पुण्यातून हिंजवडीपेक्षा मुंबई जवळ ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2018 06:13 PM2018-04-04T18:13:25+5:302018-04-04T18:13:25+5:30

हिंजवडी हा भाग अायटी हब म्हणून नावारुपास अाल्यापासून या भागात हाेणारी वाहतूक काेंडी नित्याचीच झाली अाहे. या वाहतूककाेंडीमुळे येथील कर्मचाऱ्याचे जाऊन-येऊन दिवसातील तीन तास खर्ची पडत अाहेत.

mumbai seems nearer than hinjawadi due to traffic jam | पुण्यातून हिंजवडीपेक्षा मुंबई जवळ ?

पुण्यातून हिंजवडीपेक्षा मुंबई जवळ ?

googlenewsNext
ठळक मुद्देयेथील कर्मचाऱ्यांचे जाऊन-येऊन तीन तास जातात प्रवासातवाहतूककाेंडीमुळे सहन करावा लागताेय मनस्ताप

पुणे : पुण्यातून हिंजवडी अायटी पार्कमध्ये जाताय, तर मुंबईच्या प्रवासाची तयारी करा. कारण जितका वेळ तुमचा हिंजवडीच्या ट्रफिकमध्ये जाईल तितक्या वेळात तुम्ही मुंबईला पाेहचाल. पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या नाेकरदारांचा रेल्वेमध्ये पत्त्यांचा तसेच गप्पांचा फड रंगत असताे. हिच परिस्थिती पुण्यातून हिंजवडीला जाताना बसेसमध्ये पाहायला मिळाली तर अाश्चर्य वाटायला नकाे. या वाहतूककाेंडीला कंटाळून पुण्यातून हिंजवडीपेक्षा मुंबईला अापण लवकर पाेहचू अश्या चर्चा अाणि विनाेद हिंजवडी येथील कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांमध्ये केले जात अाहेत. 
    हिंजवडीमध्ये हाेणारी वाहतूककाेंडी नित्याचीच झाली अाहे. अनेक राष्ट्रीय- अांतरराष्ट्रीय कंपन्यांची कार्यालये येथे अाहेत. त्यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये वाहनांची लक्षणीय वाढ या भागामध्ये झाली अाहे. त्यामुळे येथे दरराेज हाेणाऱ्या वाहतूक काेंडीला या कंपन्यांमध्ये काम करणारे कर्मचारी वैतागले असून त्यांच्या दिवसातील तीन तास हे केवळ प्रवासातच घालवावे लागत असल्याचे चित्र अाहे. कामाचे नऊ तास अाणि येथे जाण्या-येण्याचे मिळून तीन तास प्रवासात खर्ची पडतात, त्यामुळे दिवसातील 12 तास हे यात जात असल्याने स्वतःसाठी तसेच कुटुंबासाठी वेळ देता येत नसल्याची भावना येथील काही कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली. 
    गेल्या काही वर्षात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात पुण्याचे नाव जगभर पसरले अाहे. या क्षेत्रात भारतामध्ये बंगळुरु नंतर पुण्याचाच क्रमांक लागताे. अनेक जागतीक कंपन्यांची कार्यालये पुण्यातील विविध भागात अाहेत. त्यातही हिंजवडीची अाेळख ही अाता अायटी पार्क अशीच झाली अाहे. हिंजवडी फेज 1,2,3 अश्या भागांमध्ये शेकडाे कंपन्या अाहेत. त्यात अाता फेज 4 चे कामही सुरु करण्यात अाले अाहे. त्यामुळे यात अाणखी कंपन्यांची भर पडणार अाहे. या कंपन्यांमध्ये हजाराे कर्मचारी काम करतात. येथील कर्मचाऱ्यांना पगारही माेठ्या अाकड्यांचा असताे. बहुतांश कंपन्यांची कर्मचाऱ्यांसाठी पिकअॅप अॅण्ड ड्राॅपची साेय असली तरी अनेक कर्मचारी स्वतःच्या वाहनाने कामावर जात असतात. त्यातही चारचाकी वाहनांची संख्या माेठी असते. त्यामुळे सकाळच्या व संध्याकाळच्या वेळी येथे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. त्यात येथील रस्ते तुलनेने लहान अाहेत अाणि लेनची शिस्तही पाळली जात नाही. या वाहतूककाेंडीमुळे कर्मचाऱ्यांचा वेळ वाया जाताेच, त्याचबराेबर इंधनही खर्ची पडते. गेल्या काही वर्षात याभागातील प्रदुषणाच्या पातळीतही माेठी वाढ झालेली पाहायला मिळत अाहे. 
    दाेन वर्षांपासून हिंजवडी फेज 2 मध्ये काम करणारी भावना गायकवाड म्हणाली, माझी शिफ्ट सकाळी अकरा ते रात्री अाठ वाजेपर्यंत असते. सकाळी साेडनऊ वाजता कंपनीची गाडी घ्यायला येते. तसेच संध्याकाळी अाठ वाजता सुटल्यानंतर घरी पाेहचण्यासाठी किमान साडेनऊ -दहा हाेतात. या वाहतूककाेंडीमुळे  दिवसातले तीन तास हे केवळ प्रवासातच जातात. अाम्हाला साप्ताहिक सुट्टी शिवाय इतर कामांसाठी वेळच मिळत नाही. त्यामुळे घरगुती कार्यक्रम असाे किंवा काेणाचे लग्न, अाम्हाला कुठेच जाता येत नाही. 
    या ठिकाणीच असलेल्या एका कंपनीत काम करणारा मयूर जगताप म्हणाला, सकाळी व संध्याकाळच्या वेळी हिंजवडीत जायचं म्हंटलं तर वाहतूककाेंडीच्या मनस्तापाला सामाेरे जाण्याची तयारी ठेवावी लागते. राेजच वाहतूक काेंडीमध्ये अडकून पडावे लागत असल्याने त्याचा कामावरही परिणाम हाेत असताे. अनेकदा कंपनीची गाडी वेळेवर घ्यायला येते, मात्र या ठिकाणच्या वाहतूक काेंडीमुळे काहीवेळा अाॅफिसला उशीर हाेताे. त्यावेळी सातत्याने वाहतूककाेंडीमुळे अाॅफिसला उशीर झाल्याचा मेल करावा लागताे. अन्यथा उशीरामुळे पगारातील पैसे वजा केले जातात. अाॅफिसला स्वतःच्या चारचाकीने येणाऱ्यांची संख्याही माेठी अाहे. एका चारचाकीमध्ये केवळ एक व्यक्ती असते. येथील रस्त्यांची रुंदी पाहता इतक्या वाहनांमुळे वाहने अडकून पडतात. त्यात येथे लेनची शिस्तही पाळली जात नाही. कामाचा ताण अाणि त्यात वाहतूककाेंडीचा मनस्ताप येथील कर्मचाऱ्यांना सहन करावा लागत अाहे. 
    पुण्याचे वाहतूक उपायुक्त अशाेक माेराळे म्हणाले, हिंजवडी भागातील वाहतूक काेंडी साेडविण्यासाठी अनेक उपाययाेजना करण्यात अाल्या, अजूनही करण्यात येत अाहेत. विशेषतः बसेससाठी स्वतंत्र लेन करण्यात अाली अाहे. त्याचबराेबर वाहतूक नियंत्रित करण्यासाठी अतिरिक्त कर्मचाऱ्यांची नेमणूकही करण्यात अाली अाहे. राेज या ठिकाणी साधारण दीड लाख वाहने या कंपन्यांमध्ये जातात अाणि तितकीच बाहेर पडत असतात. येथील कर्मचाऱ्यांनी जास्तीत जास्त सार्वजनिक वाहतूकीचा वापर करायला हवा. रस्तावर गाड्या कमी अाणायला हव्यात. कार पुलिंगही करता येऊ शकते. यासाठी वाहतूक विभागाकडून जनजागृती सुद्धा करण्यात आली हाेती. परंतु येथील कर्मचाऱ्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र अाहे. त्याचबराेबर येथे नियम ताेडणाऱ्यांचे प्रमाणही सर्वाधिक अाहे. 

Web Title: mumbai seems nearer than hinjawadi due to traffic jam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.