफिलच्या विद्यार्थ्यांना दरमहा ५ हजार रूपये विद्यावेतन दिले जात होते. गेल्या दहा वर्षांपासून हे विद्यावेतन दिले जात आहे. मात्र ते अचानक बंद करण्यात आल्याने विद्यार्थ्यांना मोठया अडचणींचा सामना करावा लागत आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाकडून विद्यावेतनासाठी दिले जाणारे अनुदान बंद झाल्यानंतर तत्कालीन कुलगुरू वासुदेव गाडे यांनी विद्यार्थी हिताचा विचार करून विद्यावेतन पूर्ववत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र डॉ. नितीन करमळकर यांनी मात्र ते बंद करण्याचा निर्णय घेतल्याने संशोधक विद्यार्थी अडचणीत आले आहेत.
विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टुडंन्ट असोसिएशन (डाप्सा), नॅशनल स्टुडंन्ट युनियन आॅफ इंडिया (एनएसयुआय), राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस व इतर संघटनांच्या विद्यार्थ्यांनी विद्यावेतन सुरू करावे या मागणीसाठी भिक माँगो आंदोलन करून गोळा केलेले पैसे प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी यांच्याकडे दिले होते. मात्र डॉ. उमराणी यांनी ते पैसे स्वीकारले नाहीत. विद्यार्थ्यांचे विद्यावेतन सुरू केले जाईल असे आश्वासन सातत्याने विद्यार्थ्यांना दिले जात आहे. मात्र, प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी केली जात नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. 
....................
सार्वजनिक कार्यक्रमांमधील आश्वासनांचे काय झाले?
कुलगुरू डॉ. नितीन करमळकर जाहीर कार्यक्रमामध्ये आपण विद्यार्थी हिताचे कार्यक्रम घेतले जातील असे आश्वासन वारंवार देत असतात. मात्र प्रत्यक्षात संशोधक विद्यार्थ्यांचे विद्यावेतन बंद करून विद्यार्थी हिताच्या विरोधात कसा निर्णय घेतला जात आहे अशी विचारणा अधिसभा  सदस्य प्रा. शामकांत देशमुख, डॉ. संजय खरात, अभिषेक बोके, संतोष ढोरे, शशिकांत तिकोटे, दादाभाऊ शिनलकर, विश्वनाथ पडवी, अनिल विखे, डॉ. तानाजी वाघ यांनी केली आहे.


Web Title: Nitin Karamlakar will solve the question of students scolarship in four days
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.