‘माणूस’ लवकरच विकीपिडीयावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 08:03 PM2018-03-13T20:03:39+5:302018-03-13T20:03:39+5:30

देशाच्या स्वातंत्र्यापासूनच आणि साठोत्तरी कालखंडात ‘माणूस’ साप्ताहिकाची स्थापना करण्यात आली. श्री.ज.माजगावकर यांनी या माध्यमातून लेखक आणि वाचकांची पिढी घडवली.

'Manus' soon on Wikipedia | ‘माणूस’ लवकरच विकीपिडीयावर

‘माणूस’ लवकरच विकीपिडीयावर

googlenewsNext
ठळक मुद्देपीडीएफ स्वरूपात असलेले हे अंक लवकरच विकीपिडीयावर उपलब्ध होणार डिजिटायझेशन झाल्यामुळे हा समग्र वैचारिक ठेवा यापुढील काळात सर्वांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून खुला

पुणे : सकस स्वरूपाच्या वैचारिक लेखनातून वाचकांची पिढी घडवणाऱ्या ‘साप्ताहिक माणूस’च्या डिजिटायझेशनला उदंड प्रतिसाद मिळत आहे. भारतासह अमेरिका, सौदी अरेबिया, ओमान आणि नॉर्वे येथील मराठीप्रेमींकडून ‘माणूस’च्या अंकांना ‘हिट्स’ आल्या आहेत. पीडीएफ स्वरूपात असलेले हे अंक लवकरच विकीपिडीयावर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे अनेकांना हा अमूल्य ठेवा युनिकोडमध्ये उपलब्ध होणार आहे. 
‘माणूस’चे अंक पीडीएफ स्वरूपात उपलब्ध झाले आहेत. हे अंक युनिकोडमध्ये नसल्यामुळे एकेका अंकाची पीडीएफ फाईल उतरवून घ्यावी लागत आहे. यामधील तांत्रिक अडचणी लवकरच दूर करण्याचा प्रयत्न आहे. सध्या पीडीएफ स्वरूपात असलेल्या या अंकांमध्ये वेगवेगळ्या फॉन्टमध्ये मजकूर आहे. जवळपास ५० हजारांहून अधिक पृष्ठसंख्या असल्यामुळे मजकूर वेगळाच दिसत असल्याचे निदर्शनास आले आहे. ही तांत्रिक अडचण दूर करून ‘माणूस’चे अंक विकीपिडीयावर नेण्याचा मानस आहे. त्यामुळे अनेकांना युनिकोडमध्ये मजकूर उपलब्ध होणार आहे.
देशाच्या स्वातंत्र्यापासूनच आणि साठोत्तरी कालखंडात ‘माणूस’ साप्ताहिकाची स्थापना करण्यात आली. श्री.ज.माजगावकर यांनी या माध्यमातून लेखक आणि वाचकांची पिढी घडवली. सामाजिक कार्यकर्त्यांना त्यांनी लिहिते केले. ‘माणूस’कार श्री. ग. माजगावकर यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून माणूस प्रतिष्ठानने ३० वर्षांतील सर्व अंकांचे डिजिटायझेशन करण्याचा प्रकल्प हाती घेतला होता. गेल्या वर्षी ‘श्रीगमां’च्या २० व्या स्मृतिदिनानिमित्त कार्यान्वित केलेला हा प्रकल्प यंदा २० फेब्रुवारीला पूर्णत्वास गेला.जुन्या अंकांना या साप्ताहिकाचे सर्व अंक पीडीएफ स्वरूपात गोखले अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र संस्थेच्या ‘डिजिटल रिपॉझिटरी’मध्ये उपलब्ध झाले आहेत, अशी माहिती माणूस प्रतिष्ठानच्या अध्यक्षा आणि श्रीगमांची कन्या वंदना भाले यांनी दिली. 
‘माणूस’च्या या सर्व अंकांचे डिजिटायझेशन झाल्यामुळे हा समग्र वैचारिक ठेवा यापुढील काळात सर्वांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून खुला झाला आहे. श्री. ग. माजगावकर यांनी ‘माणूस’च्या माध्यमातून देशातील आणि जगभरातील ठळक घडामोडींचे सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि सांस्कृतिक विश्लेषण केले. मराठी माणूस सकस माहितीने समृद्ध कसा होईल याकडे माजगावकर यांचा कटाक्ष होता. कोणत्याही घटनेवर ‘श्रीगमा’ काय म्हणतात याकडे वाचकांचे लक्ष असायचे. जुन्या काळातील या घडामोडींचा अभ्यास वाचन संशोधक, विद्यार्थी आणि अभ्यासकांना उपलब्ध झाला आहे.

Web Title: 'Manus' soon on Wikipedia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.