आरोपींविरुद्ध पुरावे सिद्ध; जास्तीत जास्त शिक्षा देण्याची दाभोलकर कुटुंबीयांची न्यायालयाकडे मागणी

By नम्रता फडणीस | Published: February 22, 2024 08:13 PM2024-02-22T20:13:03+5:302024-02-22T20:13:14+5:30

आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा द्यावी असे लेखी म्हणणे दाभोलकर कुटुंबियांच्या वतीने अँड.ओंकार नेवगी यांनी गुरुवारी (दि. २२) विशेष न्यायाधीश पी. पी. जाधव यांच्या न्यायालयात सादर केले.

narendra Dabholkars family demands the court to give maximum punishment to accused | आरोपींविरुद्ध पुरावे सिद्ध; जास्तीत जास्त शिक्षा देण्याची दाभोलकर कुटुंबीयांची न्यायालयाकडे मागणी

आरोपींविरुद्ध पुरावे सिद्ध; जास्तीत जास्त शिक्षा देण्याची दाभोलकर कुटुंबीयांची न्यायालयाकडे मागणी

पुणे : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा खून करण्यामागचा उद्देश काय होता? दाभोलकरांवर गोळ्या झाडणाऱ्या आरोपींना दोन प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी छायाचित्रासह न्यायालयात ओळखले आहे. तसेच दाभोलकरांच्या मृतदेहातून दोन गोळ्या बाहेर निघाल्याचे शवविच्छेदन करणारे ससूनचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजय तावरे यांनी न्यायालयात सांगितले आहे. आरोपी अंधुरे याने गुन्हा केल्याचा अतिरिक्त न्यायालयीन कबुलीजबाब देखील दिला आहे. अशाप्रकारे आरोपींविरुद्ध अनेक पुरावे सिद्ध झाले आहेत. त्यामुळे आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा द्यावी असे लेखी म्हणणे दाभोलकर कुटुंबियांच्या वतीने अँड.ओंकार नेवगी यांनी गुरुवारी (दि. २२) विशेष न्यायाधीश पी. पी. जाधव यांच्या न्यायालयात सादर केले.

सीबीआयच्या वकिलांचा अंतिम युक्तिवाद संपल्यानंतर दाभोलकर कुटुंबियांच्या वतीने न्यायालयात लेखी म्हणणे सादर करण्यात आले. बचाव पक्षाने न्यायालयात सांगितले की टेम्पोमधून मृतदेह महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर टाकला. मात्र त्याबाबत कोणतीही उलटतपासणी झालेली नाही. मृतदेह समोरच्या बाजूला टेम्पोमधून टाकला असता तर तिथे रक्त दिलेले असते. मृतदेहाच्या शेजारी पिस्तुलातील गोळ्याही पडलेल्या दिसत होत्या. त्यामुळे हा संपूर्ण बचाव खोटा आहे. तसेच दाभोलकर यांच्या मृतदेहावर एक लांबलचक केस होता. मात्र चारही साक्षीदारांनी हा केस असल्याबाबत नकार दर्शविला आहे. याशिवाय बहिणींना न्यायालयात हजर करून हे दोघेही रक्षाबंधनाच्या दिवशी आमच्याबरोबर होते अशी बहिणींनी दिलेली साक्ष देखील रेकॉर्डवर आलेली नाही. पूर्वी बचाव पक्षाने कधी हे सांगितलेले नाही. पहिल्यांदाच त्यांनी हे समोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. आरोपींच्या मानसिक विश्लेषणाबाबत जे सांगितले त्यातही सर्वोच्च न्यायालयाने २०२३ च्या एका निकालात मानसशास्त्रीय मूल्यांकन करण्याच्या पुराव्याला देखील मूल्य आहे असे म्हटले आहे. त्यामुळे हे मानसशास्त्रीय मूल्यांकन विचारात घेतले पाहिजे अशा मुद्यांचा परामर्श दाभोलकर कुटुंबीयांनी लेखी म्हणण्यामध्ये घेतला आहे. 

दरम्यान, येत्या १ मार्च रोजी बचाव पक्षाच्या वतीने अंतिम युक्तिवाद सुरु होणार आहे. त्यापूर्वी आम्ही दोन महत्वपूर्ण न्यायनिवाड्याचे दाखले देणार आहोत असेही अँड. नेवगी यांनी सांगितले.

Web Title: narendra Dabholkars family demands the court to give maximum punishment to accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे