भिडे गुरुजींच्या तोंडून मनुवाद पेरला जातोय : डॉ. श्रीपाल सबनीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 09:24 PM2018-07-17T21:24:07+5:302018-07-17T21:24:40+5:30

कार्यकर्त्यांमध्ये मतभेद निर्माण करुन जातीयवादी षड्यंत्र पेरले जात आहे..

Manuwaad is being planted by Bhide Guruji : Dr. Shripal Sabnis | भिडे गुरुजींच्या तोंडून मनुवाद पेरला जातोय : डॉ. श्रीपाल सबनीस

भिडे गुरुजींच्या तोंडून मनुवाद पेरला जातोय : डॉ. श्रीपाल सबनीस

ठळक मुद्देनामदेव ढसाळ पँथर साहित्य रत्न पुरस्कार

पुणे : पँथर चळवळ म्हणजे सत्याचा आणि आशेचा किरण आहे. पँथर आज तुकड्यांमध्ये विखुरलेली आहे. कार्यकर्त्यांमध्ये मतभेद निर्माण करुन एकीकडे जातीयवादी षड्यंत्र पेरले जात आहे, तर दुसरीकडे भिडे गुरूजींच्या तोंडून मनुवाद पेरला जात आहे. या परिस्थितीत सर्वांनी एकसंध राहण्याची गरज आहे, असे मत माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.
फुले-शाहू- आंबेडकर विचार मंचतर्फे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पन्नासाव्या स्मृतिदिनानिमित्त सबनीस यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह अ‍ॅड. प्रमोद आडकर यांच्या हस्ते पद्मश्री नामदेव ढसाळ पँथर साहित्य रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी रवींद्र माळवदकर, नगरसेविका लता राजगुरू, पँथर नेते यशवंत नडगम आणि पँथर नेते प्रकाश साळवे आदी मान्यवर उपस्थित होते. 
सबनीस म्हणाले, ‘सामाजिक जीवनात टोकाची विषमता आणि गरिबी पाहून नामदेव ढसाळांना नेहमी वेदना व्हायच्या. त्यामुळे त्यांची भाषा काहीवेळा खूप टोकाची वाटायची. त्यांचे साहित्य हे केवळ साहित्य विश्वापुरते मर्यादित न राहता  आर्थिक आणि राजकीय क्षेत्रही त्यांच्या साहित्याने पादाक्रांत केले. त्यांची कविता चौकटबद्ध रसिकतेला उद्ध्वस्त करणारी होती. नामदेव ढसाळ हे पँथर चळवळीचे प्रेरणास्थान होते.’
 ‘नामदेव ढसाळ हे महाराष्ट्राच्या साहित्य परंपरेतील प्रगल्भ आणि विद्रोही वास्तववादी कवी होते. त्यांच्या कवितेत केवळ विद्रोह नव्हता, तर क्रांतीची बिजे होती. ढसाळांच्या कवितेची भाषा सडेतोड होती; मात्र त्याला गौतम बुद्ध आणि आंबेडकरांच्या विचारांचा पाया होता. नामदेव ढसाळांची कविता ही युगप्रवर्तक ठरली’, असेही सबनीस म्हणाले. विठ्ठल गायकवाड यांनी सूत्रसंचालन आणि दादासाहेब सोनवणे यांनी आभार मानले. 

Web Title: Manuwaad is being planted by Bhide Guruji : Dr. Shripal Sabnis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.